दिनकरजी हे हिंदी साहित्यजगतातील श्रेष्ठ कवी आणि विचारवंत होते. सुरुवातीपासूनच रसिक वाचकांचा आदर आणि प्रेम, तसेच सहृदय विद्वानांचे समर्थन त्यांना प्राप्त झालं होतं. भारतीय ज्ञानपीठाचा १९७२ सालचा साहित्य पुरस्कार ‘दिनकरजी’ यांना त्यांच्या ‘उर्वशी’ या काव्यसंग्रहासाठी प्रदान करण्यात आला. हे काव्यनाटय़ १९६१-१९६५ या कालावधीत प्रकाशित भारतीय साहित्यातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृती म्हणून घोषित करण्यात आले आहे.
बिहारमधील ‘मुंगेर’ जिल्ह्य़ातील सिमरिया गावी २३ सप्टेंबर १९०८ रोजी एका सामान्य शेतकऱ्याच्या घरात दिनकरजींचा जन्म झाला. त्यांचे बालपण खेडेगावातच गेल्याने निसर्गसौंदर्याचा परिणाम स्वाभाविकपणे त्यांच्या बालमनावर झाला. तसेच जमीनदार-सावकार यांनी केलेला छळ आणि या सगळ्यांमध्ये पिचणाऱ्या शेतकऱ्यांचा जीवनसंघर्षही त्यांनी खूप जवळून पाहिला होता. त्यामुळे त्यांचे कविमन समाजोन्मुख बनले. या दोन्ही अनुभवांचे चित्रण त्यांच्या साहित्यात उतरलेले दिसते. त्यांच्या लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांनी जीवनात खूप दु:ख आणि कष्ट भोगले. त्यांचेही प्रतिबिंब त्यांच्या काव्यात दिसते. स्वातंत्र्यसंग्रामातील सहभागामुळे त्यांनी राष्ट्रभक्तीपर कविताही लिहिल्या.
दिनकरजी सरकारी नोकरीत असूनही, राष्ट्रीय चेतनेला जागृत करणाऱ्या कविता लिहून क्रांतिकार्य करीत होते, म्हणून सरकारी रोष त्यांना सहन करावा लागला. आपण एका चुकीच्या माणसाला सरकारी कार्यालयात स्थान दिलेय हे इंग्रजांच्या लक्षात आल्यावर दिनकरजींची फाईल तयार होऊ लागली आणि चार वर्षांत त्यांची २२ वेळा बदली करण्यात आली. वैतागून त्यांनी नोकरी सोडून जावे म्हणून त्यांना असा त्रास देण्यात आला. पण कौटुंबिक अडचणीमुळे ते नोकरी सोडू शकत नव्हते तसेच काव्यलेखनाची ऊर्मीही दडपू शकत नव्हते. अखेर स्वातंत्र्यानंतर १९५० मध्ये मुझफ्फरपूरच्या विश्वविद्यालयात ते प्राध्यापक आणि हिंदी विभागप्रमुख म्हणून काम करू लागले. याच सुमारास १९५०-५२ मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली.
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com
स्पेक्ट्रोफोटोमीटर : २
मागील लेखात आपण स्पेक्ट्रोफोटोमीटर म्हणजे काय, हे पाहिले. स्पेक्ट्रोफोटोमीटर ज्या सिद्धांतावर आधारित आहे, त्याला बीअर-लँबर्ट सिद्धांत असे म्हणतात. एखाद्या रसायनिक पदार्थाच्या द्रावणात किती प्रकाशऊर्जा ग्रहण केली गेली आहे, हे त्या द्रावणाची संहती आणि ते द्रावण ज्या कुपीमध्ये प्रयोगासाठी ठेवण्यात आलेले आहे; त्या कुपीच्या रुंदीवर (प्रकाशाने कापलेल्या अंतरावर) अवलंबून असते. द्रवाची तीव्रता वाढते तशी त्याची प्रकाशकिरण शोषून घेण्याची क्षमता वाढते. कुपी जर उभ्या नलिकेच्या आकाराची असेल, तर प्रकाशकिरणांना कुपीतील द्रवातून अंतर पार करायला कमी वेळ लागेल. तीच कुपी जर पसरट आकाराची असेल तर कुपीतील द्रवातून अंतर पार करायला जास्त वेळ लागेल.
स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये ऊर्जेचा स्रोत म्हणून डय़ुटेरिअमचा (प्रकाशाचा पांढरा स्रोत) दिवा वापरतात. दिव्यातून निघणारी प्रकाशकिरणे एकत्रित करण्यासाठी िभगाचा वापर केला असतो. यातून बाहेर पडणारी किरणे ही संभाव्य सर्व तरंगलांबीची असतात. रासायनिक पदार्थाच्या अभ्यासासाठी विशिष्ट तरंगलांबीची निवड करून विशिष्ट तरंगलांबीचेच प्रकाशकिरण नमुना द्रव पदार्थातून जाऊ देतात. कुपीत ठेवलेल्या रासायनिक द्रावणातून प्रकाशकिरणे जाण्यापूर्वी फिल्टरमधून जाऊ देतात. फिल्टर फक्त विशिष्ट तरंगलांबीचीच किरणे पदार्थापर्यंत जाऊ देते. या प्रकाशाला मोनोक्रोमेटिक प्रकाश असे म्हणतात. हे प्रकाशकिरण द्रवपदार्थातून आरपार जाऊन प्रकाशनलिकेवर पडतात, ज्यामुळे प्रकाशकिरणांची तीव्रता मोजली जाते. कुपीतील रासायनिक पदार्थ त्यांच्या संहतीनुसार प्रकाशऊर्जा ग्रहण करतात. ही तीव्रता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शोषणअंकात रूपांतरित केली जाते. ती मीटरवर कटय़ाच्या रूपात किंवा आकडय़ाच्या रूपात प्रदíशत होतो. प्रथम काचेच्या कुपीत स्वच्छ पाणी घेऊन त्याचा शोषणअंक शून्यावरती आणतात. याला शून्य वाचन किंवा ब्लँक रीडग असे म्हणतात. नंतर प्रत्यक्ष नमुना भरलेली कुपी घेऊन त्याचा शोषणअंक मोजतात. त्या रसायनाचे विविध तीव्रतेचे नमुने घेऊन त्यांचे अनुक्रमे शोषणअंक मिळाल्यावर आलेखाद्वारे त्याची मांडणी करतात.
– –डॉ. रंजन गर्गे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org