पशुपालन व शेती हे एकमेकांना पूरक आहेत. खरं पाहिलं तर, पशुपालनाशिवाय शेतजमिनीची सुपीकता टिकविता येत नाही. रासायनिक खतांनी शेतजमिनी नापीक होत चालल्या आहेत. हेक्टरी उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच, पिकांमध्ये रासायनिक पदार्थ जे मानवप्राण्यांना धोकादायक आहेत, ते वाढत चालले आहेत. तसेच वनस्पतींची रोगांविरुद्धची प्रतिकारकशक्ती कमी होत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची तणनाशके, कीडनाशके (बुरशी, जीवाणू, विषाणूरोधक रसायने) यांचा वापर वाढला आहे.
भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांत अनेक जातींच्या चार पायांचे पशू आहेत. या पशूंमध्ये रवंथ करणारे पशू- यात गायी, म्हशी, शेळ्या, मेंढय़ा, उंट तसेच १-२ पोटकप्पे असलेले गाढव, डुक्कर, मिथुन, याक इत्यादींचा समावेश होतो. या पशूंपासून मिळणारे मल, मूत्र, हाडे, पोटातील अन्न या सर्वाचा उपयोग सेंद्रिय खते म्हणजे वनस्पतींचे अन् न म्हणून होतो.
वनस्पती, झाडेझुडुपे, रोपे इत्यादींपासून मिळणारा पालापाचोळा हा सहजासहजी कुजत नाही. त्याच्यापासून जर चांगले कसदार खत मिळवायचे असेल, तर त्याबरोबर काही जैविक पदार्थ असले पाहिजेत. त्यांचा या पालापाचोळ्याशी संबंध आला पाहिजे. जीवाणू, काही बुरशी, एकपेशीय जीव हे जैविक पदार्थ पशूंच्या मलमूत्रात भरपूर प्रमाणात असतात. हे जीव पालापाचोळ्याला चांगल्या प्रकारे कुजवितात.
पशूंच्या मलमूत्राचा दुहेरी उपयोग आहे. यापासून बायोगॅस (गोबरगॅस) तयार करता येतो. वायू मिळविल्यानंतर जो काही चोथा उरतो, तो कंपोस्ट खत तयार करायला उपयोगी पडतो. प्रत्येक पशूच्या मलमूत्रात नत्र, पालाश, स्फुरद कमी-जास्त प्रमाणात असतात. मलमूत्रात असणाऱ्या विविध जीवाणूंमुळे ते जैविक खत म्हणूनही वापरता येते. म्हणूनच शेतजमिनीतून येणाऱ्या, मानवाला न पचणाऱ्या वनस्पतीजन्य बाबी पशूंच्या पोटात गेल्यावर त्यावर प्रक्रिया होते. तयार झालेले पदार्थ पुन्हा निसर्गाकडे जातात. त्याची व्यवस्थित विल्हेवाट लागते व वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत होते. तसेच हवेतील दूषित वायू वनस्पती शोषून घेऊन ‘ग्लोबल वॉर्मिंग’ कमी करण्यास हातभार लावते.
– डॉ. वासुदेव सिधये (पुणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
जे देखे रवी..: रहस्यकथा – भाग २ : हाहाकार
ती शस्त्रक्रिया मी माझ्या मनाविरुद्ध केली हे नक्की. शुक्रवार होता. सकाळी रुग्णालयात गेलो तर ही हुंदके देऊन रडत होती. मी म्हटले, काय झाले? तर म्हणाली, मला भीती वाटते आहे.
तिचा नवरा आला होता. त्याला मी म्हटले, ‘‘आफत टळली. हिला घरी घेऊन जा.’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘उसको रोनेकी आदत है.’’ ‘‘आप डरो मत.’’ मी परत आत गेलो तर एका स्त्री नर्सने तिची समजूत घालून तिला बेशुद्धही केली होती.
शस्त्रक्रिया उत्तम झाली. रक्त द्यावे लागले नाही. नवरा भेटला. ती शुद्धीवर आल्यावर ‘‘मी घरी जातो’’ म्हणून गेला.दुसऱ्या दिवशी उत्तम होती. घरी जाते म्हणू लागली. तेव्हा तिला मी रागावलो. तुला सात दिवस सांगितले होते. आता घाई करू नकोस, असे बजावले आणि घरी गेलो.
घरी गेल्यावर पुण्याहून फोन आला. वडिलांची तब्येत बिघडल्याचे कळले. तेव्हा रीतसर दुसऱ्या डॉक्टरला Locum ठेवून पुण्याला जावे लागले. सुदैवाने वडिलांना फारसे काही झाले नव्हते. तेव्हा लगेचच रविवारी परत आलो आणि सोमवारी रुग्णालयात गेलो. तिथे हाहाकार माजला होता, कारण संप झाला होता. सगळीकडे कचरा पडला होता. रुग्णांच्या सुविधा बंद झाल्या होत्या. थोडय़ाफार Nurses धडपडत होत्या, पण एकदमच सगळे बेजार झाले होते आणि ही बाई धाय मोकलून रडत होती. ‘‘हे मी काय केले?’’, ‘‘हे माझे काय झाले?’’ असा सूर तिने लावला होता.
मी तिला तपासले. थोडेफार रक्त साखळल्याचे दिसले. ते नैसर्गिकच होते, पण ती बया ठणठणीत होती. दुखते का विचारले तर नाही म्हणाली. मी तशी व्यवस्था केली. माझ्या एका प्लास्टिक सर्जन मित्राकडे तिला जागा मिळवून दिली. मला वाटते Ambulance बोलवून तिला स्वत: मदत करत पाठवली. चार दिवसांनी त्या माझ्या मित्राचा फोन आला म्हणून त्याही रुग्णालयात मी गेलो. थोडे रक्त जमले होते ते काढले. तिची तब्येत उत्तम होती आणि शस्त्रक्रिया चांगली झाल्याचे दिसत होते, पण ‘‘मी हे काय केले?, माझे काय होणार?’’ असेच सारखे तिचे पालुपद चालू होते.
एक-दोन दिवसांनी ही घरी गेल्याचे कळले. परत कधी तपासून घ्यायला आलीच नाही. मी मनात म्हटले, ब्याद गेली.
पण ती ब्याद जायची नव्हती, कारण काही महिन्यांनी माझ्यावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत जिल्हा ग्राहक मंच आणि Maharashtra Medical Council या दोन्ही संस्थांकडून नोटिसा बजावण्यात आल्या आणि पहिल्या सुनावणीच्या तारखा पडल्या. मी सुन्न झालो.
– रविन मायदेव थत्ते
rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस : रक्ताचे विकार : भाग-२
लक्षणे – नाकांतून रक्त वाहणे, चक्कर येणे, क्वचित बेशुद्ध होणे, नाकात नेहमी लाल खपली धरणे. डोळे लाल होणे, लाल सिरा उठून दिसणे, प्रकाश सहन न होणे, वाचनाचा, कामाचा, जागरणाचा जरासाही त्रास सहन न होणे. डोळ्यांत पापणीच्या कडेला धरून लहानमोठी डाळीएवढी गांठ होणे, वाढणे, खुपणे, संडासला साफ न होणे, रक्त थुंकीतून; कफाबरोबर वा स्वतंत्र पडणे. तिळासारखे पण लाल चुटुक रंगाचे ठिपके त्वचेवर सर्वत्र येणे, आग होणे, खाज नसणे. मळाबरोबर किंवा स्वतंत्रपणे थोडे वा खूप रक्त पडणे; चक्कर, पांडुता, थकवा येणे. रक्त सतत वाहत राहून पांडुता, थकवा येणे, रक्त सतत घटत जाणे. प्राणास धोका उत्पन्न होणे.
शरीर व परीक्षण – यकृत व प्लीहा यांच्या सूज किंवा संकोच याकरिता परीक्षण करावे. जिभेचे परीक्षण कृमी, जंत, मलावरोध याकरिता करावे. रक्ताच्या कर्करोगात पांथरी वाढली असता कृमीचा विचार लक्षांत घ्यावा लागतो. डोळ्यांचे परीक्षण लाल रंग, सिराजाल, रांजणवाडी याकरिता पहावे. क्वचित रांजणवाडी फोडावी लागते. त्याकरिता रांजणवाडीचे स्वरूप नीट पहावे. गुदभागाची परीक्षा अर्श किंवा भगंदराकरिता करावी. थुंकीतून रक्त येते, त्याकरिता कफ, थुंकी यांच्या परीक्षणाबरोबर फुफ्फुसाचे ध्वनी, शरीराचे वजन ताप सर्दी पडसे यांच्या परीक्षणाची गरज आहे. मलाप्रवृत्ती साफ आहे का? याकरिता पोट तपासावे. सर्व तक्रारीमध्ये रक्त परीक्षण, रक्ताचे वजन, चरबी, साखर अवश्य तपासावी.
कारणे- १) नाकातून रक्त येणे – पोट साफ नसणे, रक्ताचे तीक्ष्ण, उष्ण गुण वाढणे, रक्ताचे प्रमाण वाढणे. आंबट तिखट खारट उष्ण आहार; जागरण; उन्हातान्हांत हिंडणे; चहा, धूम्रपान, मद्य यांचे व्यसन; पित्तवर्धक आहारविहार.
२) डोळे लाल होणे – पित्तवर्धक आहारविहार; वाचनाचा, उन्हाचा, जागरणाचा, खूप उष्णतेत काम करण्याचा त्रास होणे.
३) रांजणवाडी – मलावरोधामुळे पोटात उष्णता वाढणे. पित्त वाढेल असे खाणे, पिणे, वागणे वारंवार घडणे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत : ७ जून
१९१३ > मराठी वाङ्मयविषयक लिखाणाला नवी दृष्टी देणारे समीक्षक, साहित्यिक मंगेश विठ्ठल राजाधक्ष यांचा जन्म. ‘अभिरुची’ मासिकातून ‘निषाद’ या टोपणनावाने ते वादसंवाद हे सदर लिहीत. ‘पाच कवी’ हे आधुनिक कवितांचे त्यांनी केलेले पहिले संपादन. ‘खर्डेघाशी’, ‘शालजोडी’ ‘अम्लान’ , ‘पंचम’ हे लघुनिबंध संग्रह, ‘शब्दयात्रा’ हा साहित्यविषयक टिपणांचा संग्रह आणि ‘भाषाविवेक’ ही त्यांची मराठी पुस्तके. ‘हिस्टरी ऑफ मराठी लिटरेचर’ हा अभ्यासपूर्ण इंग्रजी ग्रंथही त्यांचा. पु. ल. देशपांडे व रामचंद्र वा. अलुकर यांच्यासह ‘पुरुषराज अळुरपांडे’ या टोपणनावाने लिहिलेले लेख तर सहलेखनाचे आणि सहजलेखनातल्या मार्मिकतेचे अद्वितीय उदाहरणच. २०१० साली मं.वि. निवर्तले.
२००० > बालसाहित्यिक, चरित्रकार, कवी व ‘आनंद’ मासिकाचे संपादकपद ३५ वर्षे सांभाळणारे गोपीनाथ तळवलकर यचे निधन. प्रौढसाक्षरांसाठीही त्यांनी लिखाण केले. कणिका, खंडकाव्य, बालकविता असे विविध काव्यप्रकार हाताळूनही त्यांचे नाव झाले नाही. आकाशमंदिर, छायाप्रकाश, नंदिता या कादंबऱ्या, ‘ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व’ हे रसग्रहण, तसेच मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती.
– संजय वझरेकर