इंदूरपासून १५ किलोमीटर दूर असलेल्या रंगवासा गावानजीक डेहरी येथे सहा एकर शेतात, २२ मार्च २००६ रोजी आम्ही ‘रंगवासा जैविक ग्राम संस्थे’ची स्थापना केली. तेव्हा तिथे एक विहीर व दोन बोअरवेल होत्या. या परिसरात आम्ही शेततळं, गांडूळ प्रकल्प, गोठा, काही कुटीरोद्योग, पर्यावरण व शेतीवरील दुर्मीळ मराठी व इंग्रजी पुस्तकांचे छोटेखानी ग्रंथालय, प्रशिक्षण बठक व्यवस्था, दृकश्राव्य प्रशिक्षण व्यवस्था, वाहन व्यवस्था हे सर्व उभारलं.
शेतातील उपलब्ध सामग्रीतूनच खतनिर्मिती, सूक्ष्म जीवाणूंची माहिती, जलसंरक्षण, सुक्या चाऱ्याने व पीक अवशेषाने आच्छादन करून सिंचनात बचत, धूळ पेरणी, दाभोळकरांची सूर्यशेती, फुकुओकाची मातीचा गोळा करून पेरणी करण्याची पद्धती, जैव कीटकनाशकांपासून रोगराई नियंत्रण, रासायनिक व सेंद्रिय शेतीतल्या खाद्यान्नातील रंग, स्वाद व पोषक तत्त्वातील फरक हे सर्व आणि ग्राहकांना खाद्यान्न कसं विकायचं हेही संस्थेत शिकवलं जातं.
शेतकऱ्याने मोलवृद्धी असलेली पिके घ्यावीत म्हणून भुईमुगापासून तेल, दूध, लोणी (पीनट बटर) कसं तयार करायचं, लाल अंबाडीच्या पानांपासून भाजी, फुलांपासून चहा, शीतपेय, मुरांबा, चटणी व त्याच्या खोडाला भिजवून, कुटून त्यापासून तागाचा दोर कसा तयार करून विकायचा, घरात सणावाराला वा इतर वेळी दिवा, समई, पणत्या यासाठी गोडं तेल न वापरता एरंडीचं तेल कसं वापरायचं, देशी गुलाब, मोगरा, तुळस, झेंडू, कढीपत्ता, हळद, पपईसारखी झुडूपवजा झाडं शेताच्या चारी बाजूला कुंपणावर कशी लावायची हे इथं शिकायला मिळतं. या झाडांमुळे पिकांना ओल व गारवा मिळतो. या पिकांच्या विक्रीतून पसाही मिळतो. पालक, मेथी, पुदिना उन्हात वाळवून त्याची भुकटी विकल्यास त्यांना वर्षभर चांगली मागणी असते. हिरव्या पाल्यापेक्षा त्याला पंधरा-वीसपट भाव मिळतो. कचऱ्यापासून व चाऱ्यापासून सुधारित चूल व वीजनिर्मिती कशी होईल, ओट, नाचणी, कारळं यांचे गृहउद्योग प्रकल्प शेतात कसे राबवता येतील, हेही इथे शिकायला मिळतं.
‘शेतातून सरळ ताटात’ हा ग्राहक शेतकरी मेळा आम्ही इंदूरला राबवला. त्यामुळे शेतमालाची थेट विक्री ग्राहकांना झाली आणि पसा सरळ शेतकऱ्यांच्या खिशात गेला.
– अरुण डिके (इंदूर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा