रफाएल्लो साग्झिओ दा डर्बनि ऊर्फ रॅफेल हा रेनेसान्स काळातील प्रसिद्ध इटालियन चित्रकार आणि स्थापत्यकार होता. रॅफेल, मायकेल अॅन्जेलो आणि लिओनार्दो दा िव्हची हे फ्लोरेन्समधील त्रिकूट त्या काळातला सर्वोत्तम कलाकारांचा गट समजला जातो. इ.स. १४८३ ते १५२० अशा केवळ ३७ वर्षांच्या अल्प आयुष्यात रॅफेलने जागतिक दर्जाच्या अनेक कलाकृतींची निर्मिती केली. त्याच्या चित्रकारितेतील रंगसंगती, जिवंतपणा आणि कमालीची आकर्षकता या गुणांमुळे त्याच्या चित्रांची जगातील प्रमुख मोजक्या कलाकृतींमध्ये गणना केली जाते. त्याच्या चित्ररचनेतील विलक्षण परिणामकारकतेचा प्रभाव पुढील कित्येक पिढय़ांमधील चित्रकारांवर पडला. पेरूजा येथील पेरूजिनोच्या कलाशाळेत शिक्षण घेतल्यावर रॅफेलने निर्मिलेल्या ‘व्हिजन ऑफ द नाइट’, ‘द थ्री ग्रेसेस’, ‘द मॅरेज ऑफ व्हर्जनि’ या त्याच्या प्रथम कलाकृती. या चित्रांमुळे प्रसिद्धी मिळाल्यावर तो त्या काळात कला, सांस्कृतिकदृष्टय़ा भरभराटीस आलेल्या फ्लोरेन्समध्ये आला. फ्लोरेन्सने त्याचे कलाजीवन समृद्ध केले. मॅडोना हा रॅफेलचा अत्यंत आवडीचा विषय होता. ‘मॅडोना ऑफ द गोल्ड िफच’, ‘द सिस्टाईन मॅडोना’ अशी अनेक उल्लेखनीय चित्रे त्याने चितारली. मॅडोनाच्या चित्रांमधून स्त्रीसुलभ भावनांचे उत्कट दर्शन रॅफेलनी घडवले. पुढे पोप ज्युलियस दुसरा याच्या आमंत्रणावरून रॅफेल रोमला गेला. रोम येथील व्हॅटिकनमधील सिस्टाईन चॅपेलची जुनी दालने सुशोभित करून तिथे चित्रे रंगविण्याची जबाबदारी रॅफेलवर आली. व्हॅटिकनमध्ये त्याने चितारलेल्या कलाकृतींपकी ‘स्कूल ऑफ अथेन्स’, ‘डिस्प्युटा’, ‘पार्नास’ आणि ‘ज्युरीस्प्रूडन्स’ या सर्वाधिक प्रसिद्ध झाल्या. या चार कलाकृतींपकी ‘स्कूल ऑफ अथेन्स’ने रॅफेलला जागतिक प्रसिद्धी मिळवून दिली. सिस्टाईन चॅपेलमधील सेंट पीटर व सेंट पॉलच्या कथा या रॅफेलच्या चित्र खजिन्यातील एक उत्तम कारागिरी म्हणता येईल. १५१४ ते १५२० या काळात रॅफेल वास्तुशिल्पाच्या क्षेत्रातही विख्यात झाला. ‘सान्ता एलिजीयो देग्ली ऑरेफिसी’, ‘द व्हिला मादामा’, ‘शिगी चॅपेल’ या रॅफेलच्या प्रमुख वास्तुनिर्मिती होत. फ्लोरेन्स व रोम मधील अनेक सुंदर इमारतींचे स्थापत्य रॅफेलचेच आहे.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा