आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. या अनुषंगाने ‘स्फोटक रसायनं’, ‘मद्य आणि मद्यार्क रसायनं’ या विषयावरील लेख या सदरात प्रसिद्ध केले गेले. प्रतिसादावरून हा विषय सर्वसामान्यांना आवडला. पण या विषयांवर आक्षेप घेणाऱ्या वाचकांनी त्यांच्या प्रतिक्रिया निर्भीडपणे मांडल्या. सगळीकडे दहशतवाद चालू असताना स्फोटक रसायनांवर लेख देऊन सर्वसामान्यांना सजग करून त्यात अजून भर घालू नये. दारूचं (मद्याचं) व्यसन ही समाजाला लागलेली कीड आहे. पण हे लेख देण्यामागे कोणताही विषय एक रसायन म्हणून समजून घ्यावा, हा आमचा प्रामाणिक उद्देश होता.
संजीव ठाकर, विनायक रानवडे, चेतन पंडित, विनायक सप्रे, आनंद गिरवलकर यांच्यासारख्या सजग वाचकांनी लेखातील चुका लक्षात आणून दिल्या, तर काहींनी दुरुस्ती सुचवली. काहींनी यापुढे जाऊन लेखकांकडून मार्गदर्शन मिळवलं.
हे लेख संग्रही असावेत या उद्देशानं खूपशा वाचकांनी लेखांची मागणी केली. हे वर्ष संपल्यानंतर रसायनांवरील सर्व लेख लोकसत्तेच्या परवानगीने पुस्तक स्वरूपात प्रकाशित करण्याचा परिषदेचा मानस आहे. या आधीचे कुतूहलचे विषय ‘अभियांत्रिकी जग’ आणि ‘वैद्यक विश्व’ पुस्तक स्वरूपात प्रकाशित झाले आहेत.
भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षांचा अभ्यास करणारे गौरव शहाणे आणि इतर अनेक वाचक विद्यार्थ्यांनी या सदराचा खूप उपयोग होत असल्याचं कळवलं. के. एम.की. कॉलेज-खोपोली-रायगड येथून डॉ. शरद पी. पांचगल्ले यांनी रसायनांविषयीचे विद्यार्थाच्या दृष्टीनं उपयुक्त लेख कॉलेजमध्ये भित्तीपत्रक स्वरूपात वापरण्यासाठी परिषदेकडे परवानगी मागितली, तर वेरळा विकास संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. अरुण चव्हाण यांनी प्रिया लागवणकर यांनी लिहिलेल्या ‘मानवी शरीरातील रसायनं’ या विषयावरील लेखांचा वापर ‘आरोग्याची शाळा’ या त्यांच्या संस्थेच्या कार्यक्रमासाठी करण्याची इच्छा व्यक्त केली. आय.आय.टी.तील प्रा.श्याम असोले म्हणाले, ‘यातील काही लेख मी पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वापरतो.’
काही वाचकांनी मजेशीर प्रतिक्रिया नोंदवल्या. प्रशांत गुप्ते यांनी प्रदूषणाला आळा बसावा म्हणून एक पर्याय सुचवला. तो असा, ज्याप्रमाणे जगभरात ढोबळी मिरची (कॅप्सिकम) वेगवेगळ्या रंगांत उत्पादित केली जाते, त्याच पद्धतीनुसार कापूस विविध रंगात उत्पादित केला, तर कापडाला रंग देण्यासाठी वेगवेगळी रसायनं वापरावी लागणार नाहीत व त्यामुळे काही प्रमाणात प्रदूषण कमी होईल.
लेख आवडल्याचे अनेक वाचकांनी कळवल्यानं आमच्या टीमचा उत्साह वाढत गेला.
भारतातून तसेच परदेशातूनही अनेक प्रतिसाद आले. यासाठी सर्व वाचक वर्गाचे मन:पूर्वक आभार.
शुभदा वक्टे (मुंबई)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा