सदरातील लेख आवडल्याचे अनेक वाचकांनी फोन व ई-मेलने कळविले. सदराची सुरुवात प्रा. एम. एम. शर्मा यांच्या प्रास्ताविकाने आणि नंतर डॉ. वर्षां जोशी यांनी लिहिलेल्या ‘घरगुती रसायनं’ या विषयाने (खायचा सोडा, बेकिंग पावडर, अजिनोमोटो) झाल्याने वाचकांनी उत्सुकतेने स्वागत केले. केवळ वाचून माहिती घेणे हा मर्यादित हेतू न राहता मिळालेल्या माहितीचा वापर ते नेहमीच्या समस्या सोडवण्यासाठी करतात हे दिसून आले. एस. एस. दोशी (ठाणे) यांनी कळवले की, ‘बोअरवेल पाण्याच्या वापरामुळे पाच वर्षांत टॉयलेटच्या फरशा काळ्या पडल्या होत्या. अनेक उपाय केले. पण, आपण सांगितलेल्या व्हाइट व्हिनेगर वापरून साफ केल्याने चांगले परिणाम मिळाले.’  ‘कोलेस्टेरॉल व तेल’ हा लेख वाचून मुलुंडहून डॉ. नागेश टेकाळे यांनी ‘कोलेस्टेरॉलच्या भीतीने आहारातून स्निग्ध पदार्थाना हद्दपार करू नये’ हा मुद्दा सविस्तर कळवला.  
आपले शिक्षण जरी मातृभाषेतून (मराठी) झालेले असले तरी काही मराठी शब्दांचा अर्थ आपल्यालाच कळत नाही. त्याऐवजी जर इंग्रजी शब्द वापरलेला असेल तर त्या गोष्टीचे आकलन लवकर होते. त्यामुळे जरी लेख मराठीतून असला तरी प्रत्येक इंग्लिश शब्दाला मराठी शब्दाचा अट्टहास नसावा, पर्यायी इंग्रजी शब्दही द्यावा असा आग्रह चेतन पंडित (जलप्रकल्पतज्ज्ञ), विजय हरचेकर, सुनीत पोतनीस (नाशिक) इ. अनेक वाचकांनी केला. या सदरासाठी रोजच्या वापरातील पदार्थ व त्या पदार्थाच्या अनुषंगाने त्या पदार्थात असलेली किंवा तो पदार्थ तयार करताना वापरलेली रसायने यांची माहिती करून देण्याचा प्रयत्न होता.  प्रतिसादांवरून कळत होते की, वाचकांना हे सदर आवडतेय. पण केवळ माहिती घेणे हाच उद्देश त्यांचा नव्हता. काहींना त्या त्या रसायनांचे उत्पादन करण्याचे मार्गदर्शन हवे होते; मात्र हे सदराच्या उद्देशांशी सुसंगत ठरले नसते. रसायनशास्त्रात मोलाचे कार्य करूनही अप्रसिद्ध राहिलेल्या भारतीय रसायन-शास्त्रज्ञांवरील लेख अ. पां. देशपांडे यांनी लिहिले. वाचकांनी आपल्या माहितीतील भारतीय रसायनशास्त्रज्ञांची माहिती पाठवली, जेणेकरून भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले काम समाजापुढे यावे. डॉ. कोकटनूर यांच्यावरील लेख वाचून त्यांचे चुलतनातू – डॉ. पी. के. कोकटनूर यांनी आपला प्रतिसाद मेलद्वारे कळवला, त्याबरोबर त्यांच्या संबंधित माहितीही दिली. प्रा. लिमये यांच्यावरील लेखामुळे ‘रसायन  निधी’साठी मदत मिळण्यास मदत झाली. या शास्त्रज्ञांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणी जागृत झाल्याचे कळवले. तसेच प्रा. हलदर यांच्यावरच्या लेखाचा आग्रह धरला.
शुभदा वक्टे (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा- पिसारा.. फुललेलाच!
माझ्या मित्र-मत्रिणींमध्ये राजेन्द्रचा एक शब्द-प्रयोग फार लोकप्रिय आहे. शब्द-प्रयोग कसला, तत्वज्ञानच ते !  तो म्हणजे, ‘बघ ना !’  एखादं काम त्यानं करणं ठरलेलं असतं. पण तो ते करत नाही: अशा वेळेला त्याला विचारणा केली,की बुवा तू तर म्हणाला होतास की ते फलाणं काम तू करशील/ होईल. मग ते झालं कसं नाही? तर अतिशय सरळ चेहेरयानं ,काहीसं अचंबित होत तो महणतो, ‘बघ ना!’ त्यात जराही नाटक नसतं. असते ती आपल्या कर्तबगारीप्रमाणे आपल्या त्रुटींकडेही पाहण्याची एक निरीच्छ निरोगी वृत्ती! स्वत:च्या वाढदिवसाच्या सकाळी उठून मला आवर्जून म्हणेल, ‘अर्र्र, परत तुझ्या  वाढदिवसाची गिफ्ट विसरलो त्याबद्दल सॉरी हं. पण अरेच्चा, आज नाही तरी तुझा वाढदिवस नाहीच्चे, नाही का !’ आणि माझ्या वाढदिवसाला ? स्वत: नवीन शर्ट घालून येईल आणि मला म्हणेल, ‘असे कपडे तुला फार आवडतात ना? म्हटलं तुझ्या वाढदिवसाला तुझ्या पसंतीच्या गोष्टी कराव्या !!’ हमखास चुकीच्या कारणासाठी सॉरी म्हणेल, आणि सॉरी म्हणायचं, तिथे चिडचिड करेल . ‘मला घर हवं असतं ते राहण्यासाठी; तुला त्याच्यात संसार वगरे कशाला करायचा असतो बुवा?’ अशी निरागस पृच्छा तो करू शकतो.
या आणि अशा बऱ्याच गोष्टी करून तो निभावून नेऊ शकतो.
मनमोराच्या पिसाऱ्याच्या सदाबहार प्रसन्नपणाचं रहस्य या निरोगी निरीच्छ अनाग्रहीपणामध्ये दडलेलं आहे. अशा अनाग्रहीपणातून जे स्वातंत्र्य त्याला स्वत:ला घेता येतं, आणि दुसऱ्यालाही देता येतं, ते निव्वळ झकास! उदाहरण द्यायचं, तर बुद्ध विचार हा त्याच्या आस्थेचा विषय. त्यांचं चिंतन, मनन, याबद्दल त्याला सखोल जाण, आणि विश्वास. पण पालीमधली ती वचनं आणि उच्चार कानांना गंमतशीरच वाटतात. त्याची चेष्टा करत, मुलात मूल होऊन खो खो हसणाराही तोच ! विपश्यनेहून परत येतानाची गोष्ट. पंधरा दिवस सतत मौन पाळल्यानंतर त्याला खरं तर खूपच शांतपणाची गरज होती. पण परत येताना गाडीमध्येच सुयशनं- आमच्या मुलानं, त्याच्याशी विपश्यनेबद्दल वाद-विवाद केला. सुयश तेव्हा केवळ एक शाळकरी बच्चा होता. पण राजेन्द्रनं तो  वाद-विवाद त्याला करू दिला. वर त्याचे काही मुद्दे दिलखुलासपणे मान्यही केले.
विसराळूपणा, वेंधळेपणा, विक्षिप्तपणा, लहरीपणा, बेभरवशाचं असणं, इत्यादी मातीच्या पायांचा कोटा तसा त्याच्याकडेही आहे. टू बी फेअर, कामाचा व्याप लक्षात घेता सूतभर वाढीव कोटय़ासाठी तसा  तो एलिजिबल आहे. मातीचे पाय काय सर्वाचेच असतात. त्या पायांच्या लाथाळ्याही सर्वामध्ये चालूच असतात. पण त्या पायांच्यावर दिल और दिमाग भी तो होता है! तो कसला आहे हे अधिक महत्त्वाचं ! तो दिल आणि दिमाग उमदा आणि तल्लख असल्याचा अपना थर्टी इयर्स से भी जादा एक्सपिरिअन्स है !
साध्या-सुध्या गांजलेल्या पेशंटपासून, ते विशेष हुषार, प्रसिद्ध, वलयांकित लोकांपर्यंत अनेकांशी त्याचा संबंध येतो, आणि अनेकांना तो मदत करतो. किती जण त्याला भारावून जाऊन देवपण बहाल करतात. पण या साऱ्याचा तोरा त्याच्या कधी मनालाच शिवत नाही, तिथे त्याच्या वागण्यात तो कसा येणार! आपण बरं, आपल काम बरं, आणि हो, आपली धम्माल तर चांगलीच बरी, असा त्याचा मामला! त्यामुळेच जुनं पुराणं बॅगेज बाळगायचंच नाही; कुठेही अडकून न पडता, कुठली मुल्यं जपायची, आणि आयुष्याच्या फ्लो बरोबर पुढे कसं जायचं, याविषयी त्याची सहसा गल्लत होत नाही.
आपल्याकडे बरंच काही आहे, ते ना मिरवण्यासाठी, ना त्याच्या भाराखाली स्वतला गुदमरवण्यासाठी. हे तर आपल्या निखळ आनंदासाठी. तर त्याची नम्र जाणीव ठेवून त्या पासून अलिप्त असणं, आणि त्याच वेळी ते समरसून जगणं, असा त्याच्या मनमोराचा पिसारा बहुधा स्वान्तसुखाय फुललेलाच असतो !
ललिता बर्वे द्वारा : drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व- आजच्या प्रश्नांच्या आकलनासाठी विचारांचा वारसा
एकोणिसाव्या शतकाला ‘प्रबोधनाचे शतक’ म्हटले जाते. त्याचे कारण या शतकाच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रात सर्वागीण चिकित्सेला सुरुवात झाली. त्यातून महाराष्ट्रात वैचारिक क्रांती म्हणावी असे वातावरण तयार झाले. हा प्रबोधनाचा जागर शतकभर चालू राहिला. एवढेच नव्हे तर विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत तो कमी-अधिक फरकाने चालत राहिला. या कालावधीत त्याचा प्रवाह काहीसा धीमा होत गेला असला तरी त्यातून महाराष्ट्राची बौद्धिक मशागत करण्याचे काम  झाले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र या प्रबोधन प्रवाहाला बरीच ओहोटी लागत गेली. आज एकविसाव्या शतकात तर सभोवताली जे काही घडत आहे, ते पाहिल्यावर कधी काळी महाराष्ट्र उदारमतवादी, सहिष्णू आणि विवेकी होता, याचेच नवल वाटू लागते.  
हेही तितकेच खरे की संस्कृतीचा प्रवाह सदासर्वकाळ सारख्याच जोमाने चालू राहत नाही. त्याला मध्ये मध्ये खीळ बसते, आडवळणांचा सामना करावा लागतो. गतिरोधकांशी झुंजावे लागते. न्या. रानडे यांनी आयुष्यभर उदारमतवादाचा पाठपुरावा केला. तो रुजवण्याचेही प्रयत्न केले. पण त्यांना त्यात फारसे यश आले नाही. आजची परिस्थिती तर आणखीनच बिकट आहे. विवेकापेक्षा आगपाखड, सामंजस्यापेक्षा हमरीतुमरी आणि चर्चेपेक्षा हातघाई असा क्रमबदल झाला आहे. तो पुन्हा पूर्ववत करायचा असेल तर वैचारिक सामर्थ्यांची, नीतिमूल्यांची, विचार-विवेकाची कास धरावीच लागेल. त्यासाठी रीतसर पण कठोर प्रयत्न करावे लागतील.
या प्रयत्नांना पाठबळ येण्यासाठी १९व्या आणि २०व्या शतकातल्या विचार-वारशाची उजळणी करावी लागेल. त्याचे धडे पुन्हा गिरवावे लागतील. आजच्या प्रश्नांना आजच्याच पद्धतीने उत्तरे शोधावी लागतील. पण त्याचे अधिष्ठान या शतकांतील प्रबोधनपुरुषांकडून घ्यावे लागेल. कारण आजचे प्रश्न हे बऱ्याच प्रमाणात कालचेही होते. तेव्हा त्यांचा कशा प्रकारे सामना केला गेला, त्यासाठी कोणत्या दिशेने प्रयत्न झाले, हे समजून घेतल्याशिवाय आजच्या प्रश्नांचे साकल्याने आकलन होऊ शकणार नाही. वर्तमानाचे यथायोग्य आकलन करून घेण्यासाठी इतिहासासारखा चांगला शिक्षक असू शकत नाही.

Story img Loader