सदरातील लेख आवडल्याचे अनेक वाचकांनी फोन व ई-मेलने कळविले. सदराची सुरुवात प्रा. एम. एम. शर्मा यांच्या प्रास्ताविकाने आणि नंतर डॉ. वर्षां जोशी यांनी लिहिलेल्या ‘घरगुती रसायनं’ या विषयाने (खायचा सोडा, बेकिंग पावडर, अजिनोमोटो) झाल्याने वाचकांनी उत्सुकतेने स्वागत केले. केवळ वाचून माहिती घेणे हा मर्यादित हेतू न राहता मिळालेल्या माहितीचा वापर ते नेहमीच्या समस्या सोडवण्यासाठी करतात हे दिसून आले. एस. एस. दोशी (ठाणे) यांनी कळवले की, ‘बोअरवेल पाण्याच्या वापरामुळे पाच वर्षांत टॉयलेटच्या फरशा काळ्या पडल्या होत्या. अनेक उपाय केले. पण, आपण सांगितलेल्या व्हाइट व्हिनेगर वापरून साफ केल्याने चांगले परिणाम मिळाले.’ ‘कोलेस्टेरॉल व तेल’ हा लेख वाचून मुलुंडहून डॉ. नागेश टेकाळे यांनी ‘कोलेस्टेरॉलच्या भीतीने आहारातून स्निग्ध पदार्थाना हद्दपार करू नये’ हा मुद्दा सविस्तर कळवला.
आपले शिक्षण जरी मातृभाषेतून (मराठी) झालेले असले तरी काही मराठी शब्दांचा अर्थ आपल्यालाच कळत नाही. त्याऐवजी जर इंग्रजी शब्द वापरलेला असेल तर त्या गोष्टीचे आकलन लवकर होते. त्यामुळे जरी लेख मराठीतून असला तरी प्रत्येक इंग्लिश शब्दाला मराठी शब्दाचा अट्टहास नसावा, पर्यायी इंग्रजी शब्दही द्यावा असा आग्रह चेतन पंडित (जलप्रकल्पतज्ज्ञ), विजय हरचेकर, सुनीत पोतनीस (नाशिक) इ. अनेक वाचकांनी केला. या सदरासाठी रोजच्या वापरातील पदार्थ व त्या पदार्थाच्या अनुषंगाने त्या पदार्थात असलेली किंवा तो पदार्थ तयार करताना वापरलेली रसायने यांची माहिती करून देण्याचा प्रयत्न होता. प्रतिसादांवरून कळत होते की, वाचकांना हे सदर आवडतेय. पण केवळ माहिती घेणे हाच उद्देश त्यांचा नव्हता. काहींना त्या त्या रसायनांचे उत्पादन करण्याचे मार्गदर्शन हवे होते; मात्र हे सदराच्या उद्देशांशी सुसंगत ठरले नसते. रसायनशास्त्रात मोलाचे कार्य करूनही अप्रसिद्ध राहिलेल्या भारतीय रसायन-शास्त्रज्ञांवरील लेख अ. पां. देशपांडे यांनी लिहिले. वाचकांनी आपल्या माहितीतील भारतीय रसायनशास्त्रज्ञांची माहिती पाठवली, जेणेकरून भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले काम समाजापुढे यावे. डॉ. कोकटनूर यांच्यावरील लेख वाचून त्यांचे चुलतनातू – डॉ. पी. के. कोकटनूर यांनी आपला प्रतिसाद मेलद्वारे कळवला, त्याबरोबर त्यांच्या संबंधित माहितीही दिली. प्रा. लिमये यांच्यावरील लेखामुळे ‘रसायन निधी’साठी मदत मिळण्यास मदत झाली. या शास्त्रज्ञांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणी जागृत झाल्याचे कळवले. तसेच प्रा. हलदर यांच्यावरच्या लेखाचा आग्रह धरला.
शुभदा वक्टे (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा