अनघा शिराळकर
भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. भूकंप घडून येण्याचे कारण समजण्यासाठी आपण हे लक्षात घ्यायला हवे, की पृथ्वी मूलत: तीन आवरणांनी बनली आहे. पृथ्वीच्या गोलाच्या मध्यभागी गाभा असून त्याची त्रिज्या सुमारे ३५०० किमी आहे. त्यावरच्या आवरणाला प्रावरण म्हणतात. त्याची जाडी सुमारे २९०० किमी आहे, आणि त्यावर, म्हणजे सर्वात वरती, ४० ते १०० किमी जाडीचे खडकांचे कवच किंवा शिलावरण आहे.
काही तुकडे एकत्र जोडून एखाद्या चित्राची जुळणी करण्याचा मुलांचा एक खेळ (जिगसॉ पझल) असतो. अगदी तसेच पृथ्वीचे कवच आणि प्रावरणाचा वरचा थर सात प्रचंड मोठ्या, आणि आठ लहान तुकड्यांमध्ये विभागलेला आहे. या तुकड्यांना भूपट्ट म्हणतात. भूपट्टांच्या कडा खडबडीत असून मुलांच्या चित्रजुळणीच्या खेळातल्या तुकड्यांप्रमाणे त्या एकमेकांत घट्ट अडकलेल्या असतात. भूगर्भातील हालचालींमुळे काही ठिकाणी दोन भूपट्ट एकमेकांकडे ओढले जातात, काही ठिकाणी भूपट्ट एकमेकांपासून दूर ढकलले जातात. अन्य काही ठिकाणी दोन भूपट्टांच्या कडा एकमेकांवर घासल्या जातात.
या हालचालींमुळे खडकांमध्ये ताण निर्माण होतो, आणि तो वाढतच जातो. तो सहन करण्याची खडकांची जी मर्यादा असते; ती ओलांडून ताण वाढला की तिथल्या खडकांना प्रचंड मोठा तडा जातो. तड्याच्या दोन्ही बाजूंचे खडक एकमेकांवर घासत विरुद्ध दिशांना सरकतात. खडकांमधल्या या संरचनात्मक बदलाला प्रस्तरभंग म्हणतात.
प्रस्तरभंग झाल्याक्षणी खडकांवरचा ताण नाहीसा होतो आणि त्यातून खूप मोठी ऊर्जा मुक्त होते. ती आसमंतातल्या पाषाणप्रस्तरांना प्रभावित करते. याचा परिणाम म्हणून एखाद्या तळ्यातल्या संथ पाण्यात दगड टाकला, तर पाण्यात तरंग निर्माण होतात, तसे पृथ्वीच्या पाषाणप्रस्तरांमध्ये तरंग निर्माण होऊन ते कंप पावू लागतात. त्यालाच आपण भूकंप म्हणतो. ज्या कंपन लहरी निर्माण होतात त्यांना भूकंप लहरी म्हणतात. या लहरींमुळे अगदी अल्पकाळ काही सेकंद किंवा एखादे मिनिट पृथ्वीच्या फार मोठ्या भागातली जमीन अक्षरश: हादरते. त्याचे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. घरे कोसळतात, जमिनीला भेगा पडतात, रस्ते आणि रेल्वेमार्ग यांची दुर्दशा होते, विजेचे खांब पडून विद्याुत् सेवा खंडित होते, जीविताची आणि मालमत्तेची अपरिमित हानी होते.
जमिनीखाली जिथे या लहरी निर्माण होतात त्या स्थानाला भूकंपाची नाभी (फोकस) म्हणतात. नाभीच्या नेमक्या वर असणाऱ्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या बिंदूला भूकंपाचा केंद्रबिंदू (एपिसेंटर) म्हणतात. भूकंपाच्या कंपन लहरी या नाभीपासून सर्व दिशांना पसरतात.
अनघा शिराळकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org