महाराष्ट्राच्या ८० टक्के क्षेत्रात ज्वालामुखीजन्य काळा कातळ आढळतो. कोकणही याला अपवाद नाही. पण कोकणात बऱ्याच ठिकाणी, आणि घाटावरही काही ठिकाणी काळय़ा कातळावर ऊन, वारा, पाऊस यांचा परिणाम होऊन निर्माण झालेला जांभा पाषाण काळय़ा कातळाच्या जोडीने आढळतो. तथापि एकसंध दिसणाऱ्या काळय़ा कातळापासून लालसर रंगाचा, कुठे कुठे पांढुरक्या रंगाचे पट्टे असणारा, जागोजागी छिद्रे पडलेला जांभा पाषाण तयार होत असेल हे पटत मात्र नाही.
तापमान आणि पावसाचे प्रमाण जास्त असते अशा प्रदेशातच जांभा दगड तयार होतो. असा प्रदेश म्हणजे उष्ण कटिबंधाचा पट्टा. या पट्टय़ात उन्हाळा अत्यंत तीव्र असतो. अगदी ऐन हिवाळय़ातही तापमान फार खाली जात नाही. हवेतील बाष्पाचे प्रमाणही खूप असते आणि पाऊसही अफाट पडतो. त्यामुळे उष्ण कटिबंधातल्या खडकांचे रासायनिक विघटन प्रभावीपणे होते. खडकांच्या रासायनिक विघटनाला भूजलाचाही हातभार लागतो.
खडकांच्या विघटनातून निर्माण झालेल्या पदार्थापैकी काही भाग पावसाळय़ात पाण्याबरोबर वाहून जातो. त्यात सोडिअम आणि कॅल्शिअम यांच्या क्षारांचा समावेश असतो. ते पाण्यात विरघळल्याने त्या पाण्याची रासायनिक क्षमता इतकी वाढते की खडकातल्या खनिजांच्या विघटनामुळे बाहेर पडलेल्या सिलिकाचा (सिलिकॉन डाय ऑक्साइड) काही भागदेखील त्यात विरघळतो, आणि वाहून जाणाऱ्या क्षारांबरोबर सिलिकाही काही प्रमाणात निघून जाते. खडकाच्या मूळ रासायनिक घटकांपैकी काही घटक अशा रीतीने निघून जातात; आणि लोहाचे हायड्रॉक्सॉइड, अॅल्युमिनिअमचे हायड्रॉक्सॉइड आणि उर्वरित सिलिका ही न विरघळणारी रसायने मागे उरतात. लोहाच्या हायड्रॉक्सॉइडमुळे मागे राहिलेल्या रसायनांच्या या मिश्रणाला गडद तांबडी छटा येते आणि अॅल्युमिनिअमच्या हायड्रॉक्सॉइडमुळे पांढुरके पट्टे तयार होतात.
मूळ खडकाच्या अगदी वरच्या काही भागापुरताच हा बदल मर्यादित असला, तरी खडकाचा जो भाग बदलतो, तो इतका बदलतो की मूळ खडकाच्या कुठल्याही खाणाखुणा शिल्लक राहात नाहीत. तिथे नवीनच खडक अवतरतो. त्या नव्या खडकाचे इंग्रजी नाव लॅटेराइट. मराठीत आपण त्याला ‘जांभा’ किंवा ‘जांभा पाषाण’ म्हणतो.
जांभा पाषाण फक्त काळय़ा कातळापासूनच तयार होतो असे नाही. भारतातही आणि भारताबाहेरही, तो अन्य खडकांपासूनसुद्धा तयार होतो. म्हणून काळा कातळ सोडून अन्य काही खडकांपासून तयार झालेला जांभा पाषाण गोवा, कर्नाटक, केरळ या पश्चिम किनाऱ्यालगतच्या राज्यांमध्ये आणि अन्य काही राज्यांमध्येही आढळतो.
– -डॉ. कांतिमती कुलकर्णी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org