डॉ. श्रुती पानसे
जर आपण आपल्या बृहद् कुटुंबातल्या शंभर लोकांची छायाचित्रं गोळा करून त्यांचं निरीक्षण केलं, तर आपल्या असं लक्षात येतं की, जगभरात जेवढे वंश आहेत- त्यांची चेहरेपट्टी, केसांचा पोत, डोळ्यांचा रंग, आकार, त्वचेचा रंग, उंची, हाता-पायांची ठेवण, नाक, भुवया यातली कोणती ना कोणती वैशिष्टय़ं आपल्याला आपल्याच कुटुंबामध्ये दिसून येतील. उदाहरणार्थ, काहींचे कुरळे केस असतात, काहींच्या शरीरावर गुलाबी रंगाचे ठिपके असतात, तर काहींच्या डोळ्यांची ठेवण जपानी व्यक्तीसारखी असते.
मुलांमधली ही वैशिष्टय़ं आपण आई, बाबा, काका, मामा, मावशी, आत्या, आजी, आजोबा यांच्यात शोधतो. आपल्या पूर्वजांची वैशिष्टय़ं ही केवळ एक-दोन पिढय़ा मागे जाऊन नाही, तर कित्येक शतकं मागच्या गुणसूत्रांच्या माध्यमातून पिढय़ान्पिढय़ांच्या प्रवासातून आलेली असू शकतात.
कित्येक शतकांपूर्वी- सहस्रकांपूर्वी आपले पूर्वज नक्की कोण होते, हे कोणाला सांगता येईल?
मुळातला मानववंश हा एकच आहे, ज्याला आपण शास्त्रीय भाषेत ‘सेपियन्स’ म्हणतो. हाच वंश जगामध्ये अनेक ठिकाणी विखुरला गेला. अनेकदा एकत्रही आला. परस्परांमध्ये गुणसूत्रांची देवाणघेवाण झाली, होत राहिली आणि पुढेही होत राहील.
जिथं माणसांच्या टोळ्या गेल्या, तिथल्या हवामानानुसार, प्राणीजीवनानुसार, त्या ठिकाणच्या नसर्गिक आव्हानांना तोंड देत माणसामध्ये काही बदल होत गेले. विशिष्ट संकटांचा सामना करण्यासाठी म्हणूनही हे बदल झाले. उदा. बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्यांनी अतिथंडीचा सामना केला, तसा उष्णकटिबंधात राहणाऱ्यांनी उष्णतेचा सामना केला. या सगळ्या परिस्थितीला पूरक अशी त्याची शरीररचना झाली. हीच उत्क्रांती आजही चालू आहे. पूर्वी कच्चं मांस खाण्यासाठी माणसाचा जबडा मोठा होता, तर आज शिजलेले पदार्थ खाण्यासाठी जबडय़ाचा आकार आणि तसे दात राहिले नाहीत. अशा प्रकारे मानवी जीवनात या पुढच्याही काळात बदल होत जाणार आहेत.
मानववंशाच्या इतिहासात अलीकडच्या काळामध्ये धर्म, जात यांचा शिरकाव झाला. या गोष्टींमुळे जरी माणसांमध्ये भेद तयार झाला असला, तरीही मुळातले आपण ‘सेपियन्स’ आहोत आणि त्यामुळेच एकमेकांची जवळची किंवा लांबची भावंडंही आहोत!
contact@shrutipanse.com