त्सुनामी हा जपानी शब्द असून त्याचा अर्थ आहे बंदरातल्या लाटा. पण आता त्या शब्दाला ‘विध्वंसक महाकाय लाटा’ असा अर्थ प्राप्त झाला आहे. सागरतळावर होणारा ज्वालामुखीचा उद्रेक, समुद्रातले भूस्खलन, समुद्रातला अशनीपात अशा कारणांनीही त्सुनामी होऊ शकते. पण त्सुनामी घडून येण्याचे प्रमुख कारण म्हणजे भूकंपाचा केंद्रबिंदू सागरतळाशी असणे हे आहे. लाटांचा अतितीव्र जोर, आणि किनारा सोडून खूप आत येण्याची त्यांची क्षमता, या कारणांनी त्सुनामीमुळे होणारी जीवितहानी आणि वित्तहानी प्रचंड असते.
हिंद महासागरात २६ डिसेंबर २००४ रोजी झालेला, रिश्टर श्रेणीवर ९.१ तीव्रता असणारा भूकंप अंगावर काटा आणणाऱ्या त्सुनामीसाठी कारणीभूत ठरला. या भूकंपाची नाभी (फोकस) हिंद महासागरात, सुमात्रा बेटाच्या उत्तरेला १६९ किमी अंतरावर, भूगर्भात ३० किमी खोल होती. हा भूकंप स्थानिक वेळेनुसार ७ वाजून ५९ मिनिटांनी झाला.
या भूकंपात सुमात्रा बेटाचे आणि अंदमान द्वीपपसमूहाचे भयानक नुकसान झाल्याने त्याला ‘सुमात्रा-अंदमान भूकंप’ असे नाव दिले गेले. या महाभयंकर त्सुनामीची झळ १४ देशांना पोहोचली. ताशी ८०० किमी वेगाच्या आणि ३० मी. उंचीच्या लाटांमुळे हिंद महासागराच्या किनारपट्टीवरच्या इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, श्रीलंका, सेशेल्स, सोमालिया, मालदीव, बांगलादेश, म्यानमार या देशातल्या किनारपट्टीला लागून असणाऱ्या टापूंचा पुरता विध्वंस झाला. भारताच्या तमिळनाडूचे आणि अंदमान-निकोबार बेटांचेही अतोनात नुकसान झाले. या त्सुनामीमध्ये दोन लाख ३० हजार लोकांचा मृत्यू झाला. १ लाख ७२ हजार घरे उद्ध्वस्त होऊन लाखो लोक बेघर झाले. २१ व्या शतकातील ही सर्वांत विध्वंसक नैसर्गिक आपत्ती होती.
या भूकंपाची नाभी असणारा सुमात्रानजीकचा भाग दोन भूकंपप्रवण पट्ट्यांच्या सांध्यावर येतो. त्यातला एक पट्टा म्हणजे ‘पॅसिफिकभोवतीचे अग्निकंकण’ (सर्कम-पॅसिफिक रिंग ऑफ फायर), तर दुसरा म्हणजे अल्पाइड पट्टा (अल्पाइड बेल्ट) होय. हा पट्टा जावा-सुमात्रा बेटांपासून सुरू होऊन हिमालयाकडे येतो, आणि पुढे भूमध्य समुद्रातून अटलांटिक सागरापर्यंत जातो. नाभीच्या या स्थानामुळेच हा भूकंप महत्ता (मॅग्निट्यूड) आणि तीव्रता (सिव्हिरिटी), दोन्ही बाबतींत महाभयानक ठरला.
भूपट्टांच्या भूपृष्ठाखालच्या हालचालींमुळे भूकंप होत असतात. ज्या भूपट्टांवर भारतीय द्वीपकल्प विसावलेला आहे तो भारतीय भूपट्ट, म्यानमार ज्यावर विसालेला आहे त्या बर्मा भूपट्टाखाली सरकल्याने हा भूकंप झाला. तसेच भूपट्टांच्या कडांच्या हालचालींमुळे महासागराचा तळ कित्येक मीटर वर उचलला गेल्याने त्सुनामीला चालना मिळून तिथून सुमारे ३० घन किमी पाणी चहुदिशांकडे घोंघावत गेले.
– अनघा शिराळकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org