अत्यंत विक्षिप्तपणात वरचा क्रमांक असणाऱ्या रोमन सम्राटांमध्ये कॅलिग्युला याने इ.स. ३७ ते ४१ अशी पाच वष्रे राज्यकारभार केला. सुरुवातीचे काही दिवस संयमाने वागणारा कॅलिग्युला हा विदूषक, नट, रथसारथी यांच्या संगतीत राहू लागला, उधळपट्टी करू लागला, स्त्रियांचा नाद पराकोटीला पोहोचला. खजिन्यातले पसे कमी पडू लागल्यावर ते मिळविण्यासाठी श्रीमंतांवर खोटे गुन्हे लादून कॅलिग्युला त्यांना न्यायाधीशांतर्फे देहान्ताची शिक्षा देऊ लागला. शिक्षा दिल्यावर त्यांची मालमत्ता जप्त करून बायकामुलांना गुलाम करू लागला, मांडलिक राजांना विषप्रयोग करून त्यांची राज्ये हडप करू लागला. स्वत:ला देवाचा अवतार मानून रोमन जनतेने आपल्या मूर्तीची पूजा घरोघरी करण्याचे फर्मान कॅलिग्युलाने काढले, स्वत:ची मंदिरेही बांधून घेतली. दिवसा कॅलिग्युला ज्युपिटर या देवाशी बोलण्याचे नाटक करी तर रात्री चंद्राला आमंत्रण देऊन त्याच्याशी बोलतोय असे दाखवी! कॅलिग्युलाला अनेक बहिणी होत्या. त्यांच्याशी याचे नाते प्रेयसी अगर पत्नीचे होते! द्रुशिला या त्याच्या थोरल्या बहिणीचा विवाह एका श्रीमंताशी झाला होता. त्याच्यापासून तिला त्याने पळवून पत्नीसारखा व्यवहार करू लागला. या बहिणीचा मृत्यू झाल्यावर कॅलिग्युलाने सक्तीचा दुखवटा पाळायला लावून सार्वजनिक भोजन, स्नान करणे, हास्य करण्यावर बंदी घातली. ती बंदी मोडल्यामुळे १७ लोकांना देहान्ताची शिक्षा दिली! कॅलिग्युला कधीकधी स्त्री वेषात राही! फोरममध्येही तो काही वेळा स्त्री वेषात येई. कॅलिग्युलाच्या जवळचा मित्र मार्को त्याला त्याच्या वर्तणुकीबद्दल नेहमी नाराजी व्यक्त करी. एकदा मार्को हा कॅलिग्युलाला स्वत:ला देव मानू नकोस, इतर स्त्रियांवर व्यभिचार करू नकोस असे सांगताच त्याने मार्को आणि त्याच्या पत्नीला यमसदनाला पाठवून त्यांनी आत्महत्या केल्याचे घोषित केले. कॅलिग्युलाच्या व्यभिचारामुळे बेजार झालेल्या कान्रेलियस आणि कॅसियस या सिनेटर्सनी जानेवारी ४१ मध्ये त्याचा गळा दाबून खून केला.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
निळ्या निळाईचा नीलमोहोर
जॅकरांडाच्या वृक्षावर फळं-फुलं नसतील तर वरवर पाहणाऱ्याला तो गुलमोहोर आहे, असंच वाटेल, इतकं जॅकरांडात आणि गुलमोहोरात साम्य आहे. म्हणूनच जॅकरांडाला नीलमोहोर किंवा निळा गुलमोहोर म्हटलं जातं. पण हा गुलमोहोराच्या फॅबेसी (कांचन) कुटुंबातला नसून बिग्नोनिएसी कुटुंबातला आहे. जॅकरांडाचं शास्त्रीय नाव ‘जॅकरांडा मायमोसिफोलिया’. पानं लाजाळूसारखी बारीक म्हणून मायमोसि.
गुलमोहोरासारखं हिरवंगार, पिसासारखं संयुक्त पान, टोकावर एकच पर्णिका (गुलमोहोराच्या पानाच्या टोकाला दोन पर्णिका असतात.) टोकेरी उपपर्णिकांमुळे जॅकरांडाच्या पर्णिका नेच्याच्या पानांसारख्या दिसतात. जॅकरांडा ५ ते १५ मीटपर्यंत वाढतो. कोवळा असताना गळगुळीत हिरव्या सालीच्या जॅकरांडावर वयोपरत्वे प्रौढत्वाच्या खुणा दिसू लागतात. तो खडबडीत, काळपट, निबर, अस्ताव्यस्त आणि बेढब दिसायला लागतो. थंडीत पानगळ होते. पण जसजशी हवा तापू लागते, तसतशा पानांबरोबर कळ्याही उमलायला लागतात आणि बेंगरूळ वाटणारा वृक्ष सुंदर दिसायला लागतो.
मार्च-मेमध्ये संपूर्ण वृक्ष मंद सुवासाच्या निळ्या रंगाच्या अनेक छटांच्या फुलांनी लगडून जातो, की त्या निळाईतच हरवून जावं. सहा-सात सें.मी. लांबीचं लवदार नाजूक फूल, पाकळ्या एकत्र जुळल्यामुळे सनईसारखं दिसतं. देठाजवळ फुगीर, गोलाकार नळी, मध्यभागी पसरट-चपट पण बाकदार असतं. त्यामुळे पुढचा भाग उचलल्यासारखा दिसतो. फूल पाच पाकळ्यांचं आहे, हे सांगणाऱ्या पाकळ्या दिसतात. नळीच्या आतच पुंकेसर-स्त्रीकेसर असतात, त्यामुळे स्वपरागणाची हमी.
बहरानंतर हिरवी, पुरीसारखी गोल फळं झाडावर मिरवायला लागतात. कालांतराने ती कठीण, तपकिरी होतात. फळ तडकून दोन भागांत उकलतं नि त्यातून ‘पंख’ असलेल्या बिया बाहेर पडतात. बिया बाहेर पडल्या तरी फळाची कवचं मात्र झाडांवर बरेच दिवस राहतात.
मूळ ब्राझील आणि अर्जेटिनात असलेल्या या वृक्षाचा उपयोग आपल्याकडे फक्त शोभेचा वृक्ष यापलीकडे नाही. पण द. अमेरिकेत साल-पाने उपदंशावर तसेच लघवी करताना होणाऱ्या वेदना कमी होण्यासाठी वापरतात. पानांचा काढा हृद्रोगावर देतात, चूर्ण जखमेवर लावतात, सालीचा काढा जखमा धुण्यासाठी वापरतात. लाकूड मध्यम कठीण व सुबक असल्यानं हत्यारांच्या मुठी व दांडे करण्यास वापरलं जातं.
– चारुशीला जुईकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org