अत्यंत विक्षिप्तपणात वरचा क्रमांक असणाऱ्या रोमन सम्राटांमध्ये कॅलिग्युला याने इ.स. ३७ ते ४१ अशी पाच वष्रे राज्यकारभार केला. सुरुवातीचे काही दिवस संयमाने वागणारा कॅलिग्युला हा विदूषक, नट, रथसारथी यांच्या संगतीत राहू लागला, उधळपट्टी करू लागला, स्त्रियांचा नाद पराकोटीला पोहोचला. खजिन्यातले पसे कमी पडू लागल्यावर ते मिळविण्यासाठी श्रीमंतांवर खोटे गुन्हे लादून कॅलिग्युला त्यांना न्यायाधीशांतर्फे देहान्ताची शिक्षा देऊ लागला. शिक्षा दिल्यावर त्यांची मालमत्ता जप्त करून बायकामुलांना गुलाम करू लागला, मांडलिक राजांना विषप्रयोग करून त्यांची राज्ये हडप करू लागला. स्वत:ला देवाचा अवतार मानून रोमन जनतेने आपल्या मूर्तीची पूजा घरोघरी करण्याचे फर्मान कॅलिग्युलाने काढले, स्वत:ची मंदिरेही बांधून घेतली. दिवसा कॅलिग्युला ज्युपिटर या देवाशी बोलण्याचे नाटक करी तर रात्री चंद्राला आमंत्रण देऊन त्याच्याशी बोलतोय असे दाखवी! कॅलिग्युलाला अनेक बहिणी होत्या. त्यांच्याशी याचे नाते प्रेयसी अगर पत्नीचे होते! द्रुशिला या त्याच्या थोरल्या बहिणीचा विवाह एका श्रीमंताशी झाला होता. त्याच्यापासून तिला त्याने पळवून पत्नीसारखा व्यवहार करू लागला. या बहिणीचा मृत्यू झाल्यावर कॅलिग्युलाने सक्तीचा दुखवटा पाळायला लावून सार्वजनिक भोजन, स्नान करणे, हास्य करण्यावर बंदी घातली. ती बंदी मोडल्यामुळे १७ लोकांना देहान्ताची शिक्षा दिली! कॅलिग्युला कधीकधी स्त्री वेषात राही! फोरममध्येही तो काही वेळा स्त्री वेषात येई. कॅलिग्युलाच्या जवळचा मित्र मार्को त्याला त्याच्या वर्तणुकीबद्दल नेहमी नाराजी व्यक्त करी. एकदा मार्को हा कॅलिग्युलाला स्वत:ला देव मानू नकोस, इतर स्त्रियांवर व्यभिचार करू नकोस असे सांगताच त्याने मार्को आणि त्याच्या पत्नीला यमसदनाला पाठवून त्यांनी आत्महत्या केल्याचे घोषित केले. कॅलिग्युलाच्या व्यभिचारामुळे बेजार झालेल्या कान्रेलियस आणि कॅसियस या सिनेटर्सनी जानेवारी ४१ मध्ये त्याचा गळा दाबून खून केला.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा