रोमच्या सम्राटपदी ५४ साली आलेल्या निरोने प्रथम उत्तम, संयमित कारभार केला. व्यापार-विकास करून सांस्कृतिक परंपरा जतन करण्यासाठी नाटय़गृह बांधले, क्रीडा स्पर्धाना प्रोत्साहन दिले, कर कमी केले. पुढे पुढे निरोच्या आईचे त्याच्याशी पटेना म्हणून तिने तिचा हद्दपार केलेला सावत्र मुलगा ब्रिटानिकस याला राज्यावर बसवण्याचा घाट घातला. निरोने मग ज्युलियाला बंदिवासात पाठवून विषप्रयोग करून ठार मारले. यानंतर त्याच्या वर्तणुकीत अचानक बदल होऊन त्याच्याभोवती सतत तरुणी आणि विषयलंपट तरुणांचा घोळका दिसू लागला. रात्री तो गुलामाच्या वेशात शहरात फिरे. नाटक, संगीत आणि मद्यपान याचा अतिरेक होऊ लागला. पापिया या सुंदर तरुणीला तिच्या नवऱ्यापासून पळवून तिच्याशी पत्नीप्रमाणे संबंध ठेवले. पुढे पुढे निरोचा विक्षिप्तपणा आणखीच वाढू लागला. निरोने त्याची प्रथम पत्नी ऑक्टेव्हियाला एका निर्जन बेटावर नेऊन तिचा खून करविला. त्यानंतर प्रेयसी पापियाशी रीतसर लग्न करून तो मोकळा झाला. पुढे निरो आणखी व्यभिचारी बनून कुठल्याही स्त्रीशी चाळे करू लागला. कधी कधी निरो स्त्रीवेश धारण करून फोरममध्येही येत असे. काही वेळा तो स्वत:ला स्त्री समजत असे. या सर्वावर कळस म्हणजे एके दिवशी स्पोरस या पुरुषाशी त्याने लग्न केले! सन ६४ मध्ये अचानक रहस्यमयरीत्या रोम शहरात प्रचंड प्रमाणात आग लागून अध्र्याहून अधिक शहर भस्मसात झाले. त्या वेळी निरो शांतपणे आपल्या नाटय़शाळेत हार्प वाजवीत शहराचा विनाश पाहत बसला होता. आग विझल्यानंतर निरोने शहराचे पुनíनर्माण कार्य हाती घेतले. ही आग निरोनेच लावली असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. निरोच्या जुलमांचा आणि व्यभिचाराचा अतिरेक झाल्यामुळे सिनेटने निरोला देहदंडाची शिक्षा सुनावली. या शिक्षेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच निरोने ९ जून ६८ रोजी आत्महत्या केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा