प्राचीन रोमन संस्कृतीत स्नानगृह हा एक महत्त्वाचा घटक होता. तीन हजार वर्षांपूर्वीच्या इतर युरोपियन आणि आशियाई देशांमधील समाजात स्नान करणे ही पूर्णपणे वैयक्तीक बाब होती. परंतु तत्कालीन रोमन समाजात स्नान करणे ही समाजातील लोकांनी एकत्र येण्याची आणि मोकळ्या वेळात आराम करण्याची, चनीची बाब होती. विशाल सार्वजनिक स्नानगृहे हे रोमन संस्कृतीचे वैशिष्टय़ होते. समाजातील निरनिराळ्या वर्गासाठी ‘थर्मी’ ही सार्वजनिक विशाल स्नानगृहे होती. इ.स. ३५४ साली रोम शहरात अशी ९५० स्नानगृहे असल्याची नोंद आहे. डायोक्लेशियन काळातील विशाल स्नानगृहांमध्ये एकावेळी तीन हजार लोकांच्या स्नानाची क्षमता होती! या विशाल स्नानगृहांचे स्वरूप आपल्याकडच्या चावडीसारखे होते. स्नानगृहात येऊन आंघोळ करणे जसे महत्त्वाचे, तितकेच राजकारणी, व्यावसायीक लोकांना पंचक्रोशीत काय चालू आहे, व्यापारातल्या उलाढाली आणि स्त्रियांना दुसऱ्यांच्या घरात काय चालू आहे आणि आपल्या मुलामुलींसाठी स्थळे कोणती योग्य, हे कळावे यासाठी स्नानगृहे वापरली जात.
प्रत्येक स्नानगृहात तीन विभाग होते. फ्रिजिडेरियम हा थंड पाण्याचा, कोमट पाण्याचा टेपिडेरियम आणि गरम पाण्याचा काल्डेरियम. या विभागांना जोडून व्यायामशाळा आणि पोहण्याचा तलाव असे. स्त्रियांच्या स्नानासाठी वेगळी स्नानगृहे होती. या स्नानगृहांचे दर सामान्य माणसाला परवडतील असेच होते. स्नानापूर्वी शेजारच्या व्यायामगृहांमध्ये घाम येईपर्यंत कसरत केली जाई. स्नान करताना प्रथम कोमट पाण्याने स्नान करून पुढे गरम पाण्याच्या विभागात लोक जात. तिथे ऑलिव्ह तेल, इतर सुगंधी द्रव्ये अंगाला लावून मसाज करण्याचे काम गुलामांचे होते. या विभागात गरम वाफारे देणारी यंत्रेही होती. मसाज झाल्यावर गरम पाण्याने स्नान होई व नंतर थंड पाण्याने स्नानाची पद्धत होती. या स्नानानंतर तलावात मनसोक्त पोहून लोक घरी जात. अशा विशाल स्नानगृहांपकी ट्रोजन, काराकला स्नानगृहांचे अवशेष आजही अचंबित करणारे आहेत. सध्याचे ‘स्पा’ हे या प्राचीन स्नानगृहांची सुधारित आवृत्ती म्हणता येईल.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
डॉ. विस्पी. एम. मेहेरहोमजी
डॉ. मेहेरहोमजी यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी, एम.एस्सी. पीएच.डी. आणि टुलुज (फ्रान्स) विद्यापीठातून डी.एस्सी. पुरी केली. पाँडेचरीच्या फ्रेंच इन्स्टिटय़ूट ऑफ सायंटिफिक रिसर्च येथे त्यांचे संशोधन बहरले. वनस्पतींचे भौगोलिक वितरण आणि जैववैविध्याचे जतन या विषयात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. भारतीय द्वीपकल्पाचे त्यांनी तयार केलेले १:१०,००,००० प्रमाणाचे आणि पश्चिम घाटाचे १:२,५०,००० प्रमाणाचे नकाशे जैववैविध्य जतनाची योजना तयार करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरले. नकाशांच्या या प्रकल्पामुळे देशातील प्रत्येक वनप्रकार, वन-आच्छादनाचे प्रमाण आणि हवामानाप्रमाणे वनसंपदेची संभाव्य उत्पादकता यांचा अंदाज बांधणे सोपे झाले.
हवामान आणि वनस्पती यांच्या परस्पर संबधांचे डॉ. मेहेरहोमजी यांचे संशोधन जगन्मान्य आहे. मुंबईत चार महिन्यात सरासरीने २००० मिलिमीटर पाऊस पडतो. बंगळूरू येथे जेमेतेम १००० मिलिमीटर पाऊस पडतो. तोही सहा महिन्यात. पण दोन्ही ठिकाणी पानगळी वृक्षांची वने आहेत. अशा अनेक ठिकाणच्या परिस्थितीचे निरीक्षण केल्यावर मेहेरहोमजी यांनी ‘रुद्रता- आद्र्रता’ सूचिपत्र तयार केले. एवढेच नव्हे तर मोसमी पावसाची अनिश्चितता विचारात घेऊन त्यांनी वनसंपदेच्या अंदाजासाठी सरासरी हवामानाऐवजी संभवनीय हवामानाला महत्त्व द्यावे असा विचार मांडला.
निलगिरी- पलनी डोंगररांगा येथील एकाच पर्वतराजीत असणाऱ्या गवताळ प्रदेश आणि शोला वने यांच्या अभ्यासाद्वारे सूक्ष्म हवामानातील फरक दाखवून दिले.
डॉ. मेहेरहोमजी यांनी महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. फ्रेंच इन्स्टिटय़ूटचे ते संशोधक संचालक होते. पॉन्डिचेरी विद्यापीठात मानद अधिष्ठातापदाचे कार्य करून त्यांनी विद्यापीठाच्या पारिस्थितीकी विभागाला राष्ट्रीय दर्जा मिळवून दिला.

त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यापकी काही पुढीलप्रमाणे- दिल्ली, बंगलोर आणि अलाहाबादच्या सायन्स अ‍ॅकॅडमीचे ते फेलो आहेत. फ्रान्स व जर्मनी येथील सरकारच्या शिष्यवृत्या, भारत वन संचालनालयाचे नॅशनल एनव्हायरन्मेंटल फेलो, बिरबल सहानी संस्थेतेर्फे व्याख्यानासाठी आमंत्रण, एम्बेरजर व सॉरेज इकॉलॉजी फाउंडेशनतर्फे सन्मानपत्र, फ्रान्सच्या पंतप्रधांनांकडून भारत- फ्रान्स यांच्या सांस्कृतिक व वैज्ञानिक संबंधांसाठीचे ऑर्डर ऑफ पाम अ‍ॅकॅडमिक इत्यादी.
डॉ. मेहेरहोमजी यांनी दोनशेच्यावर शोधनिबंध आणि अनेक पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. निवृतीनंतर ते मुंबईत स्थायिक झाले आहेत.
– प्रा. शरद चाफेकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org