कोल्हापूर शहरापासून ५५ कि.मी. अंतरावर असलेले कुरुंदवाड या गावात कुरुंदवाड संस्थानाचे प्रमुख ठाणे होते. पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष हरिभट यांचे तिसरे पुत्र ित्रबक ऊर्फ अप्पा हे कुरुंदवाडचे संस्थापक. राणोजी घोरपडेने अप्पांकडून कर्ज घेतले होते. कर्जाच्या परतफेडीत राणोजीने कुरुंदवाडची आपली वसती १७३३ साली अप्पांच्या नावाने केली. अप्पांनी तिथे गाव वसविले. अप्पा हे मराठा फौजेचे एक उच्चपदस्थ सेनाधिकारी होते. त्यांच्या युद्धकौशल्याने अप्पांनी मराठा साम्राज्याची दक्षिण सीमा तुंगभद्रा नदीपर्यंत वाढविण्यास मदत केल्यामुळे पेशव्यांनी १७७१ साली कुरुंदवाड आणि आसपासचा प्रदेश जहागिरीत दिला. ित्रबकराव ऊर्फ अप्पांची कारकीर्द इ.स. १७३३ ते १७७१ अशी झाली. १८११ साली कुरुंदवाड राज्याचे कुरुंदवाड आणि शेडबाळ असे दोन भाग झाले. वारस नसल्यामुळे १८५७ मध्ये शेडबाळ ब्रिटिशांनी खालसा केले. केशवराव पटवर्धन यांच्या कारकीर्दीत १८१९ साली कंपनी सरकारशी पंढरपूर येथे तह आणि संरक्षण करार होऊन कुरुंदवाड हे एक ब्रिटिशअंकित संस्थान बनले. १८५४ मध्ये कुरुंदवाड संस्थान परत विभागले जाऊन थोरल्या पातीचा कारभार रघुनाथरावांकडे तर धाकटय़ा पातीचा कारभार विनायकरावांकडे आला. कुरुंदवाड थोरल्या पातीचे राज्यक्षेत्र ४७० चौ.कि.मी. आणि १९०१ सालची संस्थानाची लोकसंख्या ४२००० होती. या संस्थानचे राजे निळकंठराव यांनी मराठा-हैदरअली युद्धात मोठी कामगिरी केल्यामुळे थोरल्या माधवराव पेशव्यांनी स्वत:ची सुवर्णमुद्रा पाडण्यास परवानगी दिली. या नाण्यांना ‘निळकंठ’ असेच नाव होते.
येथील पं. विष्णुपंत मोरेश्वर छत्रे यांनी आशियातली पहिली सर्कस स्थापन केली. कुरुंदवाड धाकटय़ा पातीचे क्षेत्रफळ केवळ २९५ चौ.कि.मी. तर लोकसंख्या १९०१ साली ३४००० होती. कुरुंदवाड संस्थानाच्या दोन्ही भागांत साक्षरतेचे प्रमाण ७५% म्हणजे तत्कालीन कोणत्याही भारतीय संस्थानाहून अधिक होते. संस्थानात मराठी आणि कानडी या दोन्ही भाषा बोलल्या जात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com