रबर हा एक असा पदार्थ आहे, जो शाळेतील विद्यार्थ्यांच्या कंपास पेटीत हमखास आढळतो. शिवाय पायपुसणीत, तर कधी कधी पादत्राणांमध्ये असतो. एकूण काय, आपण रोजच्या जीवनात रबराचा वापर खूप करतो. रबरापासून तयार केलेली जगातील पहिली वस्तू म्हणजे ‘चेंडू’. हा काळ साधारणपणे १५ व्या शतकाचा असेल. मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील इंडियन लोकांनी झाडाच्या चिकापासून चेंडू तयार केला. सुरुवातीला या चिकाचा वापर बाटल्या, चप्पल तयार करण्यासाठी होत असे. अठराव्या शतकात झाडाच्या चिकापासून तयार केलेल्या घट्ट पदार्थाचा एक वेगळाच गुणधर्म जोसेफ प्रिस्टले या रसायनशास्त्रज्ञाच्या लक्षात आला. शिसपेन्सिलने लिहिलेल्या अक्षरावर हा पदार्थ घासला तर शिसपेन्सिलचे अक्षर खोडले जाते. ‘रब’ म्हणजे घासणे. प्रिस्टलेंनी या चिकट पदार्थाला रबर असे नाव दिले. रबर हा पदार्थ म्हणजे काही विशिष्ट झाडाचा चीक. झाडावरून काढल्यावर चीक काही वेळ द्रव रूपात असतो. हळूहळू घट्ट होत जातो, नंतर एकदम कडक होतो. एखादी वस्तू तयार करायची असेल तर अशा कडक रबराचा काहीच उपयोग होत नाही. १७६१ मध्ये हेरिसॉ आणि मॅक्यूर या शास्त्रज्ञांनी रबरामध्ये टर्पेटाइन टाकले. टर्पेटाइनमध्ये रबर विरघळले, त्यामुळे कडक झालेल्या रबराचा वापर करणे शक्य झाले. परंतु या मिश्रणापासून तयार केलेल्या वस्तू काही दिवसांत चिकट होतात असे लक्षात आले. चॅफी यानी टर्पेटाइन आणि काजळीचा वापर केला. काजळीमुळे वस्तूंना वेगळीच चकाकी आली. कडकपणा नाहीसा होण्यासाठी रबर खूप रगडले. मुळातच चिवट असलेल्या रबराने त्याचा चिवटपणा काही सोडला नाही. चाल्रेस गोडएयर याने झाडाच्या चिकात गंधक मिसळले. गंधक आणि झाडाचा चीक यामध्ये एक अभिक्रिया होते, त्या अभिक्रियेला ‘व्हल्कनीकरण’ म्हणतात. या अभिक्रियेत कार्बन आणि हायड्रोजनची साखळी तुटून गंधकाच्या अणूंची साखळी जोडली जाते. एक नवीन लांबलचक साखळी तयार होते. या साखळीतील गंधक, कार्बन आणि हायड्रोजन यांच्या विशिष्ट रचनेमुळे साखळी ताणली जाते आणि पुन्हा मागे येऊ शकते. रबरामध्ये असलेला स्थितिस्थापकत्व या गुणधर्माचे हेच रहस्य आहे.
सुचेता भिडे (कर्जत) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,
चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा