रुबी मायर्स या १९३० ते १९४० या दशकातल्या भारतीय मूक चित्रपटातील आघाडीच्या नायिका म्हणून ओळखल्या जातात. ‘सुलोचना’ या त्यांच्या चित्रपटसृष्टीतील नावाने अधिक ओळखल्या जाणाऱ्या रुबी मायर्स या बगदादी ज्यू समाजातील होत्या हे अनेक जणांना माहीत नसावे. पुण्यातल्या एका सर्वसाधारण यहुदी कुटुंबात १९०७ साली रुबीचा जन्म झाला. कोहिनूर फिल्म्सचे मालक मोहन भवनानी हे रुबीकडे त्यांच्या चित्रपटात काम करण्याचा प्रस्ताव घेऊन आले. हा प्रस्ताव आकर्षक वाटला तरी त्या काळात अभिनेते, अभिनेत्री यांना प्रतिष्ठा नसल्याने रुबीने तो नाकारला. परंतु भवनानींचा आग्रह वाढल्यावर तिने अखेरीस होकार दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुढे इम्पिरिअल स्टुडिओच्या अनेक मूकपटात दिनशा बिलिमोरीया या नायकाबरोबर रुबीने भूमिका केलेले बहुतेक चित्रपट लोकप्रिय झाले. त्यापकी टायपिस्ट गर्ल (१९२६), बलिदान (१९२७), वाइल्ड कॅट ऑफ बॉम्बे (१९२७) तसेच दिग्दर्शक आर.एस.चौधरी यांच्या माधुरी (१९२८), अनारकली (१९२८) आणि इंदिरा बी.ए. (१९२९) या चित्रपटांना अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले. रुबीने चित्रपटांसाठी सुलोचना हे नाव घेतले. या काळात रुबी मूक चित्रपटांची सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री झाली. दरमहा पाच हजार रुपये वेतन मिळणारी रुबी तत्कालीन गव्हर्नरहून अधिक कमाई करीत असे! तिच्या मालकीच्या तीन शेवरोलेट गाडय़ा होत्या!

जेव्हा चित्रपट बोलायला लागले त्यावेळी रुबीचे हिंदी उच्चार चांगले नसल्यामुळे आणि या मधल्या काळात इतर अनेक अभिनेत्री चित्रपटात आल्यामुळे रुबीला काम मिळेनासे झाले. परंतु रुबीने यासाठी शिक्षकाची शिकवणी ठेवून आपले उच्चार सुधारले. आपले हिंदी शब्दोच्चार सुधारल्यावर पूर्वी लोकप्रिय झालेले तिचे माधुरी, इंदिरा बी.ए., अनारकली, बॉम्बे की बिल्ली या मूकपटांच्या बोलक्या आवृत्त्या निघाल्या. १९५३ साली रुबीचा तिसरा अनारकली प्रदर्शित झाला, पण गंमत म्हणजे या तिसऱ्या अनारकलीत रुबीनं सलीमच्या आईचं काम केलंय! १९३० साली तिनं स्वतची रुबी पिक्चर्स ही निर्मिती संस्था सुरू केली. एकाकी रुबी मायर्सचे वयाच्या ७६व्या वर्षी १९८३ साली निधन झाले.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruby myers