रुदरफोर्डिअम या मूलद्रव्याचे नाव न्यूझीलंड येथील रसायनशास्त्रज्ञ अन्रेस्ट रुदरफोर्ड यांच्या नावावरून पडले आहे. शीतयुद्धाच्या काळात रशियातील ‘जॉइन्ट इन्स्टिटय़ूट फॉर न्यूक्लिअर रिसर्च (जे.आय.एन.आर)’ मधील जॉर्जी फ्लेरॉव व इतर शास्त्रज्ञ आणि अमेरिकेतील लॉरेन्स बर्कले लॅबोरेटरी (एल.बी.एल.) येथील अल्बर्ट घिओर्सो आणि त्यांचे सहकारी अशा दोन गटांत अणुक्रमांक १०० पुढील मूलद्रव्ये शोधण्याची जणू चढाओढ लागली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९६४ मध्ये जे.आय.एन.आर. येथील शास्त्रज्ञांनी प्लुटोनिअम-२४२वर निऑन-२२ कणांचा मारा करून रुदरफोर्डिअमचे २५९ अणुवस्तुमानांक असलेले समस्थानिक बनविले. परंतु अपुऱ्या पुराव्यामुळे त्यांनी हे संशोधन सावधानीपूर्वक जाहीर केले. तसेच त्यांनी प्लुटोनिअम-२४२ वर निऑन-२० कणांचा मारा करून रुदरफोर्डिअमची निर्मिती करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. पुढे १९६६ मध्ये पूर्ण तयारीनिशी त्यांनी १९६४ मधील प्रयोग पुन्हा एकदा काळजीपूर्वक केला. या वेळी मात्र त्यांना सबळ पुरावा हाती लागला व त्यांनी १०४ अणुक्रमांक असलेल्या नवीन मूलद्रव्याचा शोध जाहीर केला. या मूलद्रव्याला त्यांनी माजी रशियन परमाणू संशोधन योजनाप्रमुख इगॉर कुर्चाटोव यांच्या सन्मानार्थ कुर्चाटोविअम असे नाव सुचविले.

१९६९ मध्ये एल.बी.एल. मधील वैज्ञानिकांनी १०४ अणुक्रमांकाचे मूलद्रव्य बनविण्यासाठी तीन यशस्वी प्रयत्न केले. प्रथमत: त्यांनी क्युरिअम-२४८ वर ऑक्सिजन-१६ कणांचा मारा करून २६० अणुवस्तुमानांकाचे समस्थानिक मिळविले. नंतर कॅलिफोíनअम-२४९ वर कार्बन-१२ चा मारा करून अणुवस्तुमानांक २५७ असलेले समस्थानिक बनविले आणि तिसऱ्या प्रयोगात  कॅलिफोíनअम-२४९ वर कार्बन-१३ कणांचा मारा करून अणुवस्तुमानांक २५८ असलेले समस्थानिक निर्माण केले. घिओर्सो समूहाने या मूलद्रव्याला रुदरफोर्डिअम असे नाव दिले.

अशा प्रकारे या मूलद्रव्याच्या शोधाचे श्रेय कोणाला द्यावे व त्याचे नाव काय असावे, अशी नवीन समस्या निर्माण झाली. आयुपॅकच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘ट्रान्सफर्मिअम वìकग ग्रूप’ने (टी.डब्ल्यू.जी.ने) असा निवाडा दिला की, या मूलद्रव्याच्या शोधासाठी ‘जे.आय.एन.आर.’ व ‘एल.बी.एल.’ या दोन्ही प्रयोगशाळांचे योगदान महत्त्वाचे असून त्या दोन्ही समूहांना याचे श्रेय देण्यात यावे. परंतु या मूलद्रव्याचे नाव मात्र रुदरफोर्डिअम असे राहू द्यावे.

– डॉ. शिवराम गर्जे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rutherfordium chemical element