महासागरविषयक दीर्घकालीन स्वरूपाची विदा उपग्रहांकडून गोळा करून त्याचे विश्लेषण करणे हे तुलनेने संशोधनातील नवीन क्षेत्र आहे. या विदेच्या विश्लेषणाने महासागर समजून घेणे शक्य होते. उपग्रहाद्वारे विदा मिळवण्याची पद्धत विकसित होण्यापूर्वी महासागरांबद्दल माहिती मिळवण्याचे काम बहुतेक जहाजे, बोय (बोया किंवा तरंगक) आणि ड्रिफ्टर्स (वाहक) यांच्याकरवी केले जात असे, परंतु हे मर्यादित क्षेत्रातच असे. अशी माहिती घेताना अनेकदा मोठय़ा अडचणी येत. समुद्रातील वैविध्यपूर्ण परिस्थिती दर्शवण्यासाठी ही मिळवलेली विदा पुरेशी नाही. यावर उपाय म्हणून नासाने २८ जून १९७८ला ‘सीसॅट’ हा पहिला समुद्रशास्त्रीय उपग्रह प्रक्षेपित केला. गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ अंतराळातून महासागरांचे निरीक्षण केले जात आहे. आज अनेक महासागर-निरीक्षण उपग्रह मोहिमा राबवल्या गेल्यामुळे महासागराच्या ज्ञानामध्ये भर पडली आहे. या विदेचा अभ्यास करणारा एक विस्तृत वैज्ञानिक संशोधन समुदाय आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कुतूहल : जागतिक व्हेल शार्क दिन

महासागराचे निरीक्षण करणाऱ्या उपग्रहांच्या साहाय्याने सागरी शोधाचे नवे पर्व सुरू झाले. दूरवरच्या उपग्रहाने मिळवलेल्या विदेच्या मदतीने आणि ‘मॉडेिलग’ तंत्रज्ञान वापरून समुद्राच्या पृष्ठभागाची भौगोलिक परिस्थिती, प्रवाह, लाटा, वारे, वनस्पतिप्लवक, समुद्रावरील हिमाचे प्रमाण, पाऊस, समुद्रापर्यंत पोहोचणारा सूर्यप्रकाश आणि समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील हंगामी बदलांचे जागतिक मोजमाप सक्षमतेने करता येते. जागतिक स्तरावर या नमुन्यांचा अभ्यास केल्याने पूर आणि दुष्काळाच्या विनाशकारी परिणामांचा अंदाज बांधून आपत्ती व्यवस्थापन करणे शक्य होते. महासागर निरीक्षण उपग्रह मोहिमेद्वारे तयार झालेल्या प्रतिमा हवामानातील मूलभूत बदलांबद्दल माहिती देतात. त्यामुळे गेल्या दशकात, एल निनो आणि इतर जागतिक आणि प्रादेशिक हवामान चक्रांसारख्या घटनांचा अंदाज लावण्याची क्षमता सुधारली आहे. ही मॉडेल्स अधिक अत्याधुनिक आहेत. महासागरातील घटनांच्या परिणामांची क्षमता समजण्याची प्रणाली शास्त्रज्ञांनी विकसित करून त्यावर अंदाज बांधले आहेत.

हेही वाचा >>> कुतूहल : प्रवाळसंवर्धनासाठी ध्वनीचा वापर

इस्रोने ‘ओशनसॅट-२’, ‘सरल’ (एसएआरएएल) आणि ‘स्कॅटसॅट’ (एससीएटीएसएटी-१) हे उपग्रह समुद्रशास्त्रीय निरीक्षणांसाठी सोडले आहेत. त्यांनी पाठविलेली विदा प्रकाशसंश्लेषणासाठी लागणारा सूर्यप्रकाश, महासागर प्राथमिक उत्पादन, हवेतील धूलिकण (एरोसोल), प्रकाशीय खोली, पाण्यातील तरंगणारे कण आणि त्यांचे प्रमाण, महासागराच्या पृष्ठभागावरील वारे, अशा मोजमापांसाठी आणि परिस्थितीचा अंदाज बांधण्यासाठी वापरली जाते.

– डॉ. बाळासाहेब कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satellites used to observe ocean satellites for ocean observe ocean studies by satellites zws