सध्या कर्नाटकातील हावेरी जिल्हय़ातील तालुक्याचे ठिकाण असलेले सावनूर येथे या संस्थानाचे प्रमुख ठाणे होते. मियाना पठाण टोळ्यांचा वंशज अब्दुल करीम खान याने १६७२ मध्ये सावनूर राज्य स्थापन केले. बिजापूर सुलतानाकडे नोकरीस असलेल्या अब्दुल करीमला सुलतानाने बिजापूरजवळच्या बंकापूरची जहागीर दिली. त्याच्या पुढच्या वारसांनी पुढच्या शतकभरात आसपासचा बराच प्रदेश घेऊन सावनूर येथे राजधानी करून प्रशासन केले. भौगोलिकदृष्टय़ा सावनूर राज्य प्रबळ मराठे आणि म्हैसूरचे हैदर अली व टिपूच्या प्रभाव क्षेत्रात होते. अठराव्या शतकाच्या मध्यानंतर मराठय़ांनी सावनूरचा निम्मा अधिक राज्य प्रदेश घेतला, तर त्या शतकाच्या अखेरीस, १७९१ साली म्हैसूरच्या टिपू सुलतानाने उरलेसुरले सावनूर राज्य हडप केले. १७९९ साली टिपूच्या मृत्यूनंतर सावनूरच्या वारस नवाबाने परत एकदा स्वतंत्र राज्याची घोषणा केली; परंतु आता त्यांच्या ताब्यात पूर्वीच्या फक्त एकतृतीयांश राज्यक्षेत्र राहिले. १८१८ साली मराठा साम्राज्याच्या अस्तानंतर सावनूरच्या नवाबाने कंपनी सरकारचे स्वामित्व पत्करले आणि सावनूर आता कंपनी सरकारच्या अंकित, संरक्षित संस्थान बनले. शेवटचा नवाब अब्दुल मजीद खान द्वितीय हा नवाबपदी आला तेव्हा दोन वष्रे वयाचा अल्पवयीन असल्यामुळे ब्रिटिशांनी रिजंटच्या देखरेखीखाली राज्यकारभार करून नवाबाच्या शिक्षणाची व्यवस्था केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याची राजकीय कारकीर्द ३४ वर्षांची झाली. या काळात त्याने राज्यात दवाखाने, शाळा, न्यायालय, तुरुंग, रस्ते, पाणीपुरवठा योजना स्थापन करून गेल्या तीनशे वर्षांत झाला नाही असा विकास करून दाखविला. सर्वधर्म सहिष्णू असलेल्या नवाब अब्दुल मजीदने अनेक हिंदू मंदिरे, मठ यांना देणग्या दिल्या. १९४७ साली या नवाबाने सावनूर राज्य स्वतंत्र भारतात विलीन केले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल – वस्त्रोद्योग : मागोवा – २
सन २०१५च्या दुसऱ्या तिमाहीत या सदरात विविध प्रकारच्या तंतूंची ओळख, त्यांची जडणघडण, त्यांच्या उत्पादन पद्धती, उपयोग आणि काही वेळा तंतूची सूतकताई वगरे तपशील जरा विस्ताराने दिला. या टप्प्यावर रंजकता कमी झाली असे वाटले. एवढा तपशील कशाला? या विषयात कोणाला डिप्लोमा करायचा आहे का? चरख्याची आता काय गरज? अशा प्रतिक्रिया वाचकांकडून आल्या होत्या.
प्रथम आपण कापूस किंवा कोणत्याही तंतूपासून सूतकताई करायची असेल तर तो तंतू पिंजून झाला, की त्याचा पेळू तयार होतो आणि मग सूतकताईसाठी त्याला वातीएवढे बारीक करावे लागते. त्यामुळे टप्प्याटप्प्याने व्यास कमी करत लांबी वाढवत जावे लागते. इथे वात तुटू नये अशी काळजीही घ्यावी लागते. एकसारखे काम आणि म्हणून यंत्रेपण तशीच, ही लांबलचक प्रक्रिया आहे. त्यातून प्रा. काणे या एकाच व्यक्तीने लिखाण केले, त्याचा वाचकांना कंटाळा आला असे वाटले; पण काणेसरांचा अनुभव आणि अभ्यास त्यातून दिसत होता, त्याकडे दुर्लक्ष झाले असे वाटते. या विषयावर लिहिणारे मुळात कमी, त्यात परत सोप्या मराठीत लिखाण करणे गरजेचे होते. इथे काही मर्यादा पडल्या. एवढय़ा माहितीवर कोणी डिप्लोमा करू शकणार नाही. तसेच भारतीय सूतकताईच्या इतिहासात चरख्याला बगल देऊ शकणार नाही हे नम्रपणाने सांगू इच्छितो.
मक्यापासून केल्या जाणाऱ्या धाग्यांबाबत निशांत कांबळी यांनी उत्सुकता दाखवली. राघवेंद्र कोल्हटकर यांनी मजकूर अधिक रंजक करता येईल, असे सांगताना मदत करायची तयारी दाखवली. वसुधा जोशी यांनी वर्षांच्या सुरुवातीपासून कात्रणे जमा केली आहेत, सूतकताई संपून विणाईची माहिती केव्हा सुरू होणार, अशी विचारणा केली. हेमंत घायाळ यांनी नायलॉन हे नाव कसे पडले, याची माहिती कशाला म्हणून नाराजी दर्शवली, तर संजय पाटील यांनी माहिती आवडली असे कळवले. अशा संमिश्र प्रतिक्रिया होत्या. अशा संमिश्र प्रतिक्रिया आहेत, त्यामुळेच लोकांच्या अपेक्षा/मते समजतात. काही सुधारणा त्या अनुषंगाने करता येतात. कापडनिर्मितीच्या पुढच्या टप्प्यावर जायला विलंब झाला. त्यामुळेच विणाई आणि पूर्वतयारी थोडक्यात दिले. याबाबत अशी एकही तक्रार आली नाही. उलट आणखी विचारणा होत्या.
दिलीप हेर्लेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org