कुठल्याही वनस्पतीचे मोठय़ा प्रमाणात संकलन करण्यापूर्वी जिल्ह्य़ाचे उपवनसंरक्षक आणि राज्य बायोडायव्हर्सिटी बोर्ड यांची पूर्वपरवानगी बंधनकारक आहे. अशा प्रकारच्या संकलनाचे हेतू वेगवेगळे असू शकतात. कधी एकाच मोहिमेत एखाद्या विशिष्ट वनस्पतींचे संकलन, तर कधी एकाच मोहिमेत अनेक वनस्पतींचे संकलन हे नोंदी ठेवण्यासाठी आणि जतन करण्यासाठी केले जाते.
वरील दोन्ही प्रकारांत वनस्पतींची उपलब्धता, त्यांचा ठावठिकाणा व त्या ठिकाणच्या त्यांच्या उपलब्धतेचे प्रमाण (दुर्मीळ किंवा विपुल) याची पूर्ण माहिती व अभ्यास असणे महत्त्वाचे आहे. बहुधा, प्रत्येक वनस्पतीचे गरजेनुसार व उपलब्धतेनुसार कमीत कमी ३-५ नमुने गोळा केले जातात आणि म्हणूनच हे नमुने गोळा करणारी व्यक्ती जाणकार असणे महत्त्वाचे ठरते. अन्यथा दुर्मीळ वनस्पतींचा नायनाट होणार हे निश्चित.
वनस्पतींची नोंदणी करण्याची संकल्पना इटलीमधील बोलॉग विद्यापीठात प्राध्यापक लुका गिनी यांनी प्रथम (१४९०-१५३६) सुरू केली. युरोपमध्ये १७०७ ते १७७८ च्या दरम्यान ही पद्धत वापरल्याचे आढळते. भारतात ही पद्धत प्रथम इंग्रजांनी आणली. १७५३ मध्ये हावडा येथे डॉ. विलियम रॉक्सबर्ग यांनी सेंट्रल नॅशनल हब्रेरियमची सुरुवात केली.
नमुने गोळा करण्यासाठी काही हत्यारे, वस्तू बरोबर असाव्यात. उदा. छाटणी करण्यासाठी सिकेटर, एखादी वनस्पती मुळापासून काढण्यासाठी ट्रॉवेल, वनस्पतींची छाटणी केल्यानंतर त्यांना ताजे ठेवण्यासाठी व्हॅस्कुलम किंवा गॅल्व्हॅनाइज्ड पत्र्यांची पेटी, पॉवरची छोटी लेन्स, टिपकागद, अध्र्या आकाराचे जुने वर्तमानपत्र. नोंद ठेवण्यासाठी वही, नमुन्यांवर बांधण्यासाठी नोंदणी क्रमांकाचे टॅग, लहान आकाराच्या वनस्पतींना तात्पुरत्या ठेवण्यासाठी छोटय़ा प्लॅस्टिकच्या पिशव्या, सुतळी किंवा दोरी, कार्डबोर्डचा प्रेस, २% फॉर्मलिन. तीव्र फॉर्मलिनच्या प्रक्रियेमुळे वनस्पतींचा मूळ रंग जाऊन फांदी, फुले अथवा पाने काळी अथवा पिवळी पडतात हे ध्यानात ठेवावे, त्यामुळे ते सौम्य स्वरूपाचे असावे. पिण्याच्या पाण्याची बाटली, अन्नपाकिटे आणि आणीबाणीच्या वेळी लागणारी औषधांची पेटी इत्यादी साहित्याची पूर्वतयारी करून वनस्पती संकलन करण्याच्या मोहिमेवर निघावे.
डॉ. राजेंद्र शिंदे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा