बडोद्याचा राजा मल्हारराव यांस पदच्युत करून, गादीला वारस हवा म्हणून ब्रिटिश व्हाइसरॉयने जमनाबाईला तिने दत्तकपुत्र घेण्यास परवानगी दिली. त्याप्रमाणे दिवाण माधवराव आणि जमनाबाईने गायकवाडांच्या जवळच्या नात्यातील मुलांचा शोध घेणे सुरू केले. नाशिक जिल्ह्यातील मालेगावजवळच्या कवळाणे या खेडय़ातील शेतकरी उखाजी व काशीराव हे बंधू गायकवाडांचे जवळचे नातेवाईक होते. त्यांची मुले दादासाहेब, गोपाळ आणि संपत यांची नावे दिवाणांनी ब्रिटिश रेसिडेंटला कळविली. रेसिडेंटने नाशिकचे तत्कालीन कलेक्टर इलियट यांच्यामार्फत या तीन मुलांचे गायकवाड राजघराण्याशी नातेसंबंध, मुलांवर त्यांच्या पालकांनी केलेले संस्कार इत्यादींची खातरजमा करून मुले आणि त्यांचे वडील यांना बडोद्यास बोलावून घेतले. रेसिडेंट, टी. माधवराव तसेच जमनाबाई यांनी या तिघा मुलांमधून उपजत बुद्धिमत्ता, करारीपणा या निकषांवर काशीरावचा १२ वर्षांचा मुलगा गोपाळ याची निवड करून १८७५ साली जमनाबाईंनी गोपाळला विधिपूर्वक दत्तक घेतले. बारा वर्षांचा गोपाळ आतापर्यंत खेडय़ात आपल्या कुटुंबाची गुरे राखण्याचे काम करीत होता, अशिक्षित होता. तो १८ वर्षांचा होईपर्यंत दिवाण माधवराव व रेसिडेंटने तज्ज्ञ शिक्षक नेमून त्याच्या शिक्षणावर आणि राज्यकर्त्यांने उच्च वर्गात वावरण्याच्या रितिभाती त्याने आत्मसात करण्यावर भर दिला. १८८१ साली गोपाळच्या वयाची १८ वष्रे पूर्ण झाली आणि ब्रिटिश सरकारने त्याला राज्याधिकार दिले. जमनाबाईच्या सूचनेवरून त्याचे नामकरण सयाजीराव (तृतीय) असे करण्यात आले.
महाराजा सयाजीराव गायकवाड राजेपदावर आले त्या वेळी राज्यकारभारात अनागोंदी माजलेली होती. दक्षिणेला साल्हेरपासून उत्तरेस द्वारकेपर्यंत संस्थानाचे राज्यक्षेत्र पसरलेले होते. नोकरशाहांच्या मनमानीमुळे, भ्रष्टाचारामुळे राज्याचा पूर्ण महसूल खजिन्यात जमा होत नसे. सयाजीरावांनी आपल्या चोख प्रशासनाने, प्रजाहितदक्ष कारभाराने आपल्या कारकीर्दीत बडोदा हे एक वैभवसंपन्न संस्थान बनवून ठेवले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा