सागरी परिसंस्थेबद्दल अधिक संशोधन करण्यासाठी वूड्स होल समुद्री विज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ समुद्रसंबंधित पाच विलक्षण प्रदेशांची माहिती गोळा करण्याचा प्रयास करीत आहेत. यात पहिला प्रदेश आहे आक्र्टिक महासागर आणि त्याच्या हिमाखालचे सजीव.
दक्षिण ग्रीनलँड आणि आईसलँडच्या दक्षिणेस असणाऱ्या पाण्याखालच्या पर्वत रांगांमधल्या जागेत असणाऱ्या जलधीला ‘इरिमगर समुद्र’ असे म्हणतात. जगातील सर्वात बेभान वारा वाहणाऱ्या या जागेत सतत वादळे येतात. ग्रीनलँडच्या उंच पर्वतरांगांना वळसे घालून हे वारे महाकाय लाटा निर्माण करतात. येथे कोमटसर पाणी थंड होऊन तळाशी जाते आणि त्यामुळे अभिसरण होऊन जागतिक हवामानावर परिणाम होतो. याचा अभ्यास करण्यासाठी तेथल्या विचित्र परिस्थितीला तोंड देतील असे विशेष बोये वापरून वादळवाऱ्यातदेखील पृष्ठभाग आणि त्याखालील थरांचा अभ्यास सतत चालू असतो.
हेही वाचा >>> कुतूहल: स्थानिक युवकांना रोजगार देणारे..
२२ जून २०२० रोजी यिंग स्तोंग या संशोधकाने समुद्राच्या सर्वात खोल अशा ‘चॅलेंजर डीप’ येथे कधीही कोणी न गेलेल्या अंधार आणि अतिशीत तापमानाच्या प्रदेशात ‘ध्वनिलहरींचा प्रवास कसा होतो’ याची पाहणी केली. मारियाना घळीतील हा सर्वात खोल खळगा आहे. पृष्ठभागापासून साधारण ११ किलोमीटरवर असणाऱ्या या ठिकाणी पाण्याचा दाब १००० पटीने अधिक असतो.
अंटार्क्र्टिकाच्या सर्वात दक्षिणेकडे असणाऱ्या ‘रॉस’ समुद्राच्या संपूर्ण पश्चिम किनाऱ्याला व्हिक्टोरिया लँड म्हणतात. हे जणू हिमाचे वाळवंटच आहे, त्यातच अध्येमध्ये हिमाच्या चादरीखाली दडलेले ज्वालामुखी पसरले आहेत. याच्याजवळ असणाऱ्या मॅकमुडरे या संशोधन स्थानकावर हिवाळयात उणे ५० अंश सेल्सिअस तापमान असते. त्यामुळे तेथे जेव्हा सूर्यास्त कधीच होत नाही अशा वेळी – केवळ उन्हाळयातच – येथे जगणाऱ्या प्राणीमात्रांचे आणि समुद्रपक्ष्यांचे जीवन समजावून घेऊन हवामान बदलाचे परिणाम अभ्यासले जातात. भूमीवर उसळलेल्या ज्वालामुखीच्या आसपास राहणे शक्य नसते, पण पाण्यातील ज्वालामुखीचे तसे नाही. त्यातून निघणारा धूर आणि उष्णता जलद गतीने विखुरली जाते. त्यातून निघणारी राख तेथल्या तेथेच पाण्यात मिसळते. या उद्रेकामुळे समुद्रतळ बदलून जातो आणि खोल पाण्यात राहणाऱ्या जीवांना नवा अधिवास मिळतो. पश्चिम प्रशांत महासागरात अशा पाण्याखालील उद्रेकाचे चित्रीकरण रिमोटवर चालणाऱ्या उपकरणांनी करण्यात आले आहे.
– -डॉ. नंदिनी विनय देशमुख
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org