बिपिन देशमाने

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समुद्रात तेलाची गळती होऊन पाण्यावर तवंग पसरतो. सागरी सजीवांना धोका निर्माण होतो. हा तेलतवंग दूर करणे फार जिकिरीचे असते. काही जिवाणू हे तेल खाऊन टाकतात. समुद्र पूर्वीसारखा स्वच्छ होतो. तेलातील विविध हायड्रोकार्बनचे विघटन करणारी जनुके एकाच जिवाणूत घालून तेलतवंगाचा कर्दनकाळ ठरणारा महाजिवाणू निर्माण करणारे शास्त्रज्ञ म्हणजे डॉ. आनंद मोहन चक्रवर्ती! त्या महाजिवाणूचे नाव ‘स्युडोमोनास प्युटिडा’.

४ एप्रिल १९३८ रोजी पश्चिम बंगालमधील सैंथिया गावात त्यांचा जन्म झाला. १९५८ साली कोलकात्याच्या सेंट झेवियर कॉलेजमधून त्यांनी रसायनशास्त्राची पदवी घेतली. १९६० साली कोलकाता विद्यापीठातून जीवरसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९६५ साली तेथूनच जीवरसायनशास्त्रात डॉक्टरेट मिळविली. त्यांना अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठात संशोधनासाठी पाचारण करण्यात आले. तिथे स्युडोमोनास जिवाणू तेलतवंगातील हायड्रोकार्बनचे विघटन कसे करतात, याचा त्यांनी सखोल अभ्यास केला! १९७१ साली जनरल इलेक्ट्रिक कंपनीच्या संशोधन विभागात ते रुजू झाले. तेथेच त्यांनी हा महाजिवाणू निर्माण केला. हा जिवाणू तेलतवंगातील दोन तृतीयांश हायड्रोकार्बन फस्त करीत असे आणि तेही दहा ते शंभरपट वेगाने!

१९७२ साली अमेरिकेच्या स्वामित्व हक्क कार्यालयात ‘स्युडोमोनास प्युटिडा’ या महाजिवाणूचे स्वामित्व हक्क मिळवण्यासाठी अर्ज केला. सजीव हे निसर्गनिर्मित आहेत आणि त्यांच्यावर माणूस मालकी हक्क सांगू शकत नाही. हे कारण देऊन त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. चक्रवर्तीचे म्हणणे असे की जिवाणू निसर्गनिर्मित असला तरी आम्ही त्यात अनेक बदल केलेले आहेत. त्यामुळे या जिवाणूचा व्यावसायिक वापर करण्याचे स्वामित्व हक्क त्यांना मिळाले पाहिजेत. कायदेशीर लढा दहा वर्षे चालला. अखेर १९८२ साली अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना या महाजिवाणूचे स्वामित्व हक्क बहाल केले. म्हणूनच त्यांना ‘जिवाणू स्वामित्व हक्काचे प्रणेते’ म्हटले जाते! या निकालामुळे अमेरिकेतील जैवतंत्रज्ञान उद्योगाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा झाला. त्याची प्रचंड भरभराट झाली! १९९१ च्या गल्फच्या युद्धात तेलतवंग निर्मूलनासाठी या जिवाणूंचा वापर केला गेला. अमेरिकेच्या ‘इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन’चा सायंटिस्ट ऑफ द इयर पुरस्कार’ (१९७५),  स्वामित्व हक्क वकील संघटनेचा ‘इन्व्हेंटर ऑफ द इयर पुरस्कार’ (१९८२), ‘पाश्चर अवॉर्ड’ (१९९१), अमेरिकन सोसायटी ऑफ मायक्रोबायोलॉजिस्टचा पुरस्कार (२००७) आणि भारत सरकारची पद्मश्री असे अनेक गौरव त्यांना मिळाले.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scientists searching for a solution to telatavanga anand mohan chakraborty ysh