शरीराच्या योग्य वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी आपल्याला मोठय़ा प्रमाणात प्रथिनयुक्त पदार्थाचे सेवन करणे आवश्यक असते. समुद्रातील विविध खाद्यजीवांमुळे प्रथिनांची ही गरज सहज पूर्ण होऊ शकते. 

टय़ूना माशापासून मिळणाऱ्या प्रथिनांचे प्रमाण तितक्याच वजनाच्या कोंबडीच्या मांसापेक्षा जास्त असते. कॉड, तारल्या, रावस हे मासे प्रथिनांचे स्रोत आहेतच; त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असणाऱ्या ‘ओमेगा-३’ या मेदाम्लांमुळे शरीरासाठी अधिक पोषक आहेत. कॉडमाशांच्या यकृतापासून मिळणाऱ्या तेलात मोठय़ा प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्वही असते. वरील माशांबरोबरच बांगडा, बोंबिल, सुरमई, घोळ, वाम, हलवा यांसारखे मासे प्रथिनस्रोत म्हणून आवडीने खाल्ले जातात. माशांप्रमाणेच समुद्रातील इतर प्राणी जसे कोळंबी, कालवं, तिसऱ्या, शिणाणे, माकूळ इत्यादीदेखील मोठय़ा प्रमाणात प्रथिने पुरवतात. यांच्यामधील प्रथिनांचे प्रमाण कोंबडीच्या मांसामधील प्रथिनांइतकेच असून ती पचनास हलकी असतात. शिवाय लोह, जस्त, ‘ई’ जीवनसत्त्वही मोठय़ा प्रमाणात यातून मिळते. शेवंडे प्रथिनांबरोबर कॅल्शिअम आणि फॉस्फरसही पुरवतात. खेकडय़ापासूनही खूप मोठय़ा प्रमाणात प्रथिने, क्षार मिळतात. त्यात ‘ब’ जीवनसत्त्व, सेलेनिअम, फॉस्फरस, पोटॅशिअमसुद्धा मिळते. चिंबोऱ्या, करंदी, माकुळ, कालवं (ऑयस्टर) आणि ऑक्टोपस यांपासूनही विविध खाद्यपदार्थ बनवले जातात. हे सर्व समुद्री प्राणी प्रथिनांबरोबर शरीरास आवश्यक अशी अमिनो आम्लेही पुरवतात. त्यांच्यामध्ये कबरेदके कमी असल्यामुळे शरीरात कमी उष्मांक जातात. चवदार खाऊनही वजन कमी ठेवण्यासाठी यांच्यासारखे दुसरे अन्न नाही हे खरेच!

शाकाहारी लोकांच्या प्रथिन आहाराची गरजही समुद्र पूर्ण करतो. विविध प्रकारच्या सागरी वनस्पतींमध्ये मोठय़ा प्रमाणात प्रथिने आढळतात. सागरी शैवालांपासून अनेक देशांमध्ये स्वादिष्ट पदार्थ बनवतात. जपानमध्ये सुशी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे ‘नोरी’ हे तांबडे शैवालच आहे. यामध्ये जवळजवळ ५० टक्के प्रथिने असतात. जांभळा लावेर, डलसे, उल्वा हे व यांसारख्या अनेक मोठय़ा आकाराच्या प्रथिनयुक्त शैवालांची मृदाहीन शेतीमध्ये लागवड करून विक्री करतात. काही सूक्ष्मशैवाल म्हणजेच एकपेशीय वनस्पतीसुद्धा मोठय़ा प्रमाणात प्रथिने पुरवतात. वनस्पतीजन्य पदार्थामध्ये न आढळणारे ‘ब’ जीवनसत्त्व यात मोठय़ा प्रमाणात असते. प्रथिने व इतर पोषकद्रव्यांच्या गोळय़ा बनवण्यासाठी वापरण्यात येणारे स्पिरुलिना हे असेच नीलहरित शैवाल आहे. प्रथिनांची कमतरता असणाऱ्या लोकांसाठी समुद्री आहार हे वरदानच आहे!

रेणू भालेराव

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

Story img Loader