‘चॅलेंजर’ जहाजाच्या शोधमोहिमेनंतर जगभरातले इतर प्रगत देश समुद्र संशोधनासाठी सतत मोहिमा काढू लागले. यात जर्मनी, बेल्जियम, नॉर्वे, डेन्मार्क, हॉलंड, ग्रेट ब्रिटन (यूके) आणि अमेरिका हे देश जास्त प्रमाणात समुद्र ढवळून काढू लागले. १८७४ पासून ते १९६५ पर्यंत अनेक देशांनी विविध नावांच्या शोधमोहिमा हातात घेतल्या. आपल्या दृष्टीने यातील महत्त्वाची शोधमोहीम म्हणजे ‘इंडियन ओशन एक्सपेडिशन’ म्हणजे ‘‘हिंदी महासागरातील शोधमोहीम’’ जी १९६२ ते ६५च्या दरम्यान घेतली गेली.
या अगोदर फार पूर्वी १७८६-८७ या कालावधीत भारतीय समुद्री प्राण्यांची माहिती एनसीन फ्रँकलिन नावाच्या शास्त्रज्ञाने प्रसिद्ध केली होती. त्याच्या लेखनात त्या काळातील मुंबईदेखील समाविष्ट होती आणि मुंबईच्या किनाऱ्याने त्याने सप्टेंबर- ऑक्टोबरच्या दरम्यान खूप मोठय़ा प्रमाणात ‘सी हेअर’ (अॅप्लिशिया) हे मृदुकाय प्राणी असल्याची नोंद करून ठेवली आहे. परंतु तीनशे वर्षांपूर्वीची मुंबई आणि आताची मुंबई याच्यात जमीन-अस्मानाचा फरक पडला आहे. तद्वतच खूप जीवसृष्टी असणाऱ्या सागर किनाऱ्यांना आपण उजाड बनवले आहे. तरीही मुंबईच्या किनाऱ्याने प्रवाळ, मृदुकाय आणि संधिपाद प्राण्यांनी अजूनही अधिवास सोडलेले नाहीत.
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या धामधुमीत सागरी संशोधन मोहिमांत खंड पडला. तरीही ब्रिटिशांच्या नजरा समुद्राकडे होत्याच. वेलिच आणि व्हाइट या दोघांनी १८२६ मध्ये हिंदूस्तानच्या किनाऱ्यावरील ‘सागरी शैवाल’ याचा अभ्यास केल्याचे आढळून येते. परंतु ‘मरीन सव्र्हे ऑफ इंडिया’ या कार्यक्रमांतर्गत १८७४ पासून ब्रिटिश सरकारने सागरी जीवांची नोंद करण्यास सुरुवात केली होती. याच्याही अगोदर ब्रिटिश-भारतीय नौदलाने १८३२ ते १८६२ या कालखंडात इराकपासून सेशेल्सपर्यंत समुद्र-जीवांचा शोध घेण्याचे प्रयत्न केले होते. ब्रिटिश लोकांना दळणवळणासाठी सुरक्षित मार्ग हवा होता आणि म्हणून समुद्राचे सर्वेक्षण करण्याचे काम त्यांनी मोठय़ा प्रमाणावर हातात घेतले. तत्कालीन स्थानिक लोकांना विचारून प्रवाह आणि लाटा यांच्या तडाख्यांतून जमिनीकडे सुरक्षितपणे पोचण्यासाठी आणि बंदरे उत्तम पद्धतीत बांधण्यासाठी हे ब्रिटिश लोक, समुद्र विज्ञानाकडे आकर्षित झाले होते. त्यामागे ‘अभ्यास कमी पण व्यापार जास्त’ ही संकल्पना असल्याने त्यांच्या शोधमोहिमा वेगळय़ा प्रकारच्या ठरतात. तरीही त्या काळातील काही शास्त्रज्ञांनी सागरी जीवांची माहिती मोठय़ा स्वरूपात संपादित करून ठेवली आहे. त्यापैकी सर फ्रान्सिस डे यांनी तयार केलेले भारतीय माशांवरील खंड आजही २०२३ मध्ये भारतातल्या विविध महाविद्यालयांत सागरी जीवशास्त्राचे विद्यार्थी संदर्भासाठी वापरत असतात.
– डॉ. नंदिनी वि. देशमुख
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org