पुण्याच्या गणेशिखड निसर्ग व कृषी उद्यानास आता राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचा दर्जा आहे. या उद्यानाची निर्मिती पेशवेकाळात १७९६ ते १८१८च्या दरम्यान झाली. याची साक्ष देणारे ‘पेशवा’ हे बाजीराव पेशव्यांनी लावलेले आंब्याचे झाड अजूनही या उद्यानात फुलते आहे.
प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ जी. एम्. व्रूडो यांनी १८७३ साली या उद्यानाची शास्त्रीय मांडणी केली. १८७८-७९ साली उद्यानास मुंबई राज्यातील मुख्य वनस्पती शास्त्रीय उद्यान म्हणून मान्यता मिळाली.
१९०१मध्ये हे उद्यान कृषी विभागाच्या अखत्यारित आले. १९०३ मध्ये हे ‘बोटॅनिकल गार्डन’ म्हणून प्रसिद्ध झाले. १९६८मध्ये हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे वर्ग करण्यात आले. तेव्हापासून या उद्यानात फळे, भाजीपाला व फूलपिकांच्या संशोधनाचे काम सुरू झाले. १९८७ पासून येथे ‘राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प’ कार्यरत आहे.
संशोधन केंद्रात मुख्यत्वे करून बागायती फळे, भाजीपाला, उच्च तंत्रज्ञानावर आधारित हरितगृहातील आणि उघडय़ावरील फूलपिके, सूक्ष्मजीवशास्त्र व जैविक कीड आणि रोग नियंत्रण या विषयांवरील संशोधन होते. मदानी विभागासाठी पीक पद्धती, सूक्ष्म अन्नद्रव्यासंबंधी संशोधन व पीक काढणीनंतरचे तंत्रज्ञान इत्यादींवरही संशोधनाचा भर असतो. येथील रोप वाटिकेतून उत्तम प्रतीच्या रोपांचा पुरवठा केला जातो. दूरदूरचे शेतकरी, संस्था येथून फळे, फुले आदींची रोपे, बियाणे नियमितपणे नेत असतात. जमीन व पाणी विश्लेषण, कीड व रोग संरक्षण आदी सर्व प्रयोगशाळा येथे अद्ययावत उपकरणांसह कार्यरत आहेत.
या केंद्रावरून फळ पिकांमध्ये द्राक्षे- चिमासाहेबी, डाळींब- गणेश, पेरू- सरदार; भाजीपाला पिकांमध्ये घोसाळी- फुले प्राजक्ता, घेवडा- फुले सुयश, भेंडी- उत्कर्षां, ब्रोकोली- गणेश ब्रोकोली, वाल- फुले सुरुची आणि फूल पिकामध्ये एस्टर- फुले गणेश िपक, फुले गणेश व्हायोलेट, फुले गणेश व्हाइट, फुले गणेश पर्पल, ग्लॅडिओलस- फुले गणेश, फुले प्रेरणा, फुले नीलरेखा, फुले तेजस, निशिगंध- फुले रजनी; कडधान्यात घेवडा- वरुण हे प्रमुख वाण विकसित करण्यात आले आहेत.
संशोधन केंद्रावरील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना लेख, मेळावे, दूरदर्शन, आकाशवाणी यांद्वारे संशोधनाची माहिती देत असतात. तसेच दूरध्वनीद्वारे अथवा प्रत्यक्ष शेतावर जाऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करतात.
-डॉ. शिवाजी गुरव,
डॉ. चंद्रशेखर क्षीरसागर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
आजचे महाराष्ट्रसारस्वत : २८ जानेवारी
१८९४ > कथा-कादंबरीकार आनंदीबाई जयवंत यांचा जन्म. बडोद्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. ‘शिकार’ ही सामाजिक कथा, ‘चितोडचा चंद्र’ ही ऐतिहासिक कादंबरी या त्यांच्या उल्लेखनीय साहित्यकृती.
१८९५ > मराठी वैचारिक नियतकालिकांचे प्रणेते आणि आध्यात्मिक ग्रंथांचे भाष्यकार, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व गांधीविचारांचे सेवक शंकरराव दत्तात्रेय देव यांचा जन्म. ‘स्वराज्य’ साप्ताहिक (१९२५) , ‘लोकशक्ती’ दैनिक (१९३८) तसेच ‘नवभारत’ हे वैचारिक मासिक (१९४७) त्यांनी सुरू केले. मुलांसाठी ‘सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला’ सुरू केली, तर ‘उपनिषत्सार’, ‘भगवान बुद्धासाठी’ आदी पुस्तके लिहिली. ‘समाज प्रबोधन संस्था’ सुरू करणाऱ्या देव यांनी पुढे या संस्थेतर्फे ‘समाज प्रबोधन पत्रिका’ हे द्वैमासिक सुरू केले. ‘दैव देते पण कर्म नेते’ हे देव यांचे आत्मचरित्र (१९७६) त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाले.
१९७२ > कथाकार, विनोदी लेखक आणि ‘संजीवनी’ या मासिकाचे संस्थापक-संपादक प्रभाकर श्रीपाद कोल्हटकर यांचे निधन. लक्ष्मीबाई टिळकांची ‘स्मृतिचित्रे’ प्रथम ‘संजीवनी’तून दरमहा प्रकाशित झाली! ‘आकाशवाणी’, ‘मोड आणि खुर्दा’ हे विनोदी लेख पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले.
संजय वझरेकर
वॉर अँड पीस : कोड : पांढरे डाग
कोड हा रोग नव्हे. रोग शब्दातील मूळ धातू ‘रूज्’ आहे. त्याचा अर्थ कळणे, जाणीव होणे. फक्त भारतातच या रोगाला पब्लिक फार घाबरते. युरोप, अमेरिकेत या रंगबदलाकरिता कोणी औषधे घेत नाही. आपल्या त्वचेतील एक रंगीत द्रव्य कमी झाले की त्या जागी पांढरे डाग येतात. छातीवर, गळ्यावर उठणारे पांढरे छोटे ठिपके कोड नसून ‘शिबे’ असते. ओठ, केस, नखांची टोके, डोळे, स्तन, मत्रेंद्रिये यावरील डाग जायला वेळ लागतो. अन्य अवयवांवरील डाग औषधांशिवाय खाण्यापिण्याचे पथ्य पाळले तर निश्चयाने जातात. आंबट, खारट पदार्थ, केळी, आंबवलेले पदार्थ, लोणची, पापड, दही, पाव, मांसाहार, शिकरण, फ्रूट सॅलड व मीठ या गोष्टी कटाक्षाने टाळाव्या. काही वेळा जंत, कृमी, खराब पाणी यामुळेही कोडासारखे डाग येतात. त्याकरिता जिभेचे परीक्षण करावे. जिभेवर ठराविक प्रकारचे डाग असतात. कोड सांसर्गिक नाही, पण अनुवंशिक असू शकते.
भारतभर या डागांच्या समस्यांकरिता वर्तमानपत्रात जाहिराती येतात. त्या सर्व औषधात बावची लेपगोळीचा समावेश असतो. बावचीच्या बिया गोमूत्रांत वाटून त्याचा लेप लावल्यास कोडाचे पांढरे डाग प्रथम लालसर व नंतर काळसर होऊन नाहीसे होतात. मात्र काही पित्तप्रकृतीच्या व्यक्तींना या लेपाची रिअॅक्शन येते. मुंबईसारख्या दमट व उष्ण हवेच्या ठिकाणी असा लेप लावू नये. काहीजण हरताळ, मनशीळ यांचे लेप लावण्याचा सल्ला देतात. ते लेप फार तीव्र म्हणून त्याज्य आहेत. कोडाच्या उपचारांची दिशा तीन प्रकारची आहे. पोट साफ ठेवणे, कृमी, जंत होऊ न देणे. त्याकरिता यकृताचे काम सुधारावे म्हणून आरोग्यवर्धिनी व कृमिनाशक गोळ्या प्रत्येकी तीन दोन वेळा, सुंठ चूर्णाबरोबर, सकाळी न्याहारी नंतर व सायंकाळी सहा वाजता बारीक करून घ्याव्या. सकाळच्या औषधांबरोबर उपळसरी चूर्ण एक चमचा घ्यावे. झोपताना त्रिफळा चूर्ण एक चमचा व कपिलादि वटी सहा गोळ्या घ्याव्या. संबंधित व्यक्तीने चिंता केली नाही तर डाग लवकरच नाहीसे होतात.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
जे देखे रवी.. : भारतीय मानसशास्त्र : मन, जीव आणि चित्त
पातंजलीने योगशास्त्र सांगितले परंतु त्याच्या विवेचनाचे नाव भारतीय मानसशास्त्र असेही आहे. कारण बाहेर रमणारे मन आत वळवून आपल्यातील निखळ स्पंदनाचा अनुभव घेण्यासाठी हे शास्त्र सांगण्यात आले. पातंजली दोन हजार वर्षांपूर्वीचे; तेव्हा तर आयुष्य संथ असणार, मग त्या वेळी मनाची घालमेलही कमी असणार असे मला वाटत असे.
परंतु हे मन आहे तरी कसे। कुठे आणि केवढे। ह्याला हुडकणे। अशक्य।
हे एवढे भटके। की त्रिभुवन पडते तोकडे। समाधि घेतील माकडे।
परंतु हे नाही।
या ज्ञानेश्वरांच्या ओव्या वाचल्यावर पातंजली मुनींना हा खटाटोप का करावा लागला हे ध्यानात आले. आपल्या अंतरंगाची क्रमवार रचना अशी :
(१) सचेतन आणि अचेतन या गोष्टींतला मूलभूत फरक असा की, सचेतन गोष्टींतले चैतन्य किंवा उष्मांक (कॅलरीज) आसमंतातून आत घेतल्या जातात. अचेतन गोष्टींत असे होत नाही. (२) हे आत घेणे घडले की ती वस्तू सचेतन होते आणि त्या वस्तूला ‘मी’पणाची जाणीव होते. (३) या मीपणात अनाहूतपणे तू, तो, तुम्ही, इतर ते, असेही तयार होत असतात. (४) या मी व तो पणाला द्वैत म्हणतात. (५) ज्या ठिकाणी मी आणि इतर गोष्टींचे भान निर्माण होते त्याला मन म्हणतात.. (६) इथे गजबजाट आणि बुजबुजाट असतो (७) यापुढची पायरी म्हणजे हा किंवा ही मी जगू इच्छितो/ इच्छिते असे म्हणण्याची, तेव्हा जीव तयार होतो. (८) गजबजाटात आता स्वार्थ निर्माण होतो आणि जीव जगण्याचे उपाय शोधतो. (९) त्यात द्वैताला धार चढते आणि आटापिटय़ाचा जन्म होतो. (१०) याच्या पलीकडे थोडे तरी जाण्यासाठी जेव्हा बुद्धीच्या मार्फत विचार सुचतात तेव्हा गजबजाट कमी होतो व त्या प्रक्रियेला चित्त म्हणतात. (११) हे चित्त सारासार विचार करू शकते. सारासार या शब्दात सार म्हणजे घेण्याजोगे व असार म्हणजे इतर टाकाऊ असे दोन शब्द आहेत. (१२) या चित्तात विचारांना दिशा मिळते, दुसरा आपल्यासारखाच आहे, आपले उगमस्थान एकच असा प्रकाश डोक्यात पडतो. (१३) आयुष्य सुसह्य होतेच आणि सहजीवन सुलभ होते. (१४) माणसाच्या आयुष्यात सापशिडीचा खेळ अपरिहार्य असतो, पण तो केवळ खेळ म्हणूनच खेळतो आहोत याचे भान आपल्याला चित्त नावाची प्रक्रियाच देऊ शकते.
मन वाभरे असते. जीव हा शब्द, जीव अडकला, घुटमळला, भांडय़ात पडला, कासावीस झाला अशा तऱ्हेने वापरतात. ‘माझ्या जिवाला चैन पडेना’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो.
चैन पडण्यासाठी चित्त उपयोगी पडते.
रविन मायदेव थत्ते
rlthatte@gmail.com