पुण्याच्या गणेशिखड निसर्ग व कृषी उद्यानास आता राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचा दर्जा आहे. या उद्यानाची निर्मिती पेशवेकाळात १७९६ ते १८१८च्या दरम्यान झाली. याची साक्ष देणारे ‘पेशवा’ हे बाजीराव पेशव्यांनी लावलेले आंब्याचे झाड अजूनही या उद्यानात फुलते आहे.
प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ जी. एम्. व्रूडो यांनी १८७३ साली या उद्यानाची शास्त्रीय मांडणी केली. १८७८-७९ साली उद्यानास मुंबई राज्यातील मुख्य वनस्पती शास्त्रीय उद्यान म्हणून मान्यता मिळाली.
१९०१मध्ये हे उद्यान कृषी विभागाच्या अखत्यारित आले. १९०३ मध्ये हे ‘बोटॅनिकल गार्डन’ म्हणून प्रसिद्ध झाले. १९६८मध्ये हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे वर्ग करण्यात आले. तेव्हापासून या उद्यानात फळे, भाजीपाला व फूलपिकांच्या संशोधनाचे काम सुरू झाले. १९८७ पासून येथे ‘राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प’ कार्यरत आहे.
संशोधन केंद्रात मुख्यत्वे करून बागायती फळे, भाजीपाला, उच्च तंत्रज्ञानावर आधारित हरितगृहातील आणि उघडय़ावरील फूलपिके, सूक्ष्मजीवशास्त्र व जैविक कीड आणि रोग नियंत्रण या विषयांवरील संशोधन होते. मदानी विभागासाठी पीक पद्धती, सूक्ष्म अन्नद्रव्यासंबंधी संशोधन व पीक काढणीनंतरचे तंत्रज्ञान इत्यादींवरही संशोधनाचा भर असतो. येथील रोप वाटिकेतून उत्तम प्रतीच्या रोपांचा पुरवठा केला जातो. दूरदूरचे शेतकरी, संस्था येथून फळे, फुले आदींची रोपे, बियाणे नियमितपणे नेत असतात. जमीन व पाणी विश्लेषण, कीड व रोग संरक्षण आदी सर्व प्रयोगशाळा येथे अद्ययावत उपकरणांसह कार्यरत आहेत.
या केंद्रावरून फळ पिकांमध्ये द्राक्षे- चिमासाहेबी, डाळींब- गणेश, पेरू- सरदार; भाजीपाला पिकांमध्ये घोसाळी- फुले प्राजक्ता, घेवडा- फुले सुयश, भेंडी- उत्कर्षां, ब्रोकोली- गणेश ब्रोकोली, वाल- फुले सुरुची आणि फूल पिकामध्ये एस्टर- फुले गणेश िपक, फुले गणेश व्हायोलेट, फुले गणेश व्हाइट, फुले गणेश पर्पल, ग्लॅडिओलस- फुले गणेश, फुले प्रेरणा, फुले नीलरेखा, फुले तेजस, निशिगंध- फुले रजनी; कडधान्यात घेवडा- वरुण हे प्रमुख वाण विकसित करण्यात आले आहेत.
संशोधन केंद्रावरील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना लेख, मेळावे, दूरदर्शन, आकाशवाणी यांद्वारे संशोधनाची माहिती देत असतात. तसेच दूरध्वनीद्वारे अथवा प्रत्यक्ष शेतावर जाऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करतात.
-डॉ. शिवाजी गुरव,
डॉ. चंद्रशेखर क्षीरसागर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा