पिकांच्या कोणत्याही वाणाच्या बियाण्याची आनुवंशिक शुद्धता राखणे, उगवण क्षमता टिकवणे, अपेक्षित आकाराचे आणि वजनाचे निरोगी बियाणे मिळवणे हे बीजोत्पादनाचे मुख्य उद्देश आहेत. नैसर्गिक बीजोत्पादन स्वयं परागीकरण आणि पर परागीकरण या माध्यमांतून होत असते. तसेच पायाभूत बियाण्यासाठी आणि प्रमाणित बियाण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती प्रचलित आहेत. मात्र दोन प्लॉटमध्ये विलगीकरणासाठी अंतर ठेवणे आवश्यक असते. कारण फुले सकाळी उगवतात व एखाद्या तासानंतर परागमुक्त होतात. त्यानंतर फूल सुकते व गळते. शेतात वाऱ्याची झुळूक आल्यास परागीकरणास मदत होते, फळधारणाही होते.
बीजोत्पादनाची तयारी शेतातील उभ्या पिकापासून करावी लागते. पक्व झालेली फळे, कणसे ताबडतोब तोडून फक्त निरोगी मुळे वापरावीत. बियाणे अलग करून साफ करावे, उन्हात व नंतर सावलीत वाळवावे. पेरणीपूर्वी बियाणे कीडनाशक आणि बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवावे. त्यांची उगवणक्षमता ९० टक्क्यांपेक्षा कमी नसावी. बियाण्यातील आद्र्रता हवेतील सापेक्ष आद्र्रतेबरोबर वाढत असते. म्हणून बियाणे बीजप्रक्रिया करून सावलीत कोरडय़ा ठिकाणी साठवावे. बियाण्यातील आद्र्रता एक टक्क्यापेक्षा कमी झाल्यास बियाणे उगवत नाही. हवाबंद डब्यात (बियाण्यातील आद्र्रता चार ते पाच टक्के) सुद्धा बियाण्याची साठवणूक एक-दोन वर्षांसाठी करता येते. यासाठी पॉलिथिनही वापरता येते. कमी घनता असलेली पॉलिथिन शीट वा तुकडा कापून त्यात कडक वाळलेले बियाणे सुरक्षित ठेवता येते.
बियाण्याची उगवणक्षमता तपासण्यासाठी कडक, सडके बियाणे वेगळे करावे आणि मिठाच्या द्रावणात (५० ग्रॅम मीठ/एक लिटर पाणी) बुडवावे. ढवळल्यानंतर पाण्यावर तरंगणारे बियाणे काढून टाकावे. ओलसर स्वच्छ टॉवेल, रुमाल किंवा गोणपाटात उरलेल्यांपकी २०० बियाणे सारख्या अंतरावर ठेवून गुंडाळावे. सुरक्षित ठिकाणी ठेवावे. दररोज आवश्यकतेनुसार ओलसरपणा कायम ठेवावा. अंकुरणाऱ्या बियाण्यांची संख्या मोजून उगवणक्षमतेची टक्केवारी काढावी.
सावलीत मातीचा वाफा तयार करून त्यांत किंवा मातीच्या कुंडीत १० सेंमी वाळूचा थर द्यावा. नंतर पाणी शिंपडून वरील २०० बियाणे सारख्या अंतरावर १ अथवा १.५ सेंमी खोल टोकावे. वरून ओलसर वाळू पसरावी. गरजेनुसार झारीने पाणी द्यावे. अंकुरणाऱ्या बियाण्यांची संख्या पुन्हा मोजून प्रतवारी काढावी.
जे देखे रवी.. – कर्माचा प्रवाह
कर्म प्रवाही असते आणि त्यात मी मी म्हणणारे शेवटी वाहून जातात, असे ज्ञानेश्वर एका ओवीत सुचवितात आणि म्हणतात, ‘हे विश्व सहजपणे आपल्या स्वभावानुसार निर्माण झाले हे लक्षात घे.’ सांगण्याचा मुद्दा असा असावा की, देव नावाचा कोणी कारागीर हे विश्व बनवीत नाही. या कर्माचे स्वरूप खालीलप्रमाणे इंग्रजीत मांडता येते :
The sky gets full when the rains are due With the coming of Spring, the trees get plumed A lass, looking comely, is youth on view As the Sun comes to rise, the lotus will bloom. Karma thus grows, morning and noon, but never does at once, come too soon
plum ¸हणजे पिसारा. पालवीच्या ऐवजी हा शब्दप्रयोग केला आहे. Lass ¸हणजे मुलगी मुलाला इंग्रजी Lad म्हणतात. Comely या शब्दाला मराठीत पारिभाषिक शब्द नसावा. ज्ञानेश्वरांनी न्हवाळी (नव्हाळी) असा शब्द वापरला आहे. शेवटचे वाक्य सर्वात महत्त्वाचे. निसर्गात सगळे वेळेवर चालते. अचानक काही घडत नाही. भूकंपाच्या आधीही खोलवर काहीतरी कडमडत असते. ही माझी इंग्रजीतील रचना यमक करीत करीत केलेली, पण मुळात ज्ञानेश्वरीवर बेतलेली. बेतलेली शब्द मुद्दामच वापरला. कारण मी ज्ञानेश्वरीचे इंग्रजीत जाडजूड भाषांतर केल्यावर माझ्यावरच बेतली.
एक भाविक म्हणाले, ‘हे तुम्ही केलेले नाही. माउलीने तुमच्याकडून करून घेतले आहे.’ मलाच ज्ञानेश्वरांचे वाईट वाटले. एक म्हणाले, ‘हे तुमचे चुकले. ज्ञानेश्वरीवर असले प्रयोग करणे योग्यच नाही.’ एक म्हणाला, ‘एक प्रत विकत दे. बांधणी मोठी आकर्षक आहे. माझ्या दिवाणखान्याला शोभेल.’ दुसऱ्या एका फार मोठय़ा कंपनीच्या सीईओने १० प्रती विकत घेतल्या तेव्हा आधीचा म्हणाला, ‘उशी म्हणून वापरत असावा.’ तो सीईओ म्हणाला, ‘एक प्रत मी परदेशातल्या एका कंपनीच्या मालकाला दिली आणि आम्हाला मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.’ एकाने निष्कर्ष काढला की, ‘ज्या अर्थी तू एवढा वेळ या कामासाठी दवडलास त्या अर्थी तुझी प्रॅक्टिस कमी असणार.’ प्रत्येकाचे विचार करणे। हे ज्याच्या-त्याच्या डोक्याप्रमाणे।। शेवटी कर्म थांबत नाही. ‘चेंडू टाकल्यावर जसे कुत्रे त्याच्या मागे धावते तसेच आपण सगळे धावत असतो,’ हे वाक्य ज्ञानेश्वरांच्या ओवीवरच आधारित आहे. ‘चांगले-वाईट काहीच नसते. आपण मानावे तसे दिसते,’ हे वाक्य शेक्सपीयरचे. आपण आपले टेफ्लॉनच्या भांडय़ासारखे असावे. ज्ञानेश्वर म्हणतात तसे, ‘कोठला पदार्थ आपल्यात शिजतो, याची काळजी भांडय़ाला नसते. आपल्यात वा अवतीभोवती जे शिजत असते ते बघत राहावे, आपले काम करावे.’
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस – मुखरोग: भाग-४
अनुभविक उपचार- १) अडखळत बोलणे- ब्राह्मी वटी, ज्वरांकुश, सुवर्णमाक्षिकादि प्रत्येकी ३ गोळ्या २ वेळा, जेवणानंतर सारस्वतारिष्ट ४ चमचे पाण्यासह. २) खवखव व गिळावयास त्रास- पित्त हे कारण असल्यास कामदुधा, लघुसूतशेखर चावून खाणे. कफ कारण असल्यास खदिरादिवटी गोळ्या एकामागोमाग चघळणे, इरिमेदादि तेल कोमट पाण्यात टाकून गुळण्या करणे.
३) गालगुंड- कामदुधा व प्रवाळ प्रत्येकी २-३ वेळा चावून घाणे. चुना व गुळाचा दाट लेप बाहेरून लावणे. रुग्णास लांब ठेवणे,
४) घटसर्प- प्रवाळ, कामदुधा व मौक्तिक भस्म थोडय़ा प्रमाणात पुन:पुन: घेणे, गरम पाण्यात इरिमेदादि तेल टाकून वरचेवर गुळण्या करणे. घशाला गार वारे लागू न देणे, ५) जिभेवर किटण- झोपताना त्रिफळा वा गंधर्वहरितकी चूर्ण व कपिलादिवटी ६ गोळ्या गरम पाण्यासह घेणे, आरोग्यवर्धिनी, त्रिफळागुग्गुळ प्र. ३ गोळ्या २ वेळा चावून खाणे, जिभेला इरिमेदादि तेल घासून लावणे, ६) पडजिभेचे विकार- पडजीभ लांबली असल्यास हळद किंवा मीठ चमच्याच्या टोकाने दाबून पडजीभ बसवावी. लाल झाली असल्यास व क्षोभ असल्यास इरिमेदादि तेलाच्या पिचूने पडजीभ दाबावी. ७) पांढरे ठिपके- खदिरादि, रजन्यादि प्र.२ अशा ६ ते ८ गोळ्या चघळून खाणे. गरम पाण्यात हळद,मीठ टाकून गुळण्या, ८) शोष- कुष्मांडपाक३ चमचे सोबत प्रवाळ, कामदुधा प्र. ३ गोळ्या सकाळ सायं. घेणे, एलादिवटी एक-एक करून ६ ते ८ वेळा चघळणे. कफ असल्यास वासापाक २वेळा ३ चमचे घेणे.
रुग्णालयीन उपचार- १) अडखळत बोलणे- तोंडात गोटय़ा ठेवून मोठय़ाने लांब आवाज काढावयाचा प्रयत्न करणे. खडय़ा आवाजात लांब भाषणाचा प्रयोग करणे २) खवखव, गिळायला त्रास- गरम पाण्यात मीठ, हळद टाकून गुळण्या, इरिमेदादि तेलाचे थेंबासह गुळण्या, घशाते इरिमेदादि तेल कापसाच्या बोळ्याने लावणे, ३) गालगुंड- चुना, गूळ व लेपगोळी असा दाट लेप लावणे. रुग्णाला इतरांपासून पूर्ण वेगळे ठेवणे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – २० जून
१९११ > ‘हिंदूपंच’, ‘कल्पतरू’ आणि ‘सुवर्णमाला’ या नियतकालिकांचे संपादन करीत कविता लिहिणारे आणि भाषांतरित करणारे एकनाथ गणेश भांडारे यांचे निधन. ‘मुक्तांजली’ या त्यांच्या संग्रहात शेक्सपियर, वर्डस्वर्थ, टेनिसन आदींच्या कवितांचे अनुवाद आहेत. वेश्यागमनाच्या दुष्परिणामांवर त्यांनी ‘कामकंदनकला’ हे नाटक लिहिले होते.
१९९७ > ‘मराठीतील पहिले शायर’ असा लौकिक असलेले वासुदेव वामन पाटणकर, म्हणजेच ‘जिंदादिल’ भाऊसाहेब पाटणकर- यांचे निधन. ‘जिंदादिल’ हा त्यांचा संग्रह प्रसिद्ध आहेच. ‘आजवर बेधुंदतेने मांड जैसा गायिला, त्याच त्या तल्लीनतेने जोगियाही गायिला’ अशा शब्दांत त्यांनी आसक्ती आणि वैराग्य हे दोन्ही गुण शायरीत कसे असतात, याचे वर्णन केले आहे. पाटणकरांच्या आधीही शायरीचे तंत्र मराठीत वापरले गेले होते, पण ‘शायराना जिंदादिली’ पाटणकरांनीच मराठीत आणली.
२००८ > अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे निधन. अभिनयामुळे लेखनाला फार वेळ देऊ न शकलेल्या गोखले यांनी, ‘चंद्रकिरण’ या आत्मचरित्रातून आपल्या जडणघडणीची आणि चित्रपटसृष्टीतील सात ते आठ दशके झालेल्या वावराची कहाणी चितारली आहे.
– संजय वझरेकर