सुनीत पोतनीस
एखाद्या अमेरिकन कुटुंबाच्या पाच पिढय़ांतील सदस्यांनी वैद्यकीय शिक्षण घेऊन भारतात सव्वाशे वर्षे व्रतस्थपणे वैद्यकीय सेवा दिली हे कोणालाही अविश्वसनीय वाटण्यासारखंच आहे! मूळचे अमेरिकेतील न्यू जर्सी येथील रहिवासी असलेल्या स्कडर या घराण्यातल्या पाच पिढय़ांमधील ४२ जणांनी दक्षिण भारतात स्थायिक होऊन विविध आजारांवर औषधोपचार आणि सेवा देण्याचा जसा काही वसाच घेतला होता!
या सेवाभावी कार्याची सुरुवात केली ती डॉ. जॉन स्कडर, ज्युनियर यांनी. १७९३ मध्ये न्यू जर्सीत जन्मलेले जॉन हे भारतात आलेले पहिले मेडिकल मिशनरी समजले जातात. १८११ मध्ये प्रिन्स्टन युनिव्हर्सटिीतून वैद्यकीय पदवी मिळवल्यानंतर त्यांनी न्यू यॉर्क कॉलेज ऑफ सर्जन्समधून पुढचे शिक्षण घेतले. शिक्षणानंतर न्यू यॉर्कमध्येच त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. व्यवसाय उत्तम चालला असताना आपल्या मन:स्थितीत काही तरी बदल होतोय असं त्यांना वाटू लागलं.
जॉनना असं जाणवू लागलं की, भारतीय उपखंडात जाऊन तिथल्या आजारी लोकांना औषधोपचार करण्याचं दैवी आवाहन आपल्याला होतंय! त्यांनी आपला व्यवसाय बंद करून अमेरिकन बोर्डाच्या मेडिकल मिशनमार्फत प्रथम सिलोनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. काही वर्षे सिलोनमध्ये वैद्यकीय सेवा दिल्यावर जॉन १८३६ मध्ये तामिळनाडूत मद्रास आणि नंतर मदुराईत स्थायिक झाले. मदुराईत मेडिकल मिशनचे कार्य आणि आठवडय़ातून एक दिवस धर्मोपदेशकाचे कार्य करीत असताना त्यांनी एक छापखानाही सुरू केला. जॉन स्कडर यांना ६ मुले, २ मुली. विशेष म्हणजे या सर्वानी अमेरिकेत वैद्यकीय शिक्षण घेऊन तामिळनाडूतील निरनिराळ्या गावांमध्ये आयुष्यभर वैद्यकीय सेवा पुरवली. हे वैद्यकीय सेवेचं लोण इथंच न थांबता या मुलांची मुलं, त्यांचे काही नातेवाईक विभिन्न वैद्यकीय शाखांमधील शिक्षण घेऊन जसं काही ही देवानं आपल्यावर सोपविलेली कामगिरी असल्याप्रमाणं दक्षिण भारतातल्या लोकांना सेवाभावानं वैद्यकीय सेवा देत राहिले. या ४२ स्कडर वंशजांपैकी वेल्लोर येथील डॉ. इडा स्कडर यांचं कार्य विशेष उल्लेखनीय आहे. सध्या तामिळनाडूतील वेल्लोर हे आधुनिक वैद्यकीय शिक्षण सुविधा आणि आधुनिक वैद्यकीय उपचार सुविधांनी सुसज्ज असे वैद्यकीय केंद्र बनलं आहे. ही स्कडर घराण्याचीच देणगी आहे!
sunitpotnis@rediffmail.com