शाडू ही निसर्गामधील पांढरट करडय़ा रंगाची माती. या मातीमध्ये सूक्ष्म कणांचे प्रमाण सर्वात जास्त असते. पाण्याच्या संपर्कात येताच तिची आकार्यता (plasticity) वाढते म्हणूनच या मातीस आपण हवा तसा आकार देऊ शकतो, विविध भौमितिक कोनांमध्ये वळवू शकतो. यासाठी मातीमध्ये योग्य प्रमाणात आद्र्रता असणे गरजेचे असते. या मातीचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे योग्य आकार दिल्यानंतर आद्र्रता कमी झाली तरी तिच्यामधील सूक्ष्म कण समूहाच्या रूपात एकामेकांस घट्ट चिटकून राहतात आणि दिलेला आकार एकसंध राहतो. शाडूमध्ये असलेल्या विविध मूलद्रव्यांपैकी अ‍ॅल्युमिनियम आणि सिलिकॉन या सूक्ष्म मूलद्रव्यांमुळेसुद्धा हा एकसंधपणा आणि चकाकी कायम राहते. पूर्वी वाहत्या पाण्याच्या कडेला जेथे दर्भासारखे विशिष्ट गवत आढळत असे तिथे शाडू हमखास मिळत असे. दर्भामधील आणि शाडूमधील सिलिका यांचा याचमुळे जवळचा संबंध असावा. स्वच्छ झुळुझुळु वाहणारे नदीचे पाणी खडक विदरणातून शाडूनिर्मितीस पोषक असते. ही माती कोकण आणि गुजरातमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. आता मात्र तिचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे आणि यास कारण म्हणजे नष्ट झालेले नदीकाठचे गवत, मुसळधार पाऊस आणि वेगाने वाहणाऱ्या नद्या. शाडूमध्ये तिच्याच रंगाची ‘फ्लायअ‍ॅश’ (औष्णिक विद्युत केंद्रातून बाहेर पडणारे दगडी कोळशाचे दुय्यम उत्पादन) सहज बेमालूम मिसळले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

निसर्गात वाहत्या नदीकाठी मिळणाऱ्या शाडूपासून मूर्ती निर्माण करण्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. नैसर्गिक रंग वापरलेली शाडूची मूर्ती लहान असावी आणि उत्सव संपल्यानंतर तिचे नदीच्या वाहत्या पाण्यात विसर्जन करावे, ही परंपरा होती. शाडूचे एक वैशिष्टय़ म्हणजे ती पाण्यात सहज विरघळते, मात्र तिच्यापासून पुन्हा मूळ शाडू मिळत नाही. ही विरघळलेली शाडू पाण्याबरोबर सहज वाहात जाऊन नदीच्या किनारी गाळाच्या रूपात स्थिरावते. गणेशास वाहिलेल्या पत्रींमध्ये वनस्पतीजन्य पदार्थ मिसळले जातात, कुजण्याच्या प्रक्रियेतून त्यातील कर्ब वाढू लागतो आणि नदीकाठचा गाळ सुपीक होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाडूमध्ये असलेल्या सिलिकासारख्या मूलद्रव्यामुळे नदीकिनारी मोठय़ा प्रमाणावर गवत वाढत असे आणि हेच गवत नदीच्या प्रवाहास नियंत्रित करत असे. निसर्गातील घटक एकमेकांवर कसे अवलंबून असतात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. आज उत्सव परिसीमेस पोहोचले आहेत. नद्या दुथडी भरून वाहात आहेत, अतिवृष्टी झाल्यास आजूबाजूच्या गावांत, शेतात पसरत आहेत, कारण त्यांना नियंत्रित ठेवण्यासाठी ना तेथे शाडू आहे ना दर्भासारखे वाढलेले उंच गवत.

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org