प्रगत मानवजात फार तर दोन लाख वर्षे पृथ्वीवर आहे. गोरिला, चिम्पान्झींसारखे कपिपूर्वज विचारात घेतल्यास माणसाचा उत्क्रांतीकाळ तीन कोटी वर्षांचा! शार्क मासे गेली किमान ३५ कोटी वर्षे जीवनकलहात टिकून आहेत. प्राणीवर्ग म्हणून इतका दीर्घकाळ टिकण्यात शार्कच्या काही खास शरीररचना महत्त्वाच्या ठरल्या. त्यांतील काहींचा येथे थोडक्यात उल्लेख केला आहे.
जन्मापूर्वी छोटासा भ्रूण असताना आपल्याला हाडे नसतात. आपला शरीर आधारक सांगाडा फक्त कास्थींचा (कार्टीलेजीस) असतो. नंतर हळूहळू बहुसंख्य कास्थींचे रूपांतर हाडांमध्ये होते. आपल्या मणक्यांच्या मधील जागा, बाह्यकर्ण, नाकाच्या, लांब हाडांच्या टोकांवरच्या कास्थी मात्र कास्थीच राहतात. त्यांचे रूपांतर हाडांत होत नाही. शार्कचा आधारक सांगाडा केवळ कास्थींचा असतो. त्यांची कधीच हाडे बनत नाहीत. असा सांगाडा वजनाला हलका, मजबूत, लवचीक असतो. शिवाय कास्थींची वाढ होण्याची क्षमता आयुष्यभर टिकून असते म्हणून त्यांची दुरुस्ती होऊ शकते.
आपल्या हाडांतील मऊ भागात, अस्थिमगजात रक्तपेशी निर्माण होतात. शार्कना हाडे नाहीत, अस्थिमगजही नाही. शार्क रक्तपेशींची निर्मिती प्लीहेत (स्प्लीन) होते. काही शार्कजातींत अन्ननलिकेला गुंडाळलेले ‘लिडिगचे इंद्रिय’ असते. ते रक्तपेशीनिर्मिती करते. शार्कजातींशिवाय ते कोणत्याही प्राण्यांत नसते. असेच खास शार्कजातींतच आढळणारे पुरोजनन ‘एपिगोनल’ इंद्रिय रोगप्रतिकारकतेसाठी असते.
शार्कच्या लहान आतडय़ांमध्ये ‘सर्पिल झडप’ (स्पायरल व्हॉल्व्ह) असते. अन्य प्राण्यांत ती नसते. सरळ घसरगुंडीऐवजी चकलीसारख्या गोल घसरगुंडीवरून आपण सावकाश खाली येतो. तसेच सर्पिल झडपेमुळे शार्कने खाल्लेले अन्न (मासाचे लचके) सावकाश शोषले जाते. त्याचसाठी ही व्यवस्था आहे. शार्कच्या कातडीवर छोटी शेपटीकडे वळलेली तीक्ष्ण खवले असतात. त्यांचे दणकट, लवचीक कवच शार्कचे रक्षण करते. तसेच पण मोठे तीक्ष्ण दात तोंडात असतात. दात खवल्यापासूनच तयार झालेले असतात. ते आयुष्यभर नव्याने उगवत राहतात. शार्कचे यकृत अन्य प्राण्यांच्या यकृतापेक्षा मोठे, शरीरवजनाच्या २५ टक्के असते. आपल्या यकृताचे वजन शरीराच्या ५ टक्के असते. शार्कच्या यकृतात बरेच तेल साठवलेले असते, ते शरीर हलके ठेवायला मदत करते. शार्कना लाल आणि पांढरे असे दोन प्रकारचे स्नायूतंतू असतात. लाल स्नायूतंतू सावकाश पण लांब अंतरे पोहायला उपयोगी पडतात, तर पांढरे स्नायूतंतू शीघ्रगतीने पण थोडेसेच अंतर पोहायला उपयोगी असतात.
– नारायण वाडदेकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org