शार्क कुळे गेली ४० कोटी वर्षे अस्तित्वात आहेत. पूर्वी शार्कना कर्करोग होत नाही, असा समज होता. परंतु कर्करोगग्रस्त शार्कच्या कास्थींमध्येही घातक घटक टय़ुमरसह मिळाले आणि शार्कना कर्करोग होत नाही हा गैरसमज असल्याचे स्पष्ट झाले. १९७०मध्ये अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स मेडिकल स्कूलमधील संशोधकांना प्रयोगांती समजले की कास्थी (कूर्चा, कार्टिलेजिस) हे हाडांसारखे आधारदायक लवचीक भाग ऊतींमधील रक्तवाहिन्यांची वाढ रोखतात. सशांच्या पिल्लांचे कास्थीअंश कर्करोगाच्या गाठींत रोपल्यास गाठींची वाढ थांबते.
कर्करोगात अनियंत्रित पेशीविभाजन होते. पेशी अमर्याद संख्येने वाढतात. कॅन्सरचे अर्बुद (टय़ुमर) अनियंत्रित पेशींचे मोठे समूह असतात. अर्बुदांच्या आतपर्यंत ऑक्सिजन, अन्नद्रव्ये नेण्यास सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे जाळे लागते. ते नसेल तर पेशींची वाढ खुंटून त्या मरतात. कर्करोग आटोक्यात राहतो वा होत नाही, हा विचार तर्कशुद्ध होता. शार्कच्या सांगाडय़ात हाडे नसून कास्थी असतात. तेव्हा शार्कच्या कास्थींची पावडर खाल्ली तर कर्करुग्णांना फायदा होईल, असे फ्लोरिडातील एका शास्त्रज्ञाला वाटले. शार्कना रोग फारसे होत नाहीत, कर्करोगाचे प्रमाणही कमी असते, हे त्याचे निरीक्षण नंतर चुकीचे ठरले. त्याने अफ्लॅटॉक्सिन हे कर्करोगकारक शार्कना टोचले तरी शार्कना कर्करोग झाला नाही. हे कळल्यावर डॉ. विल्यम लेन यांनी ‘शार्कना कर्करोग होत नाही, शार्ककास्थी जीव वाचवतात’ हे पुस्तक प्रकाशित केले. त्याची तडाखेबंद विक्री झाली.
परंतु शार्कना कर्करोग होत नाही, हे गृहीतकच चुकीचे होते. ऊतींमध्ये रोपण करणे आणि पावडर खाणे समान परिणाम घडवतील असे नाही हेही दुर्लक्षित राहिले. शार्कना कर्करोग होत नाही या गैरसमजाचा पुस्तक-लेखकासह व्यापारी व्यक्तींनी गैरफायदा घेतला. जगभर शार्कना मारून त्यांच्या शरीरभागांची विक्री केली. कर्करोग्यांना भरपूर किमतीस मुशी, शार्कचे मांस, कास्थी-पावडर विकली गेली. दावा केलेले औषध निरुपयोगी होते तरी ते खाऊन आपण बरे होणार अशा गैरसमजातून कर्करुग्णांनी रुग्णालयाकडे, डॉक्टरांकडे पाठ फिरवली. त्यांचा कर्करोग आणखी बळावला. दरमहा दोन लाख शार्कची कत्तल फक्त उत्तर अमेरिकेत झाली. त्यातून पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीएने) शार्ककास्थींच्या पावडरने कर्करोग बरा होत नाही हे सिद्ध केले आहे.
– नारायण वाडदेकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org