अंधाऱ्या रात्री अधूनमधून नैसर्गिकरीत्या चमकणारे कीटक बघण्यासाठी अनेक पर्यटक महाराष्ट्रातील राधानगरी, आंबोली, भीमाशंकरच्या अरण्यात काजवा महोत्सव बघायला जातात. या प्रकाशाला जीवदीप्ती म्हणतात. विशिष्ट जैवरासायनिक प्रक्रियेमुळे सजीवांमध्ये नैसर्गिक प्रकाश निर्माण होतो. जगभरातील सुमारे बाराशेहून अधिक कीटक, जिवाणू, काजवे, काजव्याची अळी, कवके, जेलिफिश, म्हाकूळ, भुंगेरे, स्क्वीड, एंग्लर, लैंटर्न मासे इत्यादित जीवदीप्ती आढळते. काही सजीव स्वत:च जीवदीप्ती निर्माण करतात, तर काही सजीव त्यासाठी जिवाणूंची मदत घेतात. जीवदीप्तीमुळे निर्माण होणारा प्रकाश स्वसंरक्षणासाठी किंवा सहचराला अथवा सावजाला आकर्षित करण्यासाठी उपयोगात येतो. म्हाकूळ किंवा कवचधारी प्राणी भक्षकापासून सुटका करण्यासाठी जीवदीप्तीकारक रसायनाचा फवारा टाकून पाण्यात रंगीत लाटा निर्माण करतात आणि स्वत: पळून जातात. फोटीनस पायरॅलीस या काजव्यांत नर व मादी जीवदीप्तीच्या फ्लॅशने एकमेकाला मिलनाचे संकेत देतात. खेकडेसुद्धा जोडीदार शोधायला जीवदीप्तीचा वापर करतात. काही सागरी प्राण्यांमध्ये मादी पाण्याच्या पृष्ठभागावर येते आणि प्रकाशमान होते. हा प्रकाश पाहून खोल पाण्यातील नर पृष्ठभागावर येतो. अनेक मासे जीवदीप्तीचा वापर भक्ष्य पकडण्यासाठी करतात. बडिश मीन मासा त्याच्या शरीरावर असणाऱ्या दिव्यासारख्या मांसल इंद्रियाला हलवून लहान माशांना आकर्षित करतो. कुकीकटर शार्कमासा जीवदीप्तीचा वापर करून पोटावर अंधार पाडतो. त्यामुळे हा शार्क प्रत्यक्षात जेवढा असतो त्याहून लहान आकाराचा भासतो व लहान मासे कुकीकटरच्या जाळय़ात सापडतात.
काही जिवाणू व कवके सतत प्रकाश उत्सर्जित करतात. जेलिफिश, ब्रिटलस्टार इत्यादी उत्तेजित झाल्यावर प्रकाश उत्सर्जित करतात. रेलरोड बिटल या भुंगेऱ्याच्या अळीमध्ये डोक्यावर दोन लाल ठिपके असून ती अळी शरीराच्या बाजूंकडून हिरवा प्रकाश उत्सर्जित करते. फोटोबॅक्टेरियम फॉस्फोरियम या जिवाणूंमधून उत्सर्जित झालेला प्रकाश काही मीटर दूर असलेली वस्तू झळाळून टाकतो. जीवदीप्तीमधील बऱ्याच रासायनिक क्रिया, त्याला लागणारी विकरे व त्या विकरांच्या जनुकांचा शोध आता लागला आहे. यातील बराचसा प्रकाश ल्यूसीफेरिनचे (luciferin) विकरीय ऑक्सिडीकरणामुळे घडून येतो. १९६२ साली ओसामु शिमोम्यूरा यांना जेलीफिशमध्ये हिरव्या प्रतिदीप्त प्रथिनाचा शोध लागला. हे जेलीफिश प्रथम निळा प्रकाश निर्माण करून त्यापासून आजूबाजूला असलेल्या प्रथिनातून हिरवा प्रकाश निर्माण करतात. यालाच हिरवे प्रतिदीप्त प्रथिन म्हणतात. या प्रथिनात कोणतेही रंगद्रव्य नसते. त्यातील तीन अमीनो आम्लाची श्रृंखला प्रतिदीप्त प्रकाश निर्माण करतात. डायनोफ्लाजेलेट्स समुद्रात निळय़ा रंगाची जीवदीप्ती तयार करतात. जिवाणूंमधील जीवदीप्तीमुळे त्यांना पाण्यातील विषारी पदार्थाचा सुगावा लागतो आणि त्यांचे चमचमणे बंद होते.
– जयश्री कृष्णा सैनिस
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org