रेशीम शेती उद्योग हा पारंपरिक शेतीला पूरक उद्योग म्हणून विकसित होत आहे. रेशीम शेती म्हणजे शेतामध्ये तुतीच्या (मालबेरी) झाडांची लागवड करायची आणि त्या झाडांच्या पाल्यावर स्वतंत्र शेडमध्ये रेशीम अळ्यांचे संगोपन करायचे. पक्वरेशीम अळी स्वत: भोवती कोष निर्माण करते. हे कोष संकलित करून विक्रीसाठी पाठवायचे.
रेशीम शेतीतील फायद्यांमुळे बरेच शेतकरी रेशीम उद्योगाला आपल्या प्रमुख उद्योगाचे स्थान देत आहेत. रेशीम कोषांपासून रेशीम तयार करणे, हा रेशीम उद्योगातील पुढचा टप्पा असून यात शेतकऱ्यांचा सहभाग नसतो. हा एक स्वतंत्र व्यवसाय आहे.
आपली पारंपरिक शेती सांभाळून शेतकरी रेशीम उद्योग करू शकतात. तर रेशीम शेतीतील फायद्यांमुळे शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवून पारंपरिक शेतीही अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात.
रेशीम कोषापासून नसíगक रेशीम धागा मिळतो. त्याच्या मुलायमपणामुळे त्यास ‘वस्त्रांची राणी’ असे संबोधतात. आपल्या देशात रेशीम धाग्यांची मागणी जास्त व रेशीम उत्पादन कमी आहे. त्यामुळे रेशीम उत्पादन वाढवण्यास चांगला वाव आहे.
रेशीम शेती हा कमी भांडवलावर सुरू करता येण्याजोगा कुटीर उद्योग असून त्यातील तंत्रज्ञान आत्मसात करून घेण्यास अतिशय सोपे आहे. रेशीम शेतीपासून वर्षांतील आठ ते नऊ महिने उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांची आíथक परिस्थिती सुधारते. रेशीम शेतीतील अतिरिक्त तुतीचा पाला तसेच रेशीम अळ्यांची विष्ठा यांच्यापासून चांगल्या दर्जाचे कम्पोस्ट खत तसेच गांडूळ खत तयार करता येते.
तुतीचा पाला दुभत्या जनावरांसाठी उत्तम वैरण आहे. तुतीतील प्रथिनांमुळे दूध उत्पादन तसेच दुधातील फॅट वाढण्यास मदत होते. रेशीम अळ्यांनी पाने खाल्ल्यावर प्रचंड प्रमाणात तुतीच्या काटक्या, फांद्या शिल्लक राहातात. त्यांचा जळण म्हणून उपयोग होतो.
रेशीम उद्योगात शेतकऱ्यांना घरातील महिला, मुले यांनाही सहभागी करून घेता येते. कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये रेशीम उद्योग जास्त प्रमाणात विकसित झाला आहे. तेथे महिला आपल्या अंगणामध्ये तुतीची झाडे वाढवतात आणि घरातच एखाद्या कोपऱ्यात स्टॅण्ड ठेवून त्यावर अळ्यांना वाढवतात आणि प्रत्येक महिन्याला अतिरिक्त उत्पन्न मिळवतात.
जे देखे रवी.. – लढा-७ (इंदिरा गांधी)
मी हिंदुजांशी लढत होतो. एका भूखंडासाठी मला त्यांच्या बहुमजली , पंचतारांकित रुग्णालयाशी काहीही देणे-घेणे नव्हते. माझी थोडीशी प्रॅक्टिस, माझे टिळक रुग्णालय, माझे संध्याकाळचे तासभर ब्रिज खेळणे आणि सकाळी पाय दुखेपर्यंत पळायला जाणे आणि बायको आणि मुले हेच माझे आयुष्य होते. माझे समकालीन घोडदौड करीत आतापर्यंत प्रॅक्टिसमध्ये बुडले होते. मी जेमतेमच काठावर पाय ओले करून होतो. पण या भूखंड प्रकरणात अंतुले यांनी प्रवेश केला. त्यांनी या हिंदुजांच्या मर्मी घाव घातला आणि त्यांच्या रुग्णालयाचे गोल घुमटच नेस्तनाबूत करण्याचा जो पवित्रा घेतला त्यामुळे मी अवाक झालो. हिंदुजा मंडळी हादरली. दिल्लीपर्यंत तक्रार झाली असणार. त्या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल अलियावर जंग होते. त्यांची बेगम एक सुविद्य समाजसेविका होती. त्यांनीच एकेकाळी पश्चिम द्रुतगती मार्गाचा विकास केला. त्यांची इतर समाजसेवा इथल्याच वस्तीत होती आणि तिथे त्यांचे एक टुमदार छोटेखानी कार्यालय होते. ही अलियावर जंग मंडळी हैदराबादची. त्यांच्यात आणि इराणच्या कुटुंबीयांत रोटी-बेटी व्यवहार झाले होते, असे इतिहास सांगतो. हे कुटुंब काँग्रेसचे निकटवर्ती होते. दिल्लीला माझ्या आणि अंतुल्यांविरुद्ध गेलेली तक्रार मग तिथल्या दरबारातून बेगमसाहिबांपर्यंत पोहोचली. इंदिरा गांधींच्या मुंबईच्या दौऱ्याच्या वेळी मला बेगमसाहिबांचे निमंत्रण आले. मी त्यांच्या कार्यालयात पोहोचलो तेव्हा मोठा पोलीस बंदोबस्त दिसला. आत काहीतरी इंदिराबाईंचा कार्यक्रम चालू होता. मी ओळख दिल्यावर पोलिसांनी मला आत सोडले आणि बेगमसाहिबा कार्यक्रम सोडून मला भेटायला आल्या. मला म्हणाल्या, तो भूखंड वाचला पाहिजे, असे पंतप्रधानांनाही वाटते. पण रुग्णालयाबद्दल तुझी भूमिका काय आहे? मी त्यांना स्पष्टच सांगितले, मी रुग्णालयाविरुद्ध नाही, पण हा भूखंड तुमच्या घराशेजारी असता तर तुम्ही काय केले असते? त्या हसल्या आणि म्हणाल्या, मी तुमचा प्रश्न मॅडमना विचारते. पुढे मुख्यमंत्र्यांच्या दालनात एक बैठक झाली. त्याला सगळे ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी, हिंदुजा बंधू, तीन-चार मंत्री आले होते. त्या भारदस्तांच्या मानाने किरकोळ आणि साधी शर्ट-पँट घातलेला मी एखाद्या पोरटय़ासारखाच भासलो असणार. पण पोरटय़ाची मान मात्र ताठ होती. विनवण्या झाल्या, भूखंड अबाधित राहील, पण रुग्णालयावरचे र्निबध हटवा, अशी आळवणी झाली आणि निर्णय नंतर सांगतो, असे सांगून अंतुले यांनी सभा संपवली. अंतुले यांचे मुख्यमंत्रीपद वादग्रस्त ठरले आणि पुढे त्यांना हटविण्यात आले. त्यातले एक कारण म्हणजे हिंदुजांवरची त्यांची चढाई हे एक. हल्ली पेट्रोलियममंत्री जसे अंबानी म्हणे आणि हत्ती हाले या धर्तीवर हलतात, तसेच हेही. अर्थात या प्रकरणाचे हे केवळ एक मध्यंतर होते. त्याबद्दल पुढच्या काही लेखांत.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस – हृद्रोग : भाग २
लक्षणे – १) छातीत डाव्या बाजूस ठरावीक ठिकाणी वरचेवर दुखणे. पायावर सायंकाळी सूज, विश्रांतीने सूज जाणे. २) छातीत धडधड, कपाळावर घाम, डाव्या हाताच्या कोपरापर्यंत दुखणे, चमका, मुंग्या, ३) एकदम घाम येणे, जीव घाबरणे, काही करू नयेसे वाटणे, पांडुता, चक्कर, श्वासाला त्रास, कानातून आवाज येणे, उलटी, अंग काळेनिळे होणे. ४) चढाचा रस्ता, उंच जिना, फाजील श्रम यामुळे धाप. ५) खंडित निद्रा, शिर:शूल, घुसमटल्यासारखे होणे.
कारणे – १) अतिस्निग्ध, थंड, चमचमीत पदार्थाचा नित्य आहार. भूक नसताना फाजील आहार. २) ताकदीच्या बाहेर व्यायाम, चिंता, शोक, धावपळ, वाढता मानसिक त्रास. ३) नैसर्गिक मलमूत्रांचे वेग अडविणे. ४) चुकीच्या सल्ल्याने इतर विकारांकरिता, स्वास्थ्याकरिता जुलाब वा उलटीची औषधे घेणे. ५) अतिकष्ट, छातीवर मार, दमा, खोकला अशा विकारांचा हृदयावर नकळत परिणाम. ६) कृमी विकार वारंवार होणे. ७) धूम्रपान, मशेरी, गुटखा, मद्यपान अशी व्यसने, ८) लघवीचे प्रमाण कमी होणे.
शरीर व परीक्षण – नाडीचे ठोके, त्यातील कमीअधिक अंतर, थोडे श्रम, याने होणारा फेरफार, थोडे स्वस्थ पडून राहिल्याने होणारी सुधारणा, थोडय़ाशाही श्रमाने धाप लागणे, चेहरा हिरवानिळा होणे यांचा विचार डोळ्यासमोर सतत हवा. पायावरील सूज श्रमानंतर येते का, वाढते का, हे पाहावे. थकवा हा विश्रांतीमुळे कमी होतो का, हे पाहावे. वजन, रक्तदाब, रक्तातील चरबी, साखर यांचे यथायोग्य परीक्षण आवश्यक असते. मूत्रपिंडाचे कार्य तपासावे. उपचारांची दिशा – पूर्ण विश्रांतीने बरे वाटते का? पथ्य पाळण्यामुळे रोगाला उतार पडतो का, हे पाहावे. स्थूल माणसाकरिता वजनाचा व रक्तातील चरबीचा विचार, मधुमेही माणसाकरिता मधुमेहाचा, कृश माणसाकरिता चिंता, धास्ती, झोप, झडपेचे विकार असणाऱ्यांकरिता पूर्ण विश्रांतीचा विचार, उपचारांची दिशा ठरविण्याकरिता व्हावा. रोग्याची नाडी स्थिर, नियमित, समान अंतर असलेली, स्पष्ट सत्तर ते ऐंशी ठोके यांच्या दरम्यान असलेली, जोमदार कशी राहील याचा विचार सदैव हवा.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – ९ जुलै
१९२१> प्रभावी वक्ते, लेखक, समाजसेवक रामचंद्र काशीनाथ तथा रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म. वेगवेगळ्या विषयांवर त्यांची ३५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
१९२७> अर्थशास्त्रावरील पाठय़पुस्तकांसाठी ख्यातनाम असलेले लेखक प्रा. रामकृष्ण काशीनाथ बर्वे यांचा जन्म. ‘अर्थशास्त्राची तोंडओळख, ‘भारताच्या आर्थिक समस्या, वाणिज्य अर्थशास्त्र’, तसेच ‘सुरांनी पाझरला पाषाण, होमफंड, रसमुक्त’ इ. कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.
१९६७> तत्त्वचिंतक, विचारवंत आणि ‘अप्रबुद्ध’ या नावाने लेखन करणाऱ्या विष्णू केशव पाळेकर यांचे निधन. अण्णासाहेब पटवर्धनांचे त्यांनी लिहिलेले चरित्र गाजले.
१९७८> कादंबरीकार, बालकथाकार सुमन वसंत गांगल यांचे निधन. नायिकाप्रधान कादंबऱ्यांचे लेखन. ‘मीरा, सीमा’ या कादंबऱ्या. मुलांसाठी ‘आला क्षण गेला क्षण’, ‘दीपकचा वर्ग’, ‘सहावे अस्वल’ ही पुस्तके लिहिली.
१९८३> शिक्षणतज्ज्ञ, मार्क्सवादी विचारवंत, लेखक डॉ. अ. रा. कामत यांचे निधन. नवे शिक्षक, भारतीय शिक्षणाची वाटचाल तसेच सोविएत आर्थिक नियोजन, मार्क्सवादाचे एक चिंतन ही मार्क्सवादावर भाष्य करणारी पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
– संजय वझरेकर