बॉम्बिक्स मोरी ( Bombyx mori) हा कीटक रेशीम तयार करतो. त्याची अंडी, अळी, कोश आणि पतंग अशा चार जीवनावस्था असून त्याचे मुख्य खाद्य तुतीच्या झाडाची पाने असतात. रेशीम मिळवण्यासाठी या कीटकाची पैदास केली जाते, या व्यवसायाला सेरीकल्चर असे म्हणतात. अळीची वाढ पूर्ण होत आली की तिच्या दोन प्रकारच्या लालोत्पाद्क ग्रंथीसारख्या दिसणाऱ्या, ग्रंथीतून चिकट स्त्राव निर्माण होतो. डोक्याजवळ असणाऱ्या स्पिनरेट या अवयवातून हा स्त्राव बाहेर पडतो. या स्त्रावाचा हवेशी संबंध आल्यावर त्याचे दोन जुळे धागे बनतात. हे धागे ‘फायब्रॉईन’ या प्रथिनापासून बनलेले असतात. दुसऱ्या ग्रंथीतून ‘सेरीसीन’ हा चिकट गोंदासारखा पदार्थ निर्माण होतो. या सेरीसीनमुळे हे धागे एकमेकांशी चिकटले जातात. एका कोशाभोवती ६०० ते ९०० मीटर इतक्या लांबीचा सलग धागा असतो. कोशातून पतंग बाहेर पडताना त्याच्या शरीरात प्रथिन पचन करणारी विकरे तयार होतात. या विकरांमुळे रेशीम धागा खराब होतो. रेशीम मिळवण्यासाठी आपण या जीवांना कोश अवस्थेत असताना गरम पाण्यात टाकून मारतो, जेणेकरून त्यांचा नैसर्गिकरीत्या पतंग बनण्याअगोदरच लांबलचक सलग रेशीम धागा काढणे शक्य होते. गरम पाण्यात टाकल्यामुळे त्या कोशातील धाग्यांतील सेरीसीन विरघळले जाते. सेरीसीन गेलेले नाही असे रेशीम बाजारात ‘रॉ सिल्क’ नावाने प्रसिद्ध असते. जे कोश नीट पद्धतीने उलगडले जात नाहीत आणि ज्यातील रेशीम धागा तुकडे तुकडे होऊन निघतो त्याला ‘स्पन सिल्क’ असे म्हणतात. नैसर्गिक चमक असणारे रेशीम धागे अत्यंत नाजूक आणि अंदाजे दहा मिक्रोमीटर व्यासाचे असतात. ४०० ग्रॅम रेशीम बनवण्यासाठी साधारणपणे २.००० ते ३,००० कोशांना बळी दिले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा