काही दिवसांपूर्वीच एका मासिकात, ‘सोने मोडून चांदी खरेदी करावी काय?’ अशा मथळ्याखाली चांदीच्या प्रचंड भाववाढीनिमित्ताने एक लेख प्रसिद्ध झाला होता. चांदीचे दिवसेंदिवस वाढणारे भाव आणि तरीही वाढत जाणारी मागणी यांचा आढावा घेणारा तो लेख अतिशय माहितीपूर्ण होता. त्या लेखाच्या निमित्ताने एकंदरीतच आपल्या आयुष्यात मोलाचं स्थान असलेल्या या ‘मौल्यवान’ धातूंच महत्त्व डोळ्यांसमोर तरळून गेलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुर्मीळ खनिज असलेले अनेक धातू जगात आहेत पण त्या सर्वानाच मौल्यवान म्हटलं जात नाही. मग मौल्यवान धातू नेमके कोणते, त्यांची नावं काय आणि त्यांना ‘मौल्यवान’ का म्हणतात?

मौल्यवान हे बिरुद मिरवण्यासाठी धातूंमध्ये काही खास गुणधर्म असावे लागतात. धातू दिसायला चकचकीत देखणे असावेत हा गुणधर्म तर हवाच, त्याशिवाय धातू लवचीक हवा. एखाद्या धातूची जेवढी बारीक तार काढता येईल तेवढा तो महत्त्वाचा ठरतो. धातू तापवला की ठरावीक तापमानाला वितळतो. द्रवरूपातल्या धातूला अधिक उष्णता दिली की तो ठरावीक तापमानाला उकळतो. त्या तापमानाला धातूचा उत्कलनबिंदू म्हणतात. मौल्यवान धातूंचे उत्कलनबिंदू इतर धातूंपेक्षा खूप जास्त असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मौल्यवान धातू इतर धातूंच्या तुलनेत कमी क्रियाशील असतात. दमट हवेशी जरासा संपर्क आला की लोखंड गंजून जातं, म्हणजेच त्याचं ऑक्साईड तयार होतं. ही रासायनिक अभिक्रिया जलद आणि सहजपणे होते. पण मौल्यवान धातू इतक्या सहजपणे रासायनिक अभिक्रिया करत नाहीत. आणि हे सर्व गुणधर्म असलेला चांदी हा मौल्यवान धातू तर आपल्या नेहमीच्या परिचयाचा आहे.

आवर्त सारणीतील पाचव्या आवर्तनात आणि अकराव्या गणातील, अणुक्रमांक ४७ असलेल्या चांदी या मूलद्रव्याचा शोध नक्की कधी आणि कोणाला लागला माहीत नाही. कारण अगदी इसवी सनपूर्व काळापासून चांदी वापरात असल्याचे उल्लेख आपल्या प्राचीन ग्रंथात आढळतात. हिरण्य म्हणून आज आपण सोन्याला संबोधत असलो तरी काही ग्रंथांमध्ये चांदीचा उल्लेख ‘हिरण्य’ या नावाने केलेला  दिसतो.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Silver
Show comments