जर्मनीतील जस्टीन लायबेग नावाच्या रसायनशास्त्रज्ञाने नत्र, स्फुरद व पालाश या द्रव्यांमुळे पिके जोमाने वाढतात असा शोध लावला. यात त्याने मातीचा पोत मात्र नीट लक्षात घेतला नव्हता. आज जगभर शेतात एनपीके नावाने हेच त्रिकूट अधिराज्य गाजवत आहे.
१९०५ मध्ये इंग्रज शासनाने ही रसायने मातीत घालून शेती कशी करायची, हे शेतकऱ्यांना शिकवण्यासाठी अल्बर्ट हार्वर्ड या शास्त्रज्ञाला भारतात पाठविले. अल्बर्ट हार्वर्ड बिहारला पुसा या गावी शासकीय कृषी संशोधन केंद्रात रुजू झाला.
अल्बर्ट नेहमी परिसरात बिहारी शेतकऱ्यांना शेती करताना बघायचा. त्याला प्रश्न पडे, की कुठलेही रसायन न वापरता फक्त शेणखतावर हे लोक पिके कशी घेतात? भारतीय शेतीचे त्याला मोठे आश्चर्य वाटले. आजूबाजूला फिरून त्याने तेथील शेतकऱ्यांच्या शेती करण्याच्या पद्धती शिकून घेतल्या. याचा ध्यासच लागला त्याला. हळूहळू त्याने भारतातील इतर प्रांतांतील शेतीचे अवलोकन सुरू केले. त्याला उमगले की त्यांचे शासकीय कृषी संशोधन योग्य दिशेत नाही. त्याने राजीनामा दिला व भारतीय शेतीबाबत संशोधन सुरू केले.
आपले संशोधन तपासून पाहण्यासाठी अल्बर्टला जागा हवी होती. इंदूरच्या होळकर महाराजांनी त्याला ३०० एकर जमीन लीजवर दिली. १९१८ साली त्याने इंदूरमध्ये आपल्या सेंद्रिय शेतीला भक्कम स्वरूप देण्यासाठी इन्स्टिटय़ूट ऑफ प्लांट इंडस्ट्रीजची स्थापना केली. कुठलेही रसायन न वापरता शेण, गोमूत्र व शेतातील माती मिसळून सेंद्रिय खत बनविण्याचे तंत्र त्याने शोधून काढले. त्याला इंदूर मेथड ऑफ कम्पोस्ट मेकिंग हे नाव दिले. १९३४ साली निवृत्त होऊन हार्वर्ड परतले. १९४० साली त्यांचे निधन झाले. १९४८ साली त्यांच्या पत्नीने त्यांचे अॅन अॅग्रीकल्चरल टेस्टामेंट (एका शेतीचे वारसापत्र- मराठी अनुवाद, बळीराजा, पुणे) हे पुस्तक प्रकाशित केले. ते जगभर गाजले.
अल्बर्ट हार्वर्ड शिक्षक बनून भारतात आले व विद्यार्थी बनून परत गेले. जगाला त्यांनी संदेश दिला की, सेंद्रिय शेती हीच खरी शेती. ती समजून घ्यायची असेल तर भारतीय शेतीकडे बघा.
अरुण डिके (इंदूर)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@
mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा