रोहिला पठाण समाजातील सर सय्यद अहमद खान हे एकोणिसाव्या शतकातील एक शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक होत. भारतातील मुस्लीम समाजात इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करून त्यांचा सामाजिक विकास साधण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१८१७ मध्ये दिल्लीच्या सादात कुटुंबात जन्मलेल्या सय्यदना बालपणापासूनच लिहिण्या-वाचण्याचा नाद होता. त्यांच्या वयाच्या २२व्या वर्षी वडिलांच्या मृत्यूमुळे कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागल्याने सय्यदनी प्रथम ईस्ट इंडिया कंपनीत कारकुनाची नोकरी धरली. १८४१ मध्ये मनपुरी न्यायालयात उपन्यायाधीशपदी नियुक्ती व पुढे न्यायाधीश म्हणून अनेक ठिकाणी त्यांनी काम केले. उच्चपदांवर काम करूनही त्यांची आर्थिक स्थिती बेताचीच राहिली.

भारतीय मुस्लीम समाजाच्या सामाजिक उत्कर्षांसाठी शिक्षण प्रचार आणि शिक्षण प्रसाराशिवाय दुसरा मार्ग नाही हे सय्यद यांनी हेरले होते. यासाठी प्रथम १८५८ साली त्यांनी मुरादाबादमध्ये आधुनिक मदरसे सुरू केले, त्यामध्ये विज्ञानविषयक शिक्षणही दिले जाई. युरोपियन शिक्षण पद्धतीनुसार शिक्षणसंस्था सुरू करण्यासाठी सय्यदनी स्वत: जमवलेली पुंजी खर्च करून अलिगढ येथे १८७५ साली ‘मदरसतुल इलुम’ ही मुस्लीम शाळा स्थापन केली आणि १८७६ मध्ये ‘मोहम्मेदन अँग्लो-ओरिएंट कॉलेज’ सुरू केले. सय्यद यांच्या मृत्यूनंतर १९२० साली या संस्थेचे ‘अलीगढ मुस्लीम विद्यापीठ’ या प्रतिष्ठित संस्थेत रूपांतर झाले. १८८६ साली त्यांनी ऑल इंडिया मोहम्मेदन एज्युकेशनल कॉन्फरन्सचे संगठन करून मुस्लिमांच्या शिक्षणासाठी विचारमंच स्थापन केला.

१८५७च्या स्वातंत्र्य युद्धाच्या काळात सय्यदनी अनेक ब्रिटिश लोकांना आश्रय देऊन संरक्षण दिले पण ब्रिटिश सरकारच्या अनेक धोरणांवर त्यांनी आपल्या लेखनातून कडक शब्दांत टीका केली. िहदी ही राष्ट्रभाषा असण्याला त्यांचा विरोध होता. त्यांच्या मते उर्दू हीच सर्व मुस्लिमांची भाषा असायला हवी असे होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये िहदूंचा वरचष्मा असल्याने काँग्रेसलाही त्यांचा विरोध होता. सर सय्यद अहमद यांचा मृत्यू १८९८ मध्ये झाला.

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sir syed ahmed khan aligarh muslim university
Show comments