मूळच्या आर्यलडच्या राहणाऱ्या. सामाजिक कार्यकर्त्यां, लेखिका, हाडाच्या शिक्षिका असलेल्या मार्गारेट नोबल, ‘भगिनी निवेदिता’ या नावाने आणि स्वामी विवेकानंदांच्या शिष्या म्हणून भारतात ओळखल्या जातात. भारतात राहून ज्या परकीय व्यक्तींनी भारतीय प्रदेश हीच आपली कर्मभूमी मानली आणि योगदान दिलं त्या आदरणीय व्यक्तींमध्ये मार्गारेट आग्रणी आहेत. त्यांनी महिला शिक्षणासारख्या सामाजिक क्षेत्रात तर मोठं कार्य केलंच, पण एक ब्रिटिश नागरिक असूनही भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील कार्यकर्त्यांना उघडपणे मदत करून ब्रिटिश सरकारचा रोष ओढवून घेतला.
मार्गारेट एलिझाबेथ नोबल यांचा जन्म १८६७ सालचा, उत्तर आर्यलडमधील काऊंटी टिरोन इथला. वडील साम्युएल नोबल हे स्थानिक कॉलेजात प्रोफेसर आणि आदर्शवादी होते. हे नोबल कुटुंब सुशीलता, सात्त्विकता आणि धर्मजिज्ञासा यासाठी पंचक्रोशीत विख्यात होते. मार्गारेटचं प्राथमिक शिक्षण मँचेस्टर इथं झालं. या वयातही स्वदेश प्रेम, जगातील विविध प्रश्न, त्यातून त्या त्या प्रदेशात निर्माण होणाऱ्या विचारसरणी यांची माहिती त्यांना वडिलांकडून कळत होती.
वडिलांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या आईने त्यांचे शिक्षण पूर्ण करून त्यानंतर त्या लंडन येथे आल्या आणि शाळेत शिक्षिकेची नोकरी करू लागल्या. या काळात ‘हसतखेळत बालशिक्षण’ या नव्या प्रयोगाकडे त्यांचं लक्ष वेधलं गेलं. त्याचा सखोल अभ्यास करून मार्गारेट यांनी जागतिक शिक्षण क्षेत्रातील परिस्थिती आणि प्रगती कळावी म्हणून ‘सिसेम’ मंडळाचे सदस्यत्व घेतले. १८९४ साली आर्यलडमधील क्रांतिकारकांनी ‘सिल्केन’ हा पक्ष स्थापन केला. मार्गारेट त्याच्याही सदस्य झाल्या. लंडनमध्ये मार्गारेट यांनी नवीन शिक्षण पद्धतीवर आधारित लहान शाळाही सुरू केली. याच काळात त्यांचा विवाह एका वेल्श तरुणाशी ठरला. परंतु साखरपुडय़ानंतर महिनाभराच्या काळात त्या तरुणाचे निधन झाले आणि मार्गारेट अविवाहित राहिल्या त्या आयुष्यभरासाठी! आणि त्यामुळेच त्या त्यांच्या आयुष्यात पुढे होऊ घातलेल्या मोठय़ा बदलांना सामोरे जाऊ शकल्या.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com