स्वामी विवेकानंदांची लंडनमधील व्याख्याने ऐकून हिंदू तत्त्वज्ञान आणि भारतीय संस्कृती यांनी प्रभावित झालेल्या मार्गारेट नोबल भगिनी निवेदिता बनून कलकत्त्यात आल्या. त्याच दरम्यान कलकत्त्यात प्लेगच्या साथीने हलकल्लोळ माजवला होता. स्वामीजींच्या सूचनेप्रमाणे निवेदितांनी रुग्णांना औषधोपचार आणि रोगनिवारणासाठी लोकांमध्ये जाऊन प्रयत्न केले. बंगाली जनतेत मिसळून सामाजिक कार्यासाठी निवेदितांनी ज्या पद्धतीने स्वतला त्यात झोकून दिलं, ते पाहून निवेदिता, स्त्रियांच्या उत्कर्षांसाठी काही तरी नक्कीच करू शकतील, असा विश्वास स्वामींना वाटला. स्वामींनी निवेदितांना स्त्री-शिक्षण प्रसाराचे कार्य सुरू करण्याचा सल्ला दिला.
स्वामींचा सल्ला मानून निवेदितांनी १८९८ साली कलकत्त्याच्या बगबझार या भागात महिलांसाठी बालिका विद्यालय सुरू केले. रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी शारदामातांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या शाळेत लहान मुली, प्रौढा, नवविवाहिता, विधवा या सर्वासाठी प्रवेश खुला होता. पुढे या शाळेचा चांगला विस्तार झाला. रवींद्रनाथ ठाकूर, अवनींद्रनाथ ठाकूर, ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बसू यांच्यासारख्या कलकत्त्यातील अनेक प्रतिष्ठित, विद्वान लोकांशी निवेदितांचा परिचय झाल्यावर त्यांच्याबरोबर निवेदितांची वैचारिक देवाणघेवाण होत असे. हिंदू धर्म निवेदितांनी अंतर्बाह्य़ स्वीकारला आणि हिंदू धर्म, कालीमाता या विषयांवर त्यांची अनेक व्याख्याने झाली. स्वामी विवेकानंदांचे निधन १९०२ मध्ये झाल्यावर निवेदितांनी राष्ट्रजागृती, भारतीय स्वातंत्र्य या विषयांवर पूर्ण बंगालमध्ये जहाल भाषणे दिली आणि पुस्तकेही लिहिली, स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार घरोघरी जाऊन केला.
अर्थातच यामुळे ब्रिटिश सरकारचा रोषही त्यांनी ओढवून घेतला, स्वातंत्र्यसेनानी आणि क्रांतिकारक यांना त्यांनी समर्थन देऊन त्यांच्या कार्यात निवेदितांचा गुप्त सहभाग होता. त्यांनी लिहिलेल्या दहा पुस्तकांपकी ‘काली द मदर’, ‘क्रेडल टेल्स ऑफ हिंदुइझम’ ही विशेष उल्लेखनीय आहेत. १९११ साली भगिनी निवेदिता यांचे दार्जिलिंग येथे वयाच्या ४४ व्या वर्षी निधन झाले.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com