पॉलिस्टर तंतूची रंगाई प्रक्रिया अत्यंत कठीण व महागडी असते. याशिवाय हे तंतू गडद रंगात रंगविणे शक्य नसते. याशिवाय पॉलिस्टर तंतूंपासून बनविलेल्या सुताची किंवा कापडाची रंगाई प्रक्रिया ही गट प्रक्रियेने (बॅच प्रोसेस) करावी लागत असल्यामुळे विविध गटात रंगाचा एकसारखेपणा व छटेमध्ये सातत्य राखणे कठीण असते. याशिवाय अशा रीतीने रंगवलेल्या तंतूंच्या रंगाच्या पक्केपणाबद्दलही प्रश्न उद्भवतो. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी तज्ज्ञांनी द्रावण रंगाईचा उपाय शोधून काढला. द्रावण रंगाई पद्धतीमध्ये वितळ कताईच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या बहुवारिकाच्या द्रावणातच आवश्यक ती रंगद्रव्ये मिसळली जातात. या द्रावण मिश्रणापासून तंतूंची वितळ कताई केली जाते. यामुळे या प्रक्रियेने तयार केले जाणारे तंतू स्वाभाविकच रंगीत असतात. अशा पद्धतीने रंगीत अखंड व आखूड या दोन्ही प्रकारच्या तंतूंचे उत्पादन करता येते.
या रंगाई प्रक्रियेने रंगविलेल्या तंतूंच्या रंगात एकसारखेपणा असतो आणि याचा फायदा पुढील प्रक्रियेत व कापडाच्या दर्जात होतो. रंगद्रव्य कताई द्रावणात पूर्णपणे एकजीव होत असल्यामुळे रंगाचा पक्केपणा खूपच चांगला असतो. धुलाई, घर्षण किंवा सूर्यप्रकाश यांचा रंगछटेवर फारसा परिणाम होत नाही. सामान्य प्रकारच्या रंगाई पद्धतीने रंगविलेल्या तंतूंच्या गुणधर्मात, मुख्यत: ताकदीवर मोठा परिणाम होतो. परंतु द्रावण रंगाई पद्धतीने तयार केलेल्या तंतूंच्या गुणधर्मात बदल होण्याची शक्यता नसते. द्रावणरंजित तंतूवरील पुढील प्रक्रिया अधिक सुलभ असतात आणि वाया जाणाऱ्या मालाचे प्रमाण घटते. कापडाच्या रासायनिक प्रक्रियेमध्ये एका ठिकाणचा रंग उडून दुसऱ्या ठिकाणी लागण्याचे प्रकार या तंतूंच्या बाबतीत घडत नाहीत. या प्रक्रियेमुळे गडद व आकर्षक असे रंग देता येतात. या कारणाने ग्राहकांचा प्रतिसाद चांगला असतो. या रंगाई प्रक्रियेची एकच मर्यादा म्हणजे पॉलिस्टर तंतूच्या उत्पादकतेने उत्पादन केलेल्या रंगछटातूनच रंग निवडावे लागतात.
– चं. द. काणे (इचलकरंजी)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा