इथिलीन ऑक्साइड व हायड्रोजन साइनाइड यांपासून अॅक्रिलोनायट्रिल बनते. त्यात स्टायरिन मिसळून स्टायरिन अॅक्रिलोनायट्रिल बनवता येते. हे मिश्र प्लास्टिक पिवळसर असते. हे पूर्णपणे पारदर्शक असते. त्याचा पृष्ठभाग कडक व ओरखडे न उठणारा असतो. यात रसायनांना विरोध करण्याची आणि हवेत टिकून राहण्याची शक्ती असते. स्टायरिन अॅक्रिलोनायट्रिल फक्त ०.२ ते ०.३ टक्केएवढेच पाणी शोषून घेत असल्याने त्याचे विद्युत गुणधर्मही उत्तम आहेत. क्षीण आम्ले, क्षीण आणि तीव्र अल्कली यांचा स्टायरिन अॅक्रिलोनायट्रिलवर काही परिणाम होत नाही. हे मिश्र प्लास्टिक कप, पेले, टाईपरायटरच्या चाव्या, फ्रीजचे भाग यासाठी वापरतात. उच्च ताण सहन करण्याच्या गुणामुळे हे प्लास्टिक स्वयंपाकघरातील डिशवॉशर, भांडी, मिक्सरचे भांडे यासाठी वापरले जाते.
अॅक्रिलोनायट्रिल ब्यूटाडाइन स्टायरिन हे मिश्र प्लास्टिक १९४८ मध्ये शोधले गेले. यामधील अॅक्रिलोनायट्रिलमुळे त्यात उच्च ताण सहन करण्याची शक्ती, उष्णतेला टिकून राहण्याची शक्ती, रसायनांना विरोध करण्याची ताकद प्राप्त होते. यामध्ये असलेल्या ब्यूटाडाइन रबरामुळे या मिश्र प्लास्टिकची आघात सहन करण्याची ताकद व मजबुती वाढते. स्टायरिन या घटक द्रव्यामुळे हे प्लास्टिक अधिक चकचकीत बनते आणि त्यापासून वस्तू बनवणे सोपे जाते. ब्यूटाडाइन अल्कोहोल अथवा पेट्रोलियम पदार्थापासून बनवतात.
प्लास्टिकचा आणखी एका प्रकार म्हणजे ए.बी.एस. प्लास्टिक. हे प्लास्टिक विविध प्रतीत मिळते. उच्च आघात सहन करणारी प्रत, साच्यांसाठी लागणारी प्रत, उच्च तापमान सहन करणारी प्रत, ज्वलनाला विरोध करणारी प्रत, प्लेटिंगसाठी वापरण्यात येणारी प्रत, काचतंतू घातलेली प्रत इत्यादी. ते कमी पाणी शोषून घेत असल्याने या प्लास्टिकचे विद्युत गुणधर्म चांगले असतात. या प्लास्टिकवर क्षीण आम्ले आणि अल्कलीचा परिणाम होत नाही. मोटारी, घरगुती व ऑफिसची उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्सची उपकरणे, दूरध्वनी, फíनचर, बांधकाम, प्रवासी साहित्य यात या प्लास्टिकचा उपयोग होतो.
अ. पां. देशपांडे, (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
मनमोराचा पिसारा – दुक्ख हे आर्यसत्य
जन्म, महापरिनिर्वाण आणि ज्ञानप्राप्ती बुद्धांच्या या तिन्ही अलौकिक अनुभवांची स्मृती जागविणारी ‘बौद्धपौर्णिमा’ बुद्धांच्या करुणामय जीवनातील त्रीरत्न आणि तिलक्सनांची वारंवार आठवण येते आणि दाटून येतं. त्यामधून सावरत सावरत प्रस्तुत लेख लिहीत आहे. बुद्धांच्या चरित्राची गोष्ट सुपरिचित आहे त्यामुळे त्याचा उल्लेख टाळून चार आर्य सत्यांपैकी पहिल्या सत्याबद्दल जे आकलन झालंय त्याविषयी दोन शब्द.
बुद्धांनी चार आर्य सत्यांमध्ये पहिला क्रमांक दिला तो दुक्खाला.
दुक्ख हा पाली शब्द आणि दु:ख हा संस्कृतातला. दु:ख हा शब्दही दु: म्हणजे वाईट वेदनाकारक आणि ‘ख’ म्हणजे अवकाश.
ज्याच्या मनाचा अवकाश अशा वेदनेनं भरलेला आहे तो दु:खी.
मनाचा अवकाश ही संकल्पना मुळातच अभिनव आहे.
बुद्धांना मनाचा वेध घ्यायचा नव्हता. त्यांच्या दृष्टीने मन हा केवळ (सहापैकी) एक स्कंध होता. मनाचा अवकाश म्हणजे व्यापून टाकणारी ‘स्पेस’. त्यांनी डोळसपणे जगाकडे पाहिलं तेव्हा त्यांना जराजर्जर व्याधिग्रस्त आणि मृत माणूस दिसला आणि त्यातलं दुक्ख त्यांना जाणवलं.
त्यांनी दुक्खाची कारणं शोधली आणि त्यातून मुक्त होण्याचा अष्टांग मार्गही दाखविला. अनेकदा, बुद्ध विचारांवर ‘शून्य’तेचा, शून्य वादाचा आरोप केला जातो; परंतु त्यांच्या लक्षात येत नाही की बुद्ध शून्यवादी नव्हते तर ‘यथाभूतम्’ जसं आहे तसं म्हणजे वास्तवाचं सम्यक दर्शन घडविणारे होते. त्यांना वास्तव- व्यवहाराचा विचार करायचा होता.
माणसाच्या जीवनाला त्रस्त करणाऱ्या गोष्टींचा शोध घ्यायचा होता. दु:खापासून मुक्तीसाठी तृष्णेपासून सुटका हा मार्ग त्यांनी दाखविला. सुखी होण्याची धडपड करणारा माणूस ‘सुख’ शोधतो आणि त्याक्षणी त्या सुखी क्षणामधली क्षणभंगुरता त्याच्या लक्षात येते नि तो पुन्हा दु:खी होतो; परंतु सुख आणि दु:ख दोन्ही अनुभव अनिच्च (अनित्य) असतात याची ही जाणीव त्यांनी करून दिली.
दु:खाचा उगम शरीरातील संवेदना निर्माण करणाऱ्या इंद्रियांमध्ये नाही की बाह्य जगतातील वस्तुमात्रात नाही! तर षडांग जेव्हा त्या बाह्य जगातील वस्तूंच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्याशी जी संलग्नता अथवा अटॅचमेंट निर्माण होते, त्यामधून तृष्णा आणि दुक्ख निर्माण होते.
परंतु, षडांग आणि बाह्य वस्तू यांचा संपर्क मुळातच अनित्य असतो. अशा अनित्यतेच्या अज्ञानात दुखाची मुळं असतात.
बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतरचे उर्वरित आयुष्य सर्वसामान्य माणसांना दु:खाची मुळं शोधण्याचा उपदेश केला. त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि ज्ञान केवळ अलौकिक असंच म्हटलं पाहिजे. त्यांनी ज्ञान मिळविण्यासाठी येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आडकाठी केली नाही. त्यांच्या लेखी सर्व मानव समदु:खी होते. दु:खानं आपण जोडलेले असतो बाकी जात-पात, वर्ण-वर्ग हे भेदाभेद केवळ क्षुद्र संस्कारामुळे निर्माण होतात असं म्हटलं.
त्या महामानवाला आज त्रिवार प्रणाम.
साधु, साधु, साधु!
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com
प्रबोधन पर्व – ज्ञानाच्या सात्त्विक आनंदासाठी क्षुद्र सुखे विसरा..
‘‘सत्य हें कठोर असेल, अप्रिय असेल; पण सत्याला असत्य म्हणण्याचा प्रयत्न करण्यांत फायदा काय? किंवा त्या सत्याकडे न पाहण्यामध्यें तरी पुरुषार्थ काय?.. सत्य तें सत्य, आपण त्याच्याकडे पाहण्याचें नाकारलें म्हणून तें असत्य होणार आहे थोडेंच! सगळ्या मनुष्यजातीनें जरी त्या अप्रिय व कठोर सत्याकडे पाहाण्याचें टाळलें, तरी तें स्वयंसिद्ध आहे, अर्थात् तें अबाधितच राहणार. दारू पिऊन मनुष्य गटारांत पडला, तर त्याला गटाराची घाण कदाचित् दारूच्या धुंदींत घटकाभर येणार नाहीं; पण घाणीपासून उत्पन्न होणारे दुष्परिणाम होणारच होणार. अज्ञान हें कठोर सत्याला असत्य ठरवूं शकत नाहीं. हें जर खरें आहे तर ज्ञानदृष्टीनें त्या कठोर सत्याकडे धैर्यानें पाहून त्यांतील कठोरपणा ओळखून; तो कठोरपणा कसा काढून टाकतां येईल किंवा कमी करतां येईल याचा विचार करणें, हाच शहाणपणाचा मार्ग होय.’’
सत्याला धैर्याने समोरे गेले पाहिजे हे सांगून वा. म. जोशी ज्ञानाच्या अमृतगोडीविषयी लिहितात-
‘‘.. ज्ञान हें आनंददायक आहे, हें ध्यानांत धरलें पाहिजे. पैसे वगैरे ज्ञानापासून मिळणार नाहींत कदाचित्; क्षुद्र सुखें हातीं लागणार नाहींत; व्यावहारिक फायदा होणार नाहीं; जबाबदाऱ्या वाढतील, काळज्या वाढतील, पाप-पुण्याबद्दल अधिक जागरूक राहावें लागले, दुसऱ्याची निंदा करणाचें सुख पूर्वीसारखे प्रिय वाटणार नाहीं, धाडसाचीं विधानें करण्यांत पुरुषार्थ वाटेनासा होईल, दुसऱ्याचें म्हणणें खोडून काढण्यांपेक्षा त्याच्या म्हणण्यांत सत्यांश जो कांहीं थोडाबहुत असेल तो शोधून काढण्याची प्रवृत्ति वाढेल, आणि अशा रीतीनें किंचिज्ज्ञ असताना जीं क्षुद्र दर्जाचीं पाशवी सुखें आपणांस मिळत होतीं त्यांना आपण ज्ञानवृद्धीबरोबर हलके हलके मुकत जाऊं, हे खरें; पण ज्ञानापासून होणारा उच्च सात्त्विक आनंद जो आहे त्याची योग्यता फार मोठी आहे. प्रथम प्रथम कितीहि सामाधन वाटलें, व क्षुद्र मनोविकारांना कितीहि तीव्र अंजन मिळालें, तरी ज्ञानाच्या सात्त्विक आनंदाकरितां हें मूल्य दिलेंच पाहिजे आणि कोणीहि विचारी मनुष्य हें मूल्य देण्यास तयार होईल.’’