सोयाबीन हे डाळवर्गीय पीक मूळचे चीन देशातले. चिनी लोक आपल्या रोजच्या आहारात सोयाबीनचा समावेश करतात. महाराष्ट्रात सोयाबीनचे पीक लाखो शेतकरी घेतात. हे पीक दलालांमार्फत तेलगिरण्यांना जाते. तेथे त्यापासून खाद्यतेल व पेंड मिळते. पेंडीचा उपयोग कोंबडय़ांचे खाद्य म्हणून होतो.
शहरातले अनेक जण सोयाबडी (सोया नगेट) या उत्पादनालाच सोयाबीन समजतात. सोयाबीनपासून दुधाला पर्याय असे दूध बनवता येते. हे दूध गार किंवा गरम पिता येते. कॉफी, चॉकलेटसाठीही ते अप्रतिम आहे. त्यापासून ताक, दही, लस्सी, योगर्ट, मिल्कशेक, आइस्क्रिम बनवता येते.
सोया दुधापासून बनवलेल्या पनीरला ‘टोफू’ म्हणतात. चायनीज खाद्यात टोफूचा वापर सर्रास केलेला असतो. पनीर घालून केलेले सर्व पदार्थ टोफू वापरून करता येतात. मांसाहारी पदार्थामध्ये टोफू वापरून त्यांना शाकाहारी पर्याय देता येतो. दिल्लीमधली ‘वाह जी वाह’ ही अन्न साखळी टोफूचे विविध पदार्थ पुरवते.
सोयाबीनपासून दूध व दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादने (उदा. ब्रेड, बिस्किटे) व डाळीचे पदार्थ  (उदा. नमकीन) बनवता येते. एवढेच नव्हे, तर आपल्या आहारातले बहुतेक पदार्थ सोया वापरून बनवता येतात. हल्ली अनेक महिला गव्हाचे दळण देताना त्यात तीस टक्के सोयाबीन मिसळतात. सोयाबीनपासून कॉफी, फुटाणे, चकली, शेव, चटणी असे अनेक पदार्थ बनवता येतात.
बचतगटांनी लोणची, पापड या पदार्थाच्या व्यवसायातून बाहेर पडून काही वेगळ्या उत्पादनांचा व्यवसाय करावा, असे वेळोवेळी सुचवले जाते. याबाबतीत त्यांनी सोयाबीनच्या उत्पादनांचा विचार जरूर करावा. आहारतज्ज्ञ मधुमेही, कॅन्सरचे रुग्ण किंबहुना सर्वच कुपोषितांना आहारात सोयाबीनचा समावेश करायला सांगतात. मात्र आहारात समावेश करण्यापूर्वी सोयाबीनवर काही विशेष प्रक्रिया कराव्या लागतात. त्या आपणास माहीत नसतात. त्या माहीत करून घेतल्या पाहिजेत. मग सोयाबीनवर प्रक्रिया करण्याच्या उद्योगात फार मोठी संधी आहे.

जे देखे रवी.. –  लढा- २
हा भूखंड चर्चेत आला कारण त्याकाळचे आयुक्त भालचंद्र देशमुख यांनी जनतेची गाऱ्हाणी त्यांच्यापर्यंत पोहोचावीत म्हणून एक Mail Bag  नावाची व्यवस्था सुरू केली होती. त्यात मी माझ्या घराच्या आसपासच्या स्थितीबद्दल तक्रारी केल्या आणि त्यांनी एक समिती नेमली आणि माझी नागरिक सभासद म्हणून नेमणूक केली. पहिल्या पहिल्यांदा समिती ठीक चालली, मग नोकरशहा आणि स्थानिक राजकारण्यांनी त्यांच्या पद्धतीने त्या समितीची विल्हेवाट लावली. त्या काळात एक गोष्ट लक्षात आली की समुद्रावर पावसाचे पाणी (जास्त पाऊस पडला तर) तुंबू नये म्हणून इंग्रजांनी मोठय़ा आकाराच्या वाहिन्या बांधल्या होत्या. त्यात आता गटाराचे पाणी वाहत होते आणि पुढे पुढे ते वाढतच गेले.
याचा तपास करताना मला असे आढळले की इथे इमारती जशाजशा वाढत गेल्या तस तशा त्यांना झटपट परवाने मिळावे आणि सांडपाण्याच्या विल्हेवाटीसाठीच्या वाहिन्या जोडण्यासाठीचा विलंब टळावा म्हणून गुपचूप समाजाच्या सगळ्यांना (नागरिक धरून) एक ना एक तऱ्हेने सावध बेसावधपणे हाताशी धरून हे सांडपाणी या पर्जन्यवाहिन्यांना जोडून देण्यात आले आणि या वाहिन्या समुद्रावर मलमूत्र आणि घाण ओकू लागल्या. या वाहिन्यांमध्ये मी एक भिकारी कुटुंब वस्तीला असल्याचे भयानक दृश्य बघितले आहे. मुळातली पर्जन्य वहिनी या गाळाने तुंबली. सर्वत्र घाण झाली आणि पावसाळ्यात पाणी जास्तच साचू लागले आणि त्याच नागरिकांनी मग तक्रारी केल्या.
अनेक वर्षांनी टिळक रुग्णालयात साफसफाईचा कार्यक्रम राबवत होतो तेव्हा (त्याबद्दल पुढे) एक अभियंता भेटला. तो मला सांगत होता ‘डॉक्टर त्या काळात तुमच्या भागामधल्या एका इमारतीचा प्रवर्तक एकदा मला भेटायला आला आणि माझ्या टेबलावर त्याने दोन बॅगा ठेवल्या. एकात पैसे आहेत आणि दुसऱ्यात बंदूक आहे असे सांगत होता’ ती संपूर्ण गोष्ट मी पुढे नेत नाही. असाच जी-उत्तर विभागात त्याच्या निवृत्तीच्या आदल्या दिवशी एक अभियंता भेटला. तो म्हणाला, ‘या सांडपाण्याबद्दलच्या तुमच्या प्रयत्नांना यश येईल अशी प्रार्थना करतो. आमच्या चुका तुम्हाला निस्ताराव्या लागाव्यात याचे वाईट वाटते.’ या चुका की गुन्हे? त्या काळात माहिती अधिकाराच्या कायद्याला धरून मी ही भानगड उकलण्यासाठी जंग जंग छेडले. त्या पत्रांची बचावात्मक उत्तरे हास्यास्पद,  करुण आणि दारुणही होती.  पुढे हळूहळू माझ्या रेटय़ामुळे या जोडण्या बदलल्या असे ऐकतो. मीही कंटाळलो. संसारी व्यावसायिक करणार तरी काय काय? कुंपणानेच शेत खायचे ठरवल्यावर आणखी काय होणार? सांगत होतो गोष्ट कै. भालचंद्र देशमुख या कर्तबगार प्रशासकीय अधिकाऱ्याची.  ती पुढच्या लेखात.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – हाडांचे विकार : भाग – २
लक्षणे – १) टाचेचे हाड वाढणे, शरीराचे एकूण वजन वाढणे. २) हाडे पोकळ होणे, हाडांतील व शरीरातील एकूण मज्जा कमी होणे. ३) हाडांच्या सांध्यामध्ये पोकळी होणे, सूज येणे. ४) हाडे वाढणे, वाकडी होणे. ५) अधिक दात येणे, नखे जोरात वाढणे, केस अकाली गळणे, पिकणे. ६) हातापायाला मुंग्या येणे, ठराविक बोटांना मुंग्या येणे. ७) हातापायांची हालचाल करणे अशक्य अशा कळा मारणे. ८) चालायला त्रास होणे. ९) हाड मोडण्याने सांध्यावर सूज येणे. १०) बालकांचा मास व अस्थिक्षय होणे. हातापायांच्या काडय़ा व पोटाचा नगारा दिसणे. कारणे- १) वातवृद्धी होईल, मज्जाक्षय होईल, हाडे पोकळ, ठिसूळ होतील अशी कायिक, वाचिक व मानसिक कारणपरंपरा घडणे. २) अत्यंत परिश्रम, अत्यंत संक्षोभ, कोणत्याही कारणाने हाडे एकमेकांवर घासली जाणे. ३) वातुळ, रूक्ष, खूप थंड, तुरट, तिखट, कडू रसांच्या पदार्थाचा अतिरेक. ४) कदान्न, शिळे अन्न, हलक्या दर्जाचे अन्न दीर्घकाळ खाणे. ५) अतिमर्दन, धाप लागणे, शरीर अधिक दाबले जाणे. ६) विरुद्ध गुणांचा आहार असणे, अभिष्यंदी म्हणजे स्राव वाढेल असे दही, मासे, मीठ, लोणची, पापड असे पदार्थ खाणे, आहारात स्निग्ध पदार्थाचा अभाव असणे, उन्हातान्हात हिंडणे. ७) जागरण, उशिरा जेवण, उशिरा झोप, चिंता. ८) शरीर स्थूल होणे, आनुवंशिकता, म्हातारपण. ९) हात, खांदे, मानेचे मणके यांना ताकदीच्या बाहेर काम, वजन उचलणे न झेपणे. १०) बालकांना कृमी, सर्दी, पडसे, कफविकार होणे. पथ्यापथ्य- १) पहिलटकरीण गाईचे दूध, तूप, मांसाहार, मूग, उडीद, चवळी, वाटाणा, हरभरा, लसूण, आले, फळे, सुकामेवा, डिंक हे पदार्थ हाडे मोडली असता, मज्जा क्षीण झाली असताना उत्पन्न झालेल्या विकारांत, आहारांत अवश्य असावेत. २) लोणचे, पापड, मीठ, दही, स्राव निर्माण करणारे पदार्थ, रूक्ष, तिखट, खूप थंड पदार्थ वज्र्य करावेत. ३) झिजलेल्या, मोडलेल्या हाडांच्या विकारांत भरपूर विश्रांती घ्यावी. अकारण दगदग, अतिश्रम टाळावे.  ४) व्यायाम, मैथुन, उन्हात काम टाळावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  – ३ जुलै
१९१४ >  नाटककार, कलामीमांसक आणि समीक्षक दत्ताराम गणेश गोडसे यांचा जन्म. ‘पोत’ हे त्यांचे पहिले पुस्तक. ‘शक्तिसौष्ठव’, ‘मातावळ’, ‘उर्जायन’ ही त्यांची कला व साहित्य यांची ऐतिहासिक दृष्टिकोनातून मीमांसा करणारी पुस्तके तसेच ‘मस्तानी’ व ‘दफ्तनी’ हे इतिहास संशोधनपर लेखांचे संग्रह आणि राजयाचा पुत्र अपराधी देखा, काळगंगेच्या काठी, संभाजीचे भूत ही नाटके त्यांनी लिहिली.
१९९४ > नाटककार वसंत वैकुंठ कामत यांचे निधन. हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बवर ‘सूर्यकोटिसमप्रभा’ हे नाटक लिहिले. ‘मा निषाद’ हे त्यांचे नाटक मानसिक ताणतणावांवर आधारलेले होते. त्यांचे मराठीतील पहिलेच रहस्यमय नाटक ‘फोन नं. ३३३३३’. हे रमेश देव व सीमा देव यांच्या अभिनयामुळे गाजले.
२००३> कथालेखिका, कादंबरीकार आणि बालसाहित्यकार स्नेहलता दत्तात्रय दसनूरकर यांचे निधन. ‘स्वर्ग तुच्छ भासतो’, ‘प्रिया’, ‘धडा’ मिळून त्यांचे ६४ कथासंग्रह प्रकाशित. ‘कलंकिता मी कशी’, ‘अज्ञात शत्रू’ या कादंबऱ्या, ‘मन सुखाची ठेव’, ‘कुत्र्याचे शेपूट’ हे त्यांचे ललित गद्यसंग्रह आणि ‘ज्ञानदेवे घातला पाया’, ‘कट्टी’ ही बालसाहित्याची पुस्तके त्यांच्या नावावर जमा आहेत.
– संजय वझरेकर

Story img Loader