रसायनशास्त्र, जीवारसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान अशा विविध शास्त्रशाखांत स्पेक्ट्रोफोटोमीटर या मापनयंत्राने संशोधनाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. प्रकाशकिरणे आणि रासायनिक पदार्थ यांच्यातील भौतिक प्रक्रिया आपल्याला त्या पदार्थाच्या बऱ्याच गुणधर्माबद्दल सांगून जातात. समजा, आपण जर एकाच पदार्थाची दोन द्रावणे डोळ्यांनी बघितली. त्यातील एक द्रावण गडद रंगाचे आणि दुसरे द्रावण फिक्या रंगाचे असेल; तर आपली सारासार विचारबुद्धीच सांगते की, गडद रंगात त्या पदार्थाची तीव्रता जास्त असेल. यातच स्पेक्ट्रोफोटोमीटरचे तत्त्व दडलेले आहे. एखाद्या रासायनिक द्रवपदार्थात त्या रसायनाची किंवा सूक्ष्मजीव असलेल्या द्रवपदार्थात त्या सूक्ष्मजीवाची मात्रा किती आहे, हे आपण या तंत्राद्वारे निश्चित करू शकतो.
प्रकाश हा विद्युतचुंबकीय उत्सर्जनाचा प्रकार आहे. प्रकाश एखाद्या पदार्थावर पडला असता दोन गोष्टी घडतात. एक म्हणजे त्या पदार्थापासून काही प्रकाशलहरी परावíतत होतात आणि दुसरे म्हणजे त्या पदार्थात काही प्रकाशलहरी शोषल्या जातात.
स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये पदार्थात शोषल्या जाणाऱ्या प्रकाशलहरींचे विश्लेषण केले जाते. पदार्थात जर सगळ्याच प्रकाशलहरी शोषून घेतल्या गेल्या, तर तो पदार्थ काळ्या रंगाचा दिसतो आणि त्यात कुठल्याच प्रकाशलहरी शोषल्या गेल्या नाही, तर तो पांढरा किंवा रंगहीन दिसतो. परंतु निसर्गात वस्तूंचे विविध रंग आपल्याला दिसतात; कारण प्रत्येक पदार्थ विशिष्ट तरंगलांबीचीच ऊर्जा शोषून घेतो. आणि बाकीच्या प्रकाशलहरी परावíतत होतात. त्या वस्तूपासून परावíतत झालेल्या प्रकाशलहरी आपल्या डोळ्यापर्यंत येऊन पोहोचतात. त्या प्रकाशलहरींच्या तरंगलांबीनुसार आपल्याला रंग दिसतात. उदा. झाडाच्या पानांतील क्लोरोफिल हा पदार्थ लाल आणि जांभळा रंग शोषून घेतो आणि पिवळा, निळा व हिरवा रंग बाहेर टाकतो. क्लोरोफिलवरून परावíतत झालेली तरंगलांबी हिरव्या रंगाची असल्यामुळे आपल्याला झाडाची पाने हिरवी दिसतात.
दृश्य प्रकाशलहरी हा विद्युत चुंबकीय लहरींच्या वर्णपटाचा खूप छोटा भाग आहे. प्रकाशाचा स्रोत म्हणून जर आपण अतिनील किरण (अल्ट्राव्हायोलेट) किंवा अवरक्त (इन्फ्रारेड) किरणांचा वापर केला, तर त्यानुसार या प्रकाशलहरी शोषून घेणाऱ्या पदार्थाचे आपण विश्लेषण करू शकतो. अशा यंत्राला अनुक्रमे अल्ट्रा व्हायोलेट स्पेक्ट्रोफोटोमीटर आणि इन्फ्रा-रेड स्पेक्ट्रोफोटोमीटर असे म्हणतात.
–डॉ. रंजन गर्गे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
विष्णू डे- भाषण
१९७१ चा ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यानंतर विष्णू डे यांनी केलेल्या भाषणात ते म्हणतात- मी लेखक कसा झालो?- हा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. ही एक मोठी कथा आहे. कारण आयुष्याची खूप र्वष खर्ची पडलेली आहेत, तरीपण मला माझी पहिली कविता अजून आठवतेय. तरुणांच्या एका प्रसिद्ध नियतकालिकात एका चित्रमालेवर आधारित कविता मागविण्यात आल्या होत्या. सर्वोत्तम कवितेला पुरस्कार दिला जाणार होता. एक लाखाचा नाही तर १०/२० रुपयांचा. मी त्या स्पर्धेत भाग घेतला. एका निश्चित विषयावर कविता लिहायची होती हे एक कारण होतंच. पण त्याबरोबरच पारितोषिकही मिळणार होतं, हेही एक कारण होतंच.
मी उत्तरासाठी तिकीट लावलेला लिफाफा सोबत जोडून एक कविता त्या स्पर्धेसाठी पाठवली. त्याचं काहीच उत्तर आलं नाही. पण त्या क्षणापासून माझी संशोधनाची जाणीव जागृत झाली. मला आठवतंय की माझी धारावाही पद्यरचनेची मन:स्थिती एक प्रकारच्या शोधक अभिव्यक्तीच्या रूपात परावर्तित होत गेली. मला आठवतंय की एके रात्री जवळजवळ १० ओळी अकस्मात आल्या, ज्या ८/९ वर्षांनंतर ‘जन्मष्टमी’ शीर्षकाच्या दीर्घ कवितेत प्रवाहित होऊन विस्तार पावल्या.
रवींद्रनाथ ठाकूर यांच्या विचाराने प्रभावित होऊन, एक विद्यार्थी प्रचलित शिक्षण पद्धतीतील पोकळपणा जाणवून शाळा सोडायला तयार झाला होता आणि आपल्या वडिलांशी त्याबाबत तासन्तास वाद घालीत होता. त्यालाच आपल्या जीवनात परंपरागत कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करावं लागलं.
लेखक म्हणून अगदी किशोरावस्थेतदेखील त्या मुलाची वाचाळ, फटकळ बनण्याची इच्छा नव्हती. पण आपलं रूढीगत परंपरांशी जमणार नाही, त्यामुळे त्या माध्यमातून सहज मिळणारे पुरस्कारही आपल्याला मिळणार नाहीत, यावर त्या मुलाचा पूर्ण विश्वास होता. पण बघा, आज मी तुमच्यासमोर उभा आहे. हे सगळंच हास्यास्पद नाहीये का? जर तुम्ही मला हसलात तरी त्याचं दु:ख होणार नाही. पण विश्वास ठेवा की, मी यथाशक्ती माझ्याशी आणि माझ्या वाचकांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तक माझ्या उन्नतीमध्ये खूप साहाय्यक ठरलं आहे. जवळजवळ साठ वर्षांपर्यंत साहित्याला सर्व तऱ्हेने सावधान राहावं लागलेलं आहे.
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com