आकाशातले अनेक तारे हे नुसत्या डोळ्यांना जरी एकटे दिसत असले, तरी दुर्बणिीतून न्याहाळल्यावर त्यांपकी निम्म्यापेक्षा जास्त तारे हे प्रत्यक्षात ताऱ्यांची जोडी असल्याचे दिसून येते. अशा ताऱ्यांना ‘जोडतारे’ असे म्हणतात. दुर्बणिीद्वारे शोधला गेलेला पहिला जोडतारा म्हणजे मिझार – सप्तर्षीतील वशिष्ठ हा तारा. मिझार हा जोडतारा असल्याचा शोध, इटालिअन खगोलज्ञ जिओवानी रिस्सिओली याने आपल्या दुर्बणिीद्वारे १६५० साली लावल्याची नोंद होती. परंतु मिझार या ताऱ्याचे निरीक्षण प्रथम इटालियन खगोलज्ञ बेनेडिट्टो कॅस्टेली याने व त्यानंतर आपण स्वत: १६१७ साली केल्याचे उल्लेख गॅलिलिओच्या नोंदीमध्ये आढळले आहेत. रिस्सिओलीने मिझारची जोडतारा म्हणून नोंद केल्यानंतर, इ.स. १७१९ सालापर्यंत आणखी सहा जोडताऱ्यांची नोंद केली गेली.

यानंतर दुर्बणिींच्या वाढत्या क्षमतेबरोबर जोडताऱ्यांच्या शोधातही वाढ झाली. १७८१ साली क्रिस्टियान मायेर या झेक-जर्मन खगोलज्ञाने ऐंशी जोडताऱ्यांची सूची प्रसिद्ध केली. क्रिस्टियान मायेरने जोडताऱ्यांच्या बाबतीत ‘यातला छोटा सूर्य मोठय़ा सूर्याभोवती फिरत असण्याची’ शक्यता व्यक्त केली होती. कारण काही तारे हे आकाशात दिसणारी त्यांची स्थाने जवळ असल्याने जोडतारे भासत असले, तरी काही जोडताऱ्यांतील घटक तारे मात्र एकमेकांशी गुरुत्वाकर्षणाने बांधले गेले असल्याची शंका मायेरला आली होती. क्रिस्टियान मायेर याने जोडताऱ्यांची आपली यादी प्रसिद्ध केल्यानंतर इंग्लिश खगोल निरीक्षक विल्यम हर्शल याने पुढच्याच वर्षी २६९ जोडताऱ्यांची आपली यादी प्रकाशित केली. त्यानंतर दोन वर्षांनी हर्शलने त्यात आणखी ४३४ ताऱ्यांची भर घातली. जोडतारे हे एकमेकांशी गुरुत्वाकर्षणाने जखडले असण्याच्या शक्यतेवर विल्यम हर्शल सुरुवातीला सहमत नव्हता. परंतु १८०३ साली मात्र विल्यम हर्शलने ताऱ्यांच्या आपल्यापासूनच्या अंतरांचा काळजीपूर्वक अभ्यास करून, हे तारे एकमेकांशी जखडले असल्याची शक्यता स्वीकारली.

काही वेळा जोडताऱ्यांतील घटक तारे इतके जवळ असतात की मोठय़ा दुर्बणिींद्वारेही ते वेगळे दिसू शकत नाहीत. अशा वेळी वर्णपटशास्त्र उपयोगास येते. वर्णपटातील रेषांच्या स्थितीवरून या घटक ताऱ्यांचे अस्तित्व लक्षात येते. १८८९ साली अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडवर्ड पिकिरग याने वर्णपटाच्या साह्याने अशा पहिल्या जोडताऱ्याचा शोध लावला. योगायोग म्हणजे, मिझार या जोडताऱ्यातील एक घटक-तारा हाच पिकिरगला वर्णपटाद्वारे सापडलेला जोडतारा होता.

– प्रदीप नायक

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

Story img Loader