कबरेदके कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांपासून तयार होतात. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे वनस्पती कबरेदके तयार करतात.
आपल्या दैनंदिन जीवनात कबरेदकांचं स्थान अबाधित आहे. आपल्या अन्नात बहुतांश भाग पिष्टमय पदार्थ आणि साखरेचा असतो. पिष्टमय पदार्थ आणि साखर हे कबरेदकाचेच प्रकार आहेत. आपल्या वापरातले सुती कपडे कापसापासून म्हणजे सेल्यूलोज प्रकारच्या कबरेदकापासून बनवलेले असतात. घरासाठी वापरण्यात येणारे लाकूडही सेल्यूलोजपासून बनलेलं असतं. म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी आपण कबरेदकांवरच अवलंबून आहोत.
शास्त्रीयदृष्टय़ा कबरेदकांचे मुख्यत: तीन प्रकार आहेत. मोनोसॅकॅराइड्स् (एकशर्करा), डायसॅकॅराइड्स् (द्विशर्करा) आणि पॉलीसॅकॅराइड्स् (बहुशर्करा). या सर्वात मोनोसॅकॅराइड्स् ही साधी कबरेदके आहेत. या प्रकारच्या कबरेदकांत एका रेणूत कार्बनचे तीन ते सात अणू असतात. अर्थात कार्बन रेणूंच्या संख्येवरूनही ट्रायोज, पेंटोज, हेक्सोज इ. मोनोसॅकॅराइड्स् कबरेदकांचे गट पाडले जातात. ग्लुकोज, फ्रुक्टोज ही मोनोसॅकॅराइड्स् कबरेदकांची उदाहरणे आहेत. आपण जेव्हा ‘रक्तातील शुगर’ असं म्हणतो, तेव्हा त्याचा रोख रक्तातील ‘ग्लुकोज’ असा असतो. आपल्या पेशींतील ग्लुकोज हेच आपल्या ऊर्जेचा स्रोत आहे. फ्रुक्टोज हे मोनोसॅकॅराइड्स् फळांत आणि काही भाज्यांत आढळतं.
आपण नेहमीची जी साखर वापरतो, तिला सुक्रोज म्हणतात. सुक्रोज ‘डायसॅकॅराइड्स’ या गटात येते. दोन मोनोसॅकॅराइड्स् एकत्र बांधले गेले, की डायसॅकॅराइड्स कबरेदक तयार होतं. एक ग्लुकोजचा अणू एका फ्रुक्टोज अणूशी बांधला गेला की सुक्रोज तयार होतं. तसंच ग्लुकोजचा एक अणू एका गॅलॅक्टोज अणूशी बांधला गेला, की लॅक्टोज तयार होतं. दुधामध्ये लॅक्टोज असतं, यामुळेच दूध गोड लागतं.
अनेक मोनोसॅकॅराइड्सची साखळी असेल, तर त्याला पॉलीसॅकॅराइड्स् म्हटलं जातं. यकृतात आणि स्नायूंमध्ये साठवलं जाणारं ग्लायकोजन, धान्यांत मुबलक असणारं स्टार्च (पिष्टमय), वनस्पतींत आढळणारा तंतुमय भाग म्हणजे सेल्यूलोज आणि कायटिन ही पॉलीसॅकॅराइड्स् कबरेदकांची उदाहरणं आहेत.
कबरेदकांचे शास्त्रीय वर्गीकरण मोनोसॅकॅराइड्स्, डायसॅकॅराइड्स् आणि पॉलीसॅकॅराइड्स् असं करतात; पण सामान्यपणे खालील तीन गटांत केलं जातं. पहिला गट म्हणजे पाण्यात संपूर्ण विरघळणारी ‘शर्करा’. दुसरा गट म्हणजे पाण्यात न विरघळणारे, पण काही भाग विरघळल्यासारखे भासणारे ‘स्टार्च’ आणि तिसरा गट म्हणजे पाण्यात न विरघळणारे ‘सेल्यूलोज’.
चारुशीला जुईकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
मनमोराचा पिसारा : गीता : संवादकौशल्य
अनुद्वेगकरम्, वाक्यम्, सत्यम् प्रियहितम्,च यत्
स्वाध्यायाभ्यसनम्,च एववाङ्मयम्, तप: उच्यते।।
वीर अर्जुनाला श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर ‘गीता’रूपी मार्गदर्शनपर उपदेश केला. दोन्ही बाजूंनी सैन्य खडे होते. शस्त्रास्त्र परजलेली होती, रणदुंदुभी निनादत होत्या. शंखशिंगादी रणवाद्यं दुमदुमत होती. अशा वेळी दिङ्मूढ पार्थाला कृष्णाने ऐन रणभूमीवर गीतोपदेश केला, तो केवळ ‘ऊठ, लढ’ इतकाच संदेश नव्हता.
जीवनाला स्पर्श करणाऱ्या अनेक विचार, विद्या, कला आणि कौशल्यांचा त्यात समावेश होता. जीवनात प्रयत्नपूर्वक तीन प्रकारची ‘तपं’ करावी लागतात. कसं जगावं, कसं वावरावं आणि कसं बोलावं याविषयी श्रीकृष्णानं भाष्य केलं. पहिलं तप शारीरिक. म्हणजे ज्ञानप्राप्ती करण्यासाठी निग्रहपूर्वक शरीरातील आक्रमकता, कामुकता यांना आवर घालणं.
तिसरं तप मानसिक पातळीवरचं. मन सदैव प्रसन्न, शांत ; तरीही तत्पर ठेवणं हे महत्त्वाचं तप. मनाचं मूळरूप चंचल असतं याचं भान ठेवून योगाभ्यासानं अनुशासनानं त्या मनाला स्थिर करणं हेही ‘तप’ आहे. अशा शांत, प्रवृत्ती आणि निवृत्तीचं संतुलन सांभाळणारं मन म्हणजेच आत्मिक सामथ्र्य. हे जाणणं महत्त्वाचं. केवळ रट्टे मारून, श्लोक पाठ करून ते साध्य होत नाही. त्यासाठी चिंतन, मनन, ध्यानधारणा यांचा अवलंब करावा लागतो.
या दोन्ही परिचित विचारांपलीकडली संकल्पना दुसऱ्या ‘तपात’ मांडली आहे. तो हा श्लोक. हे तप वाचिक म्हणजे प्रत्यक्ष बोलणं. आजच्या भाषेत सांगायचं तर ‘कम्युनिकेशन स्किल्स.’
इथं वाङ्मय म्हणजे विदग्ध साहित्य नसून वाङ्मय म्हणजे वाचिक तप. प्रयत्न करून आपल्या वाणीवर, शब्दांवर हुकमत प्राप्त करता येते, असं योगेश्वर कृष्ण इथं सांगतो. सांगावं कसं? बोलावं कसं? याविषयी गीता हे काव्य उत्कृष्ट उदाहरण आहे. सहज संवादरूपी श्लोकांत केवळ उपदेश नाहीये, अर्जुनाच्या गलितगात्र मन:स्थितीचा परामर्श घेऊन पुढं कृष्णानं मन-बुद्धी आणि तेजस यांचं स्वरूप स्पष्ट केलंय. अर्जुनाचं शंकानिरसन केलंय. कर्तव्यजागृती आणि अटळ परिस्थितीचा सामना कसा करावा याविषयी चार शब्द सांगितले आहेत.
जीवन कंठताना आपण एकटे नसतो, आप्तेष्ट, मित्रपरिवार यांच्याशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करायचे असतात, टिकवायचे असतात. यामध्ये संवाद करताना कसं बोलावं, कोणते शब्द वापरावेत आणि का बोलावं? याविषयी मोजक्या शब्दांत मार्गदर्शन केलंय आणि ते आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करण्याला उत्तेजन दिलंय.
सत्य बोलावं म्हणजे वास्तवाची जाणीव ठेवून फसवं बोलू नये. कोणाची दिशाभूल होईल असं बोलू नये. अशा फसवेगिरीनं संबंधांत बिघाड होतो. खोटं बोलणारी व्यक्ती भयग्रस्त असते, अहंकारी असते किंवा न्यूनगंडानं पछाडलेली असते. स्वार्थी सत्य हा सहज उद्गार असतो.
हितकर बोलावं, म्हणजे ज्याच्याशी संवाद करतोय त्याच्या कल्याणाची चाड बाळगावी. दुसऱ्याचं हित पाहणं म्हणजेच परमार्थ.
याखेरीज तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बोलणं प्रिय असावं. सत्यवचन म्हणजे फटकळ स्पष्टवक्तेपणा नव्हे, प्रिय बोलणं म्हणजे गोड गोड बोलून गोंडा घोळणं नव्हे. कारण त्यात स्वार्थ आहे. प्रिय बोलणं म्हणजे प्रेमानं बोलणं, शब्दात मार्दव पण ठामपणा हवा!
संवादकौशल्य म्हणजे आणखी काय हो?
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com
(श्लोक हेतुपुरस्सर विग्रह करून मांडला आहे)
प्रबोधन पर्व- लोकशाही व स्वातंत्र्य या बदनाम झालेल्या संकल्पना
‘‘जगात लोकशाही असणारे देश फार थोडे आहेत. बाकी सर्वत्र कोणत्यातरी प्रकारची हुकूमशाहीच आहे. आजही विसाव्या शतकात मानवजातीच्या फार मोठय़ा विभागाला लोकशाही राज्यपद्धती रुजलेली अगर पचलेली दिसत नाही – आणि जे देश लोकशाहीवादी म्हणून प्रसिद्ध, त्यांचीही परंपरा स्वत:च्या जनतेला गुलाम ठेवणारी व इतर राष्ट्रांना गुलाम करणारीच राहिली! लोकशाही व गुलामगिरी ह्य़ांत विरोध आहे असे तोंडाने बोलणे निराळे आणि ही भूमिका व्यवहारात दिसणे निराळे. लोकशाहीवादी असे स्वत:विषयी म्हणणाऱ्या राष्ट्रांचा व्यवहार नेहमी गुलामगिरीशी सुसंवादी राहिला.. लोकशाहीवादी राष्ट्रांच्या ह्य़ा दीर्घकालीन परंपरेमुळे दोन कल्पना फार बदनाम झालेल्या आहेत.’’ नरहर कुरुंदकर ‘छाया प्रकाश’ या आणीबाणीनंतर प्रकाशित झालेल्या पुस्तकातील ‘लोकशाही म्हणजे काय?’ या लेखात म्हणतात-
‘‘लोकशाहीचा आधार स्वातंत्र्य हा असतो. लोकशाही बदनाम झाली की स्वातंत्र्य ही कल्पनाही बदनाम होते. कोटय़वधी लोक उपाशी, नागवे, दरिद्री असताना स्वातंत्र्याला काय अर्थ आहे, ह्य़ा मुद्दय़ापासून टीकेला आरंभ होत असतो आणि ह्य़ा टीकेचा शेवट स्वातंत्र्य हे मूठभर वरिष्ठ वर्गाला हवे असून जनतेला भाकर हवी आहे, या ठिकाणी होतो! आम्हाला स्वातंत्र्य नको, भाकर हवी, अशी घोषणा मग केली जाते.. स्वातंत्र्य निर्माण करणे, बलवान करणे, स्वातंत्र्याची आस्था निर्माण करणे कठीण काम आहे. स्वातंत्र्याचा संकोच करणे फार सोपे आहे. अजून सुसंस्कृत व समृद्ध व्यक्तिमत्त्व असणारा माणूस संख्येने फार अल्प आहे. म्हणून जो माणूस अस्तित्वात आहे त्याला स्वातंत्र्याची गरज फारशी वाटत नाही. कधी राष्ट्र संकटात आहे म्हणून तर कधी भाकर देतो म्हणून स्वातंत्र्य नाहीसे करणे कधीच फारसे अवघड नसते. अवघड असते स्वातंत्र्य टिकवणे. लोकशाहीवादी राष्ट्रे ज्या पद्धतीने वागली त्यामुळे लोकशाही व स्वातंत्र्य ह्य़ा कल्पना फार बदनाम झाल्या, हे दुर्दैवी असले तरी सत्य आहे.’’