कबरेदके कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांपासून तयार होतात. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे वनस्पती कबरेदके तयार करतात.
आपल्या दैनंदिन जीवनात कबरेदकांचं स्थान अबाधित आहे. आपल्या अन्नात बहुतांश भाग पिष्टमय पदार्थ आणि साखरेचा असतो. पिष्टमय पदार्थ आणि साखर हे कबरेदकाचेच प्रकार आहेत. आपल्या वापरातले सुती कपडे कापसापासून म्हणजे सेल्यूलोज प्रकारच्या कबरेदकापासून बनवलेले असतात. घरासाठी वापरण्यात येणारे लाकूडही सेल्यूलोजपासून बनलेलं असतं. म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी आपण कबरेदकांवरच अवलंबून आहोत.
शास्त्रीयदृष्टय़ा कबरेदकांचे मुख्यत: तीन प्रकार आहेत. मोनोसॅकॅराइड्स् (एकशर्करा), डायसॅकॅराइड्स् (द्विशर्करा) आणि पॉलीसॅकॅराइड्स् (बहुशर्करा). या सर्वात मोनोसॅकॅराइड्स् ही साधी कबरेदके आहेत. या प्रकारच्या कबरेदकांत एका रेणूत कार्बनचे तीन ते सात अणू असतात. अर्थात कार्बन रेणूंच्या संख्येवरूनही ट्रायोज, पेंटोज, हेक्सोज इ. मोनोसॅकॅराइड्स् कबरेदकांचे गट पाडले जातात. ग्लुकोज, फ्रुक्टोज ही मोनोसॅकॅराइड्स् कबरेदकांची उदाहरणे आहेत. आपण जेव्हा ‘रक्तातील शुगर’ असं म्हणतो, तेव्हा त्याचा रोख रक्तातील ‘ग्लुकोज’ असा असतो. आपल्या पेशींतील ग्लुकोज हेच आपल्या ऊर्जेचा स्रोत आहे. फ्रुक्टोज हे मोनोसॅकॅराइड्स् फळांत आणि काही भाज्यांत आढळतं.
आपण नेहमीची जी साखर वापरतो, तिला सुक्रोज म्हणतात. सुक्रोज ‘डायसॅकॅराइड्स’ या गटात येते. दोन मोनोसॅकॅराइड्स् एकत्र बांधले गेले, की डायसॅकॅराइड्स कबरेदक तयार होतं. एक ग्लुकोजचा अणू एका फ्रुक्टोज अणूशी बांधला गेला की सुक्रोज तयार होतं. तसंच ग्लुकोजचा एक अणू एका गॅलॅक्टोज अणूशी बांधला गेला, की लॅक्टोज तयार होतं. दुधामध्ये लॅक्टोज असतं, यामुळेच दूध गोड लागतं.
अनेक मोनोसॅकॅराइड्सची साखळी असेल, तर त्याला पॉलीसॅकॅराइड्स् म्हटलं जातं. यकृतात आणि स्नायूंमध्ये साठवलं जाणारं ग्लायकोजन, धान्यांत मुबलक असणारं स्टार्च (पिष्टमय), वनस्पतींत आढळणारा तंतुमय भाग म्हणजे सेल्यूलोज आणि कायटिन ही पॉलीसॅकॅराइड्स् कबरेदकांची उदाहरणं आहेत.
कबरेदकांचे शास्त्रीय वर्गीकरण मोनोसॅकॅराइड्स्, डायसॅकॅराइड्स् आणि पॉलीसॅकॅराइड्स् असं करतात; पण सामान्यपणे खालील तीन गटांत केलं जातं. पहिला गट म्हणजे पाण्यात संपूर्ण विरघळणारी ‘शर्करा’. दुसरा गट म्हणजे पाण्यात न विरघळणारे, पण काही भाग विरघळल्यासारखे भासणारे ‘स्टार्च’ आणि तिसरा गट म्हणजे पाण्यात न विरघळणारे ‘सेल्यूलोज’.
चारुशीला जुईकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा