भारतीय पद्धतीच्या वेणू म्हणजे बांबूच्या बासरीवर भारतीय संगीत वादन करणारे जे थोडे परदेशी संगीतकार आहेत त्यामध्ये स्टीव्ह गोर्न हे सध्या अग्रगण्य आहेत. न्यूयार्क येथे जन्मलेले मूळचे अमेरिकी, स्टीव्ह गोर्न बांबू बासरी आणि सोप्रानो सॅक्सोफोन यांचे तज्ज्ञ वादक म्हणून ओळखले जातात. त्यांचं भारतीय संगीत, जाझ संगीत आणि नवीन अमेरिकी संगीत, बांबू बासरी आणि सोप्राना सॅक्सोफोनवर वादनाचे सादरीकरण देशविदेशांतील अनेक संगीत समारंभांमध्ये झाले आहे. शालेय जीवनात स्टीव्हना जाझ संगीताची आवड निर्माण झाली. पेनसिल्व्हानिया स्टेटमध्ये शालेय आणि विद्यापीठीय शिक्षण घेत असताना ते जाझ संगीतही शिकत होते. त्या काळात जॉन कोल्ट्रेन, चार्ल्स लॉइड या दिग्गज जाझ संगीतकारांनी भारतीय संगीताचा वापर करून एक वेगळं वैशिष्टय़पूर्ण जाझ संगीत रचनानिर्मिती करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडलं होतं.
भारतीय संगीत आणि त्याचे दिग्गज सनईवादक बिस्मिल्ला खान, सतारवादक रविशंकर आणि सरोदवादक अलीअकबरखान यांच्या अदाकारीची माहिती पाश्चिमात्य संगीत रसिकांना नुकतीच झाली होती. बिस्मिल्ला खान यांची सनई ऐकून भारतीय संगीताबद्दल स्टीव्हना असं काही आकर्षण निर्माण झालं की, १९६९ साली ते तडक भारतात बनारसला आले. तत्कालीन संगीतज्ज्ञ गोपाल मिश्र यांच्याकडे वर्षभर स्टीव्हनी भारतीय संगीत, सनई आणि बासरीवादनाची तालीम घेतली. पुढे ते बांबूबासरी वादनातील एक अग्रगण्य, कलकत्त्यातील गौर गोस्वामी यांच्याकडे दोन वष्रे बासरीवादन शिकले. सध्या मुंबई, दिल्ली आणि न्यूयार्क येथे नियमित संचार असणाऱ्या स्टीव्हचाही शिष्यगण तयार झालाय.
भारतीय संगीत आणि पाश्चिमात्य जाझ संगीत यांचे अप्रतिम मिश्रण करणाऱ्या स्टीव्हच्या बासरीवादनाचा सहभाग बॉलीवूड, हॉलीवूडच्या चित्रपटांत, संगीत समारोहांमध्ये, नृत्यनाटिकांमध्ये झालेला आहे. मुंबईच्या नेहरू सेंटर, एन.सी.पी.ए., दादर माटुंगा म्युझिक सर्कलमध्ये त्यांच्या एकल बासरी वादनाचेही कार्यक्रम होत असतात. ‘ल्यूमिनस रागाज’, ‘विंग्ज अॅण्ड शॅडोज’, ‘केव्हज ऑफ द आयर्न माऊंटन’, ‘कलर्स ऑफ द माइंड’ हे स्टीव्ह यांचे विशेष उल्लेखनीय अल्बम आहेत.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com